श्रावण आला...

Submitted by ऋतुराज. on 25 July, 2025 - 13:00

श्रावण आला....

Screenshot_20250725_222755_WhatsApp.jpg

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे

बालकवींची ही कविता माहीत नसलेला मराठी माणूस कुणीतरी विरळाच.
चातुर्मासातील आवडता आणि लाडका असा श्रावण महिना आजपासून चालू झाला आहे.
आषाढात चालू झालेल्या वर्षाऋतूने आता उन पावसाचा खेळ खेळायला सुरू केलेला असतो. अर्थात ऋतूंचं गणित आता पारच बिघडलंय म्हणा. पण श्रावणातील श्रावणधारा आणि धरित्रीचं हिरवगार रूप अजूनही तसंच टिकून आहे. श्रावणातील या सुस्नात हिरव्यागार निसर्गाबरोबरच सण, व्रतवैकल्यांची सुद्धा लयलूट असते.
श्रावणी सोमवार आणि शाळेला मिळणारी अर्धी सुट्टी. मंगळागौर, श्रावणी शनिवार. श्रावणातील वारांच्या निरनिराळ्या कहाण्या. त्यांची ती सचित्र कहाण्यांची पुस्तकं. घरातील पूजा. शुक्रवारची जिवतीची पूजा. औक्षण. मिळणारा गूळ चण्यांचा प्रसाद. घरात नैवेद्याचा, चमचमीत पदार्थांचा अन् धूप अगरबत्यांचा घमघमाट...
पंचमीला येणाऱ्या माहेरवाशिणी आणि त्यांची रंगलेली गाणी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, गोपाळकाला, दहीहंडी, पोळा...असे दणक्यात साजरे केले जाणारे सण. अगदी उत्सवी वातावरण निर्माण होते. ह्या सणांबरोबरच अनेक व्रतवैकल्ये देखील केली जातात.

अशाच श्रावणातील सण, उत्सव, व्रतवैकल्ये, गाणी, कविता, पदार्थ इत्यादी साठीचा हा धागा.

फोटो आंतरजालावरून साभार.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त धागा... श्रावण तर सण उत्सवांनी भरलेला असतोच पण श्रावणाची पूर्वसंध्या अर्थात दीप अमावास्या ही दीप पूजन करून साजरी करतात. हातात चार तांदळाचे दाणे घेऊन दरवर्षी आजीला फार भक्तिभावाने आम्ही कहाणी वाचून दाखवायचो जी आज फारच मजेशीर वाटते.

20230718_014236.jpg

आणि प्रसादासाठी केलेले बाजरीच्या पीठाचे गोड दिवे, त्यात तूप घालून मस्त लागतात.
IMG_20170723_125213_0.jpg

ममो ताई एकदम मस्त फोटो.
तुम्ही दाखवलेले बाजरीचे नागदिवे आम्ही चंपा षष्ठीला करतो. छान लागतात.

आमच्याकडे श्रावणी शुक्रवारी जीवत्यांची पूजा करतात. गोड कणकेचे दिवे आणि वाट्या करतात. वाट्यात नैवेद्य. घरातल्या आजुबाजूच्या सगळ्या लहान मुलांना ओवाळतात. गूळ चणे फुटाणे देतात.
Screenshot_20250726_080701_WhatsApp.jpg
.

Screenshot_20250726_080706_WhatsApp.jpg

Screenshot_20250726_081507_WhatsApp.jpg

हा जिवत्यांचा कागद.
दर शुक्रवारी आघाड्याच्या पानांचा हार घालायचा.
यातल्या बुध बृहस्पतींची पूजा नक्की कधी करतात माहीत नाही.

पुर्वी पुण्यातल्या पेठात टोपलीत आघाडा,दुर्वा,फुलं घेऊन विक्रेत्या येत. जोरात हाळी यायची....आघाडा, दुर्वा, फुलं घे बाईssss
कोण जाणे आमच्या महाविद्यालयात कोणी टारगटाने ही हाळी भिंतीवर चितारल्याचे आठवले.

खरंच श्रावणाचं अप्रूप न सरणारं आहे. वरचे फोटो आवडले.

जिवत्यांच्या कागदाला कापूस आणि मध्ये मध्ये कुंकवाच्या बोटाने दबलेली अशी माळ घालतात आमच्याकडे आणि त्याला माळ न म्हणता वस्त्र म्हणतात. का ते माहीत नाही.

जिवत्यांच्या कागदाला कापूस आणि मध्ये मध्ये कुंकवाच्या बोटाने दबलेली अशी माळ घालतात आमच्याकडे आणि त्याला माळ न म्हणता वस्त्र म्हणतात. >>>>> आमच्याकडेपण आई करायची. दर शुक्रवारी पुरणाच्या दिव्यांनी आम्हाला ओवाळायची. धुरकटवासाचं पुरण प्रत्येकाला द्यायची.

आमच्याकडे वस्त्रमाळ म्हणतात. वस्त्रमाळ आणि सुतपुतळी अशी जोडीनेच नावं घ्यायची. देवाला अगदीच फुलांचे हार किंवा वस्त्र नाही करणं जमलं तर ही कापसाची असल्याने यथाशक्ती वस्त्रे दिल्यासारखीच झाली हा भाव आहे त्यामागे. Happy

मस्तच धागा, फोटो एकदम नॉस्टॅल्जिक करणारे. जिवतीचा पाळण्यातले बाळ, रांगणारे बाळ - लेकरंच लेकरं टाईप फोटोही आहे. बाळ जन्माला आले की पाचव्या दिवशी जिवती स्वतः येऊन त्याचे भाग्य लिहिते असे म्हणतात. तेव्हाही छोटीशी पूजा करतात.

दर श्रावण शुक्रवारी आमची आई पण आम्हाला ओवाळून 'अतीत कोण, सर्वातीत कोण?' असे विचारायची तेव्हा 'मी' असे म्हणायचे. यशोदा आणि कृष्णाचा संवाद ओवाळताना म्हणायचा. प्रत्येक आईला आपलं बाळ कृष्णच. Happy मी पण माझ्या मुलांना किमान एका तरी श्रावणातल्या शुक्रवारी ओवाळतेच.

>>>> मी पण माझ्या मुलांना किमान एका तरी श्रावणातल्या शुक्रवारी ओवाळतेच.
Happy मस्त!
.
कर्क-सूर्य आया फार प्रेमळ पण शिस्तीच्या असतात. या आयांची पोरे बिघडलेली पहाण्यात नाहीत. माझी आईही कर्क - सूर्यच त्यात शिक्षिका Wink
आय एन्व्ही कर्क-सूर्य ( स्त्रिया व पुरुषही), काहीतरी सिनॅस्ट्री आहे आमच्यात. हमखास मला त्यांचा हेवा वाटतो, कौतुक वाटते. इट्स कॉम्प्लिकेटेड Happy
.
>>>>पाचव्या दिवशी जिवती स्वतः येऊन त्याचे भाग्य लिहिते असे म्हणतात.
मी सटवाई देवी ऐकले आहे कोणी सहाव्या दिवशी षष्ठी देवी येते म्हणतात. पण जिवतीचा संबंध लहान मुलांशी आणि सकारात्मक असतो हे माहीत आहे.

गणपतीत ही त्याला वस्त्र अर्पण करतात तेव्हा पिंजलेल्या कापसाला दोन दोन सेंटीमीटर वर कुंकवाच्या बोटाने दाबून वस्त्र करतात. त्याला आमच्याकडे कापसाळी म्हणतात.
कापसाळी आणि काडवाती जोड शब्दगत वापरतात. काडवात म्हणजे बारक्या काडीला ( आता काड्याकुठे शोधायच्या... तर उदबत्तीची जुनी न जळलेली थोटकं जपून ठेवायची) थोडा कापूस गुंडाळण्याचा आणि ती तुपात भिजवून त्याची वाट (लावायची)... आपलं वात करायची.

सुरेख समयोचित धागा. सर्व फोटो सुरेख, छान लिहिलंय सर्वांनी.

श्रावणात मी लहान असताना आई रोज मला कहाणी वाचायला लावायची. एखादया शुक्रवारी सवाष्ण, एखाद्या शनिवारी मुंज झालेला लहान मुलगा आणि सोमवारी ब्राह्मण असं जेवायला बोलवायची, तेव्हा गोड धोड, वेगवेगळे बेत करायची. ती एकभुक्त रहायची. एकदाच जेवायची, आम्ही बरेचदा सांगायचो असं नको करुस. सवाष्ण बोलवायची त्या शुक्रवारी तिन्ही मुलांचं औक्षण. दर शुक्रवारी जिवती पुजा.

नागपंचमीला बाबा लाकडी पाटाच्या उलट्या बाजूवर पाटभर चंदनाचे नाग काढायचे आणि पूजा करायचे. रात्री पाट बाहेर ठेवायचे ते विसर्जन, आई उकडलेला गोड पदार्थ करायची, फोडणीही आदल्या दिवशी करून ठेवायची. चिरणे, भाजणे अजिबात नाही त्या दिवशी.

सामो आई कर्क रास, सिंह लग्न होती. माझ्या वाटेला सिंह जास्त आला Lol मोठीना मी त्यामुळे शिस्त जास्त, मी नीट वागले तर धाकटी भावंडं नीट वागतील.

शाळेत एका शुक्रवारी श्रावणी चणे असायचे. अफलातून असायचे. मिरची, कोथिंबीर, मीठ लावायचे आणि वरून लिंबू पिळायचं मग सर्व चणे नीट कालवायचे.

मीही श्रावणात एखाद्या शुक्रवारी करते तसे चणे घरी. जिवती पूजा करते, एखाद्या शुक्रवारी मुलांचं औक्षण करते.

आघाडा, तेरडा लहानपणी आजूबाजूला खूप असायचा. आता इथेही दिसतो पण प्रमाण खूपच कमी.

आई बुध बृहस्पती करायची. चंदनाच्या (चंदन उगाळून) बाहुल्या दारापाठीमागे, सर्व फर्निचरवर श्रावणातल्या एखाद्या बुधवारी किंवा गुरुवारी काढायच्या, ते मी ही करते दरवर्षी.

वरती कापसाच्या वस्त्रांचा उल्लेख आहे त्याला अस्मिताने लिहिलंय त्याप्रमाणे आमच्याकडे सुतपुतळी वस्त्रं म्हणतात.

मोबाईलवरून लिहायचा कंटाळा येतो. अजून काही आठवलं की नंतर पीसी वरून पोस्ट करेन.

>>>>>>>>सामो आई कर्क रास, सिंह लग्न होती. माझ्या वाटेला सिंह जास्त आला Lol मोठीना मी त्यामुळे शिस्त जास्त, मी नीट वागले तर धाकटी भावंडं नीट वागतील.
Happy छान. शेअर केल्याबद्दल आभार.
>>>माझ्या वाटेला सिंह जास्त आला Lol
हाहाहा
>>>>>>>>>मिरची, कोथिंबीर, मीठ लावायचे आणि वरून लिंबू पिळायचं मग सर्व चणे नीट कालवायचे.
सह्ही! Happy

कापसाची असल्याने यथाशक्ती वस्त्रे दिल्यासारखीच झाली हा भाव आहे त्यामागे >> अच्छा. धन्यवाद अस्मिता.

सुंदर धागा - पहिली ओळख आणि ममोंची पोस्टही! माझाच एक जुना लेख आठवला आणि तो पुन्हा टाकला आहेच.

श्रावण म्हंटल्यावर जी इमेजरी डोळ्यासमोर उभी राहते त्यात तो हिरवागार रंग आणि त्यावेळचे सण/उत्सव हे पहिले येते. जूनमधे शाळा सुरू झाल्यावर पहिले एक दोन महिने बहुतांश "नो सुट्टी" सीझन असे. मग श्रावण आला की हे चित्र बदलत असे. अधूनमधून सुट्ट्या, घरी काही ना काही वेगळे - जिवतीचे चित्र, रोजच्या कहाण्या आणि रोजचे वेगवेगळे पदार्थ. तोपर्यंत पावसाचा जोर ओसरत असे पण त्याचबरोबर दोन महिने पडत असलेल्या पावसाने सगळीकडे हिरवेगार झालेले. अधूनमधून त्या "क्षणात येती..." ओळीप्रमाणेच पडणारा हलका पाऊस. माझे लहानपण अगदी मिश्र वस्तीत गेले आहे. तरीही आषाढ अमावस्या आमच्या आसपास दिव्यांचीच अमावस्या होती. तिची गटारी झालेली नव्हती. म्हणजे आजूबाजूचे लोक नक्कीच एकदा मटण वगैरे खाऊन घेत, पण त्याचे सेलिब्रेशन नव्हते. दारू तर अजिबात नसे. घरी तेव्हा "दिवे" खाणे व ४-५ दिवसांनी नागपंचमीला दिंड खाणे हे फार आवडायचे. नागपंचमीला काय काय करायचे नसते याबद्दल आम्ही इतक्या गंभीरपणे बोलायचो की जणू काही आम्ही मुले एरव्ही उठसूठ ते करत होतो - भाजणे, चिरणे वगैरे! पुरण तर श्रावणात दर शुक्रवारी असेच. ते नुसते पुरण साध्या पोळीशी फार भारी लागत असे - बहुधा त्यात वाती लावत - त्यांचा एक वास त्याला येत असे (वरती मंजुताईंनी "धुरकटवासाचे पुरण" लिहीलेले आत्ता दिसले - ते तेच असेल). तो मला प्रचंड आवडायचा. श्रावणातील पौर्णिमाही "नारळी पौर्णिमा" जास्त होती असे थोडेफार लक्षात आहे. घरी नारळीभात असे - तिची राखी पौर्णिमा नंतर झाली. ती कदाचित माझी वैयक्तिक आठवण असेल. पुण्यातील इतर लोक सांगतील. पुण्यात सार्वजनिक दहीहंडी होती पण संख्या कमी होती, व उंचीही - लोकांचे दोन तीन थर होतील इतकीच आठवते. मंडईजवळची एक फेमस होती.

आमच्या चाळीत प्रत्येकाच्या घरापुढे अंगण व ते आणि रस्ता यात आणखी थोडी गॅप होती. प्रत्येकाच्याच पुढे व मागे अंगणात थोडीफार झाडे होती. तेथे सहसा या सीझनलाच जास्त दिसणारी झाडे व फुले खूप येत. एक गुलबक्षी लक्षात आहे. बाकीही खूप होती पण लक्षात नाहीत.

उत्तरार्धात लागणारी गणपतीची चाहूल व शहरात सगळीकडे दिसू लागलेले मांडव, आमच्याही सार्वजनिक मंडळाच्या गणपतीची तयारी - ही सुद्धा श्रावणासंबंधीचीच आठवण!

श्रावणातला सत्यनारायण माझ्या सासूबाई करायच्या, तो आम्ही continue केलाय... आज पहिल्या रविवारी सगळे घरी असल्याचे औचित्य साधून पूजा केली, कारण नंतर सुट्टीचा वार, भटजींची उपलब्धता, घरातले सगळे असणे, पाऊस नसणे असे uncontrollable variables add होतात.

श्रावणात घरातल्या स्त्रियांचे सोमवारी व शनिवारी एकभुक्त उपवास असायचे. काहींचे शुक्रवारी उपवास असायचे. आईचा मंगळवारीही नेहमीचा उपवास असायचा. त्यातून रविवारी संकष्टी वगैरे आली की बाबा चिडायचे. आठवडाभर उपासच कर असं आईला सांगायचे. आईही होहो पुढच्या श्रावणात सोडून देते अशी बोळवण करायची.

उपवासाचाही फारसा तामझाम नसे. उकडलेलं रताळं, असेल तर दूध किंवा केळं एवढ्यावर उपास निभवून न्यायचा. हरतालिका असेल तर घरी केलेली आंबा, फणसाची साठं, दारातल्या शहाळ्याचं पाणी, गणपतीसाठी घरात आणलेल्या सफरचंदांपैकी एखादं सफरचंद वगैरे जरा रॉयल ट्रीटमेंट. एरवी सफरचंदं, डाळिंबं वगैरे फळं बाजारात फारशी दिसायचीही नाहीत.

सोमवारी व शुक्रवारी शाळा लवकर सुटायची.
उपवास सोडण्यासाठी सूर्यास्ताच्या आसपास जेवणं व्हायची. उपवास सोडतानाही शक्यतो एखादी दारातली पालेभाजी, सोबत पडवळ, वालीच्या शेंगा, भेंडी, मुगाची ओलं खोबरं, मिरची घातलेली उसळ अश्या भाज्या असायच्या. आणि गोड म्हणून शिरा म्हणजे डोक्यावरून पाणी. नाहीतर घरी केलेला हापूसचा मुरांबा असायचाच. उपवास सोडताना केळीच्या पानावर जेवून सोडायचा.

माझी आज्जी जिवतीची पूजा करायची. देव्हाऱ्याच्या खाली हे चित्र टांगलेलं असायचं. ती आघाडा आणि कसल्या तरी पानांची गुंडाळी करून त्याचे हार घालायची. सोबत मंजूताईंनी सांगितलं तसं कापसाचे वस्त्र असायचं.
ते हार ती श्रावण संपेपर्यंत ठेवायची. श्रावण संपल्यावर त्याचं विसर्जन करायची.

एमएससीबीच्या कृपेने लाईट नसायचाच. असला तरी कमी व्होल्टेज आणि पिवळा रंग याने धुसर प्रकाश असायचा.
खोलीतल्या अंधाऱ्या कोपऱ्यात देव्हाऱ्याजवळ निरांजनाच्या प्रकाशात आम्हांला ओवाळणारी आज्जी लक्षात आहे.

नागपंचमीला पाटावर घरात पाटावर नाग काढून त्याची पूजा करायची. व दूध, साळीच्या लाह्यांचा नैवेद्य दाखवायचा. काहीजण नागाचं चित्रं आणून किंवा छोटी मूर्ती आणून त्याची पूजा करायचे. काही ठिकाणी गारुडी सापाला घेऊन यायचे. माझ्या मावशीचे यजमान मुळचे बत्तिस शिराळा तालुक्यातले. तिथे त्या दिवशी मोठी यात्रा असायची. ते खूप लोक सापांना पकडून अंगावर बाळगायचे वगैरे रसभरीत वर्णनं करायचे आणि आम्ही अचंब्याने ऐकत असायचो.

आम्हांला प्राथमिक शाळेत सुट्टी असायची. पण आधी शाळेत साप हे शेतकऱ्यांचे कसे मित्र वगैरे गोष्टी एखाद्या ऑफ पिरीअडला कुणीतरी सांगायचेच.

गोकुळाष्टमीला मारूती मंदीर, रामआळी, धनजी नाका वगैरे मोजक्याच ठिकाणी दही हंडी बाधलेली असायची. तत्पूर्वी आदल्या रात्री राम मंदीरात कृष्णजन्माष्टमीचा सोहळा पार पडायचा. शहरातले धनिक वणिक हंडी फोडणाऱ्यांसाठी मिळून बक्षिस ठेवायचे. हंडी फोडल्यावर बाबा तिच्या खापराचा तुकडा उचलून साफ करून कपाटात ठेवायचे. एका वर्षी आत्येबहीणीच्या यजमानांनी आम्हां मुलांसाठी छोटी हंडी बांधली होती.

चोहीकडे हिरवळ दाटविणाऱ्या श्रावणमासाचं स्वागतगद्य हर्ष-मानसी ऋतुराजाने लिहावं आणि त्यावर माबोकरांनी इंद्रधनूचा गोफ विणणाऱ्या प्रतिसादांच्या बलाकमाला लगोलग उडवाव्यात हा घृतदुग्धशर्करा योगच!

लेख सध्या नुसताच चाळलाय; प्रतिक्रिया अजून वाचायच्यात; रुमाल टाकून ठेवतोय...

आई पूर्ण महिना एकभुक्त रहायची. बाबा शनिवार सोमवार उपास करायचे, शनिवारी आम्ही सगळेच करायचो, बाबा आणि आम्ही तिघे भावंडं एकादशी दुप्पट खाशी गटातले, आई खरोखर चहा आणि फार फार तर फळं खाणारी. बाबांचा उपास असला की उपासाच्या खाण्याची रेलचेल त्यामुळे सोमवारी आमचा उपास नसला तरी आम्ही उपासाचे खायचो. दुपारी फराळ करायचो, रात्री सर्व साग्रसंगीत केलेला स्वयंपाक. सोमवारी उपास होऊ नये म्हणून काहीतरी खायचो इतर.

गोकुळाष्टमी कृष्णजन्म रात्री 12 दही दूध पोहे नैवेद्य. दुसऱ्या दिवशी दहीहंडीलाही आई मस्त पोहे करायची, इथल्या सोसायटीतली मुलंही आईकडून पोहे करून न्यायची. दही, दूध, हिरवी मिरची, कोथिंबीर, काकडी, मीठ, साखर घालून करायची. मी तसेच करते.

डोंबिवलीत पूर्वी दहीहंडी विशेष नसायची त्यामुळे लहान असताना आम्ही मोठ्या आतेकडे गिरगावला झावबावाडीत जायचो. लागूनच नवी वाडी होती. जेवून मेन रोडला जायचो, मला दहीहंडीपेक्षा मोठ्या ट्रकमधून वेगवेगळे रामायण, महाभारत कथेतील एखाद्या गोष्टीचे देखावे जायचे, ते बघायला जास्त आवडायचं.

छान धागा आहे. मला शाळेत असल्यापासून श्रावण महिना आवडायचा. कारण श्रावण आले श्रावण सुरू झाला की लगेच गणपती येतात मग नवरात्र दसरा दिवाळी अशी सगळी सण सणांची ओळ चालूच होते.

आमच्या घरी आई खूप काही करत नसे. पण. आजी गावाला जिवती चे कागद लावी. आई एखाद्या शुक्रवारी ओवाळत असे.
आजी नागपंचमीला एका पाटावर गंधाने नागाच्या आकृत्या (चित्रे ) काढी - नागाची पूर्ण वंशावळ असे काहीसे ती म्हणत असे.
मुलांसाठी म्हणून पिठोरी अमावस्या करतात , तेही करी. तिचा उपास असे. वडे - घारगे ह्यांचा नैवेद्य.
श्रावणातील एका सोमवारी शंकराला बेल वाहण्याचा कार्यक्रम / प्रथा असे.
श्रावणी सोमवारी (बहुदा नक्की आठवत नाही सोमवार की शुक्रवार) शाळा अर्धा दिवस असे.
एका शुक्रवारी शाळेत श्रावणी शुक्रवारचे हळदी कुंकू असे. जास्त विस्ताराने आठवत नाहीये.. पण चणे गुळ देत असत. ८-९ पशू मुली त्या दिवशी साड्या नेसून येत . किंवा नवीन कपडे.. त्या दिवशी युनिफॉर्मला सुट्टी.

दही हंडी मेजर असे. सुरुवातीला एकच दहीहंडी उंच/ प्रसिद्ध होती.. हळू हळू ते बदलत जात, त्याचही बाजारीकरण/ राजकारण झालं.

राखी पौर्णिमा हिट असे. त्या दिवशी सुट्टी असे. काही मुली वर्गातल्या मुलांना भाऊ मानत - त्यांना आदल्या / दुसऱ्या दिवशी राखी बांधत .. वगैरे अशाही गमती चालत.

कळव्याच्या खाडीवर नारळी पौर्णिमेनिमित्त बरीच गर्दी असे. जेव्हा एक पूल होता तेव्हा पूर्ण रहदारी बंद केली जायची.

मस्त आठवणी सगळ्या ...
नागपंचमीला जनरली लाह्यांचा प्रसाद असतो पण आमची आई घरात असतील ती धान्य आणि कडधान्य म्हणजे ज्वारी गहू , भात, वाल चवळी मूग मटकी हरभरे अशी सगळी थोडी थोडी घेऊन मंद आचेवर पातेल्यात भाजत असे. त्याला आम्ही नागाणे म्हणायचो. ती कडधान्य भाजल्यामुळे कडक होत असतं आणि पाऊस बघत बघत दाताखाली रगडायला खूप मजा येत असे. नागाण्यांसाठी आम्ही नाग पंचमीची वाट बघत असू इतके ते आमचे आवडते होते.

श्रावणाच्या आठवणी म्हटल्या तर सोमवारी अर्धा दिवस शाळा.
आई सोमवारचा उपास वर्षभर करायची. श्रावणात गुरुवार धरायची.
उपास म्हणजे एकदाच जेवणे, ते बहुधा रात्री. मुगाची उसळ असे. आमच्याकडे मुगाच्या उसळीला फक्त आले , मिरची एवढेच मसाले असतात. गोड पदार्थ म्हणून वाफवलेल्या मुगांत गूळ .

आई सोमवारी शिवलीलामृत वाचायची. बाबांनीही रिटायर झाल्यावर वाचायला सुरुवात केली. पूर्ण वाचता आले नाही, तर अकरावा अध्याय वाचलेला पुरत असे. त्यातल्या कहाण्या अंधुक आठवतात.

शामची आई मध्येही श्रावणाचे वर्णन आहे ना? सोमवारची शिवामूठ - ती कोणकोणत्या धान्यांची. कालनिर्णयात लिहिलेलं असतं.

जिवत्यांच्या कागदाला कापूस आणि मध्ये मध्ये कुंकवाच्या बोटाने दबलेली अशी माळ घालतात आमच्याकडे >>> आमच्याकडे पण
वस्त्रमाळ आणि सुतपुतळी>>>>
कापसाळी आणि काडवाती>>>>>
साधी वात आणि फुलवात>>>>>
किती प्रकारच्या वाती. इंटरेस्टिंग.. आमच्याकडे सोमवारच्या वाती वळत नाही. आणखी बऱ्याच प्रकारच्या वाती असतात.

आम्हाला ओवाळून 'अतीत कोण, सर्वातीत कोण?' असे विचारायची तेव्हा 'मी' असे म्हणायचे. >>>> किती मस्त.

पाचव्या दिवशी जिवती स्वतः येऊन त्याचे भाग्य लिहिते असे म्हणतात.
मी सटवाई देवी ऐकले आहे>>>>> मी सुद्धा.

आई बुध बृहस्पती करायची. चंदनाच्या (चंदन उगाळून) बाहुल्या दारापाठीमागे, सर्व फर्निचरवर श्रावणातल्या एखाद्या बुधवारी किंवा गुरुवारी काढायच्या, ते मी ही करते दरवर्षी.>>>>> अन्जु, हे माहीत नव्हते. धन्यवाद.

फा, सुंदर आठवणी... तुमचा धागा वाचला. अगदी चित्रदर्शी वर्णन.
गंधकुटी, श्रावणातील सत्यनारायण पूजा अगदी प्रसन्न करणारी आहे. छोट्या समयांचा घाट सुंदर. पळी पंचपात्र सुद्धा अगदी रेखीव आहे. आवडले.

आम्हांला प्राथमिक शाळेत सुट्टी असायची. पण आधी शाळेत साप हे शेतकऱ्यांचे कसे मित्र वगैरे गोष्टी एखाद्या ऑफ पिरीअडला कुणीतरी सांगायचेच.>>>>>>> माझेमन, वाचून अगदी अगदी झाले. मस्त वर्णन.

कळव्याच्या खाडीवर नारळी पौर्णिमेनिमित्त बरीच गर्दी असे. जेव्हा एक पूल होता तेव्हा पूर्ण रहदारी बंद केली जायची.>>>>हो. हे आठवतंय.

ज्वारी गहू , भात, वाल चवळी मूग मटकी हरभरे अशी सगळी थोडी थोडी घेऊन मंद आचेवर पातेल्यात भाजत असे. त्याला आम्ही नागाणे म्हणायचो>>>> हे नवीन समजले.

पूर्ण वाचता आले नाही, तर अकरावा अध्याय वाचलेला पुरत असे. >>>> बरोबर. अकरावा अध्याय रुद्राक्ष महिमेचा. तो एकच वाचला तरी पुरे असे म्हणतात.

पाच सोमवारी शिवामूठ वाहायची तांदूळ तिळ मूग जवस सातू. शिवमुठीची एक कहाणी होती बहुतेक. दुसरी फसकीची, मला त्यातलं फक्त "घे फसकी दे लक्ष्मी" असं काहीतरी आठवतंय. आणखी एक खुलभर दुधाची. खुलभर शब्द फक्त त्या कहाणीतच वाचला असेल फक्त.
आणि नंतर रमडच्या लेखात. Happy

मला वाटतं मी जिवती/ सटवाई कन्फ्यूज होऊन लिहिले होते. ते सटवाईच बरोबर आहे. एका देवीचा जॉब चुकून दुसरीला दिला. Happy

हाहाहा Happy इट्स ओके.
>>>>>>>पूर्ण वाचता आले नाही, तर अकरावा अध्याय वाचलेला पुरत असे. >>>> बरोबर. अकरावा अध्याय रुद्राक्ष महिमेचा. तो एकच वाचला तरी पुरे असे म्हणतात.
वाचला ना आज सकाळी. फार प्रसन्न वाटतं तो अध्याय वाचल्यावरती. हा नेहमीचा रामबाण अनुभव आहे.
>>>>>सोमवारची शिवामूठ - ती कोणकोणत्या धान्यांची. कालनिर्णयात लिहिलेलं असतं.
होय बरोब्बर भरत.

मस्त आठवणी एकेक. आमच्याकडे आता वयपरत्वे आईने हे सगळं बंद केलंय ( म्हणजे आम्हीच करायला लावलंय ) पण तरीही श्रावण आला की बर्‍याच गोष्टी हटकून आठवतात.

आमच्याकडे तो जिवतीचा कागद एखाद्या पुठ्ठ्याला लावून देव्हार्‍यात टांगला जायचा. मग रोज त्याला हळदकुंकू वगैरे वाहणं व्हायचं आईचं.
सोमवारचे उपास करत असे आई. मग ते प्रत्येक सोमवारच्या कहाण्या वाचणं व्हायचं. हे काम माझ्याकडे होतं. बाकी सुद्धा प्रत्येक दिवसाप्रमाणे कहाण्या वाचायचं काम मी हौशीने केलं आहे Happy
शुक्रवार विशेष आवडता. कारण पुरणाचे दिवे! ते स्मोकी पुरण जगात भारी लागतं असं माझं मत आहे. एरवीचं कुठलंही पुरण तेवढं ग्रेट लागत नाही.
नागपंचमी आठवते ती हातावर मेंद्या काढायच्या उद्योगामुळे Happy आवर्जून दोन्ही हातांवर मेंदी काढत असू मी आणि बहीण. त्यादिवशी पाटावर चंदनाने नाग काढायचं काम आधी बहिणीकडे होतं. तिच्या लग्नानंतर माझ्याकडे आलं.
नारळी पौर्णिमेला आई भरपूर नारळीभात करायची. किती हावरटासारखा खाल्ला आहे तो हे आठवून आता हसू येतं.

श्रावण जनरलच आवडायचा कारण शाळेला बर्‍याच सुट्ट्या असायच्या किंवा अर्धा दिवस शाळा असं काहीतरी असायचं. एकूणच चंगळ होती.

छान लिहिताय सगळे. वेगवेगळी माहिती मिळते. भरत यांच्या आईप्रमाणे माझी आईही सोमवारचा उपास ती लहान असल्यापासून बाराही महिने करायची, म्हातारपणी उद्यापन करून सोड सांगितलं तरी तिने ऐकलं नव्हतं, अल्झायमर झाल्यावर तिला जेवलेलं, खाल्लेल्ले आठ्वयचं नाही परत परत मागायची, त्याचा त्रास व्हायचा पण पेपर वाचायची त्यामुळे सोमवार समजायचा मग मात्र कडक उपास, त्याचाही त्रास व्हायचा. मग मात्र भावाने सोडायला लावले, परळी वैजनाथला अभिषेक सांगितला, ऐकलं या गोष्टीवर तिने.

मूग उपासाला आमच्याकडे नाही चालत पण कोकणात काही ठिकाणी चालतात.

अस्मिता Lol होतं असं. सटवाई बरोबर. हिला सटवीही म्हणतात.

आई एका श्रावणी सोमवारी लघुरुद्र करून घ्यायची. शेजारी आता जेव्हा लघुरुद्र असतं श्रावणी सोमवारी तेव्हा मला आठवतात ते दिवस.

शिवलीलामृत आई बहुतेक बाराही महिने दर सोमवारी वाचायची, मलाही कधी कधी वाचायला लावायची, खूपच मोठा अध्याय आहे, मी कंटाळायचे. आता मी शिवलीलामृत दर सोमवारी पहाटे पीसीवर लाऊन ऐकते.

आई दरवर्षी चातुर्मास व्रत वैकल्ये करायची वेगवेगळी. कांदा लसूण, मसूर, वांगी खायची नाही, घरात आणायचीच नाही. आई बाबा दोघे पाळायचे चातुर्मास. कांदेनवमीला कांद्याची भजी करून मग आषाढी एकादशीपासून सुरू. मी आणि भाऊ कॉलेजात जायला लागल्यावर आम्ही सांगितलं की श्रावण महिना पाळूया, पूर्ण चातुर्मास नको. मग आम्हाला खायची बंदी नाही केली, होता होईस्तोवर ती दोघे नव्हती खात.

Pages