आल्या आषाढाच्या सरी
दह्या दूधाच्या घागरी
मंथन आभाळी चालले
लोणी गोकुळी सांडले
खेळे सावळा आभाळी
खेळे सावळा गोकुळी
करी लयलूट लोणी
गोपां संगे वनमाळी
नाही वानवा सुखाची
मोदे भरले गोकुळ
रास रंगलेल्या गोपी
पावा वाजवी घननीळ
ध्वनी मधूर ये कानी
टप टप पानोपानी
चराचर चिंबचिंब
नदी, नाले उफानोनी
ओला आनंद मनात
ओला आनंद तनात
आली वारी आषाढाची
टाळ वीणा वाजवत
© दत्तात्रय साळुंके
ओल्या मातीचा सुगंध आसमंती फैलावला
मृदा-कस्तुरी वासाने मेघराजा शहारला
शहारला मेघराजा आणि वेगे बरसला
एक सुखद गारवा आसमंती पसरला
ओल्याचिंब आषाढाने हो वैशाख झाकला
वृक्ष प्राणीमात्र सारा बदलाने सुखावला
मेघराजा जरी असा सूर्यकिरणास झाकला
सरत्या कृष्णपक्षासंगे आसमंत गारठला
लेकरांची वाटे चिंता देवप्रभू-निसर्गाला
कोवळ्या ऊन्हात लेऊन धाडतसे श्रावणाला
जसा आला हो श्रावण आसमंत सुखावला
ऋतूचक्रानेच धडा सुख-दुःखाचा हो दिला
- रोहन