अलवार सुगंध मोगरीचा
दरवळला माझ्या मनांत
जणु मिठीत सरुन माझ्या
तु शांत नीजली आहे ।।१।।
अधिर कटाक्ष तुझा
अंगी रोमांच दाटलेले
ती भेट चांदण्यात
मनांत जपून आहे ।।२।।
बरसतात श्रावण सरी
अंग चिंब भिजलेले
निसर्ग हा सजलेला
प्रेम गीत गात आहे ।।३।।
बंद होतां पापण्या
तुलाच पाहतो मी
पुर्ण चंद्र आसमंती
स्वरुप तुझेच आहे ।।४।।
श्वासात तुच माझ्या
तुच स्पंदनात आहे
तुच नादब्रह्म माझा
ओंकार तुच आहे।।५।।
असाच येई श्रावणा
मवारली उन्हे कशी क्षणात न्हात हासली
झळाळता मधेच ती कवेत घेत सावली
टपोरल्या कळ्यांवरी सधुंद भृंग पातले
फुलात रंग रंगुनी तिथेच ते विसावले
सुखावतो तनासही मनास मोहि वात हा
विसावुनी मधेच का झुलावितो फुला फुला
दिशादिशातुनी खुळे भरात मेघ धावती
जरा कुठे कड्यावरी खुशाल लोंब लोंबती
हसून दाखवी कला भुलावतो मनामना
कणाकणा फुलावुनी असाच येइ श्रावणा
-----------------------------------------------------
वृत्त: कलिंदनंदिनी
लगावली: लगालगा/लगालगा/लगालगा/लगालगा
श्रावण महिन्यात सोनचाफा, गुलबाक्षी, अनंत, प्राजक्त, कणेरी, जास्वंद, तगरी , तेरडा, गावठी गुलाबी गुलाब, चमेली, सोनटक्का अश्या अनेक फुलांच्या आठवणी मनात रुंजी घालू लागतात. ही गोष्ट सोनटक्क्याची.
सोनटक्का
ओल्या मातीचा सुगंध आसमंती फैलावला
मृदा-कस्तुरी वासाने मेघराजा शहारला
शहारला मेघराजा आणि वेगे बरसला
एक सुखद गारवा आसमंती पसरला
ओल्याचिंब आषाढाने हो वैशाख झाकला
वृक्ष प्राणीमात्र सारा बदलाने सुखावला
मेघराजा जरी असा सूर्यकिरणास झाकला
सरत्या कृष्णपक्षासंगे आसमंत गारठला
लेकरांची वाटे चिंता देवप्रभू-निसर्गाला
कोवळ्या ऊन्हात लेऊन धाडतसे श्रावणाला
जसा आला हो श्रावण आसमंत सुखावला
ऋतूचक्रानेच धडा सुख-दुःखाचा हो दिला
- रोहन
आली ही सर पहिल्या पावसाची,
याच सरींनी घडविली भेट गगन-भूमीची,
भिजवुनी ही काळी माती
सुगंध उधळला आसमंताती,
दोघांच्या या भेटीने सारी सृष्टीच जणू भारली
पुन्हा नव्या चैतन्यात नटन्याची तयारीच करु लागली!
कोसळल्या मग सरींवर सरी
अंगणातला सुगंध गेला नदीच्या तीरी,
घरा घरात बागडू लागल्या मग बायका पोरी,
धांदल उडाली बघ मळेराणावरी
धान्याची झाकाझुक करू लागला शेतकरी,
स्वप्न पाहु लागला तो नव्या पेरणीची
उत्साही सर आली पहिल्या पावसाची.
श्रावण अंतरीचा
नकोच आकाशी फुलणारे
इंद्रधनुचे रेशीम तोरण
घोर निराशा संपून जाता
मनात उमलत जातो श्रावण
हिरवाईचे लोभसवाणे
चित्र अंतरी जरा उमटता
निर्मळतेचा झरा घेऊनी
मनात झुळझुळ वाहे श्रावण
मंद सुगंधी जाईजुई वा
प्राजक्ताचा सडा नसू दे
माणूसकीचा लेश अंतरी
दरवळणारा होतो श्रावण
असो नसो वा त्या जलधारा
मोहक रंगांची ती पखरण
निष्कपटशा ह्रदयातूनही
क्षणात वेडा फुलतो श्रावण
बाह्य जगाचे बंध भ्रमाचे
वितळून जाता प्रशांत चित्ती
तनामनातूनी लहरत जातो
प्रसन्न निश्चल मृदूतम श्रावण
सदाबहार श्रावण
वाट हिरवी सावळी
चाले डौलात श्रावण
धारा लेऊन रेशमी
न्हातो उन्हात साजण
जाई जुई शुभ्र कळ्या
वेली घेती अंगभर
नाजुकसा पारिजात
सडा शिंपितो केशर
धारा रेशमी गळ्यात
सखा गुंफतो श्रावण
मनामनात फुलवी
इंद्रधनुचे तोरण
पालवल्या दशदिशा
थेंब झुलती पानात
दूर शीळ पाखराची
घुमे ओलेत्या रानात
सदाबहार श्रावण
येवो न ये अंगणात
हिरवाई सतेजशी
जपू सदैव मनात...
श्रावण...
फेकून चादर काळोखाची
सोनपावली उन्हे उतरली
वारा शीळ घाली
धरती नवचैतन्याने थरथरली
पावसाच्या शिडकाव्याने
हिरवी काचोळी भिजली
लेऊन हार नवकुसुमांचा
नवयोवना जणू हि सजली
घेण्यास बाहुपाशात
नभ टेकले क्षितिजा पलीकडे
उधळीत सप्तरंग आकाशी
इंद्रधनुकली हि अवतरली
राजेंद्र देवी
आला श्रावण संख्यांनो,
चला जाऊ बाजाराला,
साज शृंगार करूया,
मास सणांचा हा आला.
भरू बांगड्या सयांनो,
गर्द हिरव्या रंगात,
सौभाग्याचे हे लक्षण,
किणकिणते हातात.
बांधू कंकण मोतीये,
मन खुलेलं क्षणात.
वाटे आकाश चांदणे,
मी बांधले हातात.
या बांगड्या लाखेच्या,
मज घेऊ वाटतात,
फुलतील इंद्रज्योती,
तिच्या साऱ्या आरश्यांत.