पावसाच्या आठवणी - जुन्या माबोवरून

Submitted by फारएण्ड on 27 July, 2025 - 10:15

जवळजवळ १८ वर्षांपूर्वी जुन्या माबोवर लिहीलेला हा लेख नवीन लोकांनी वाचावा म्हणून जसाच्या तसा पुन्हा कॉपी केला आहे. ती लिंक आहे पण आता तेथे नव्याने प्रतिक्रिया देता येत नाहीत.
----
मूळ लेख १७ जुलै २००७

परवाच 'भिंतीवरी' असलेले कालनिर्णय बघत होतो आणि आषाढ सुरू होत असल्याचे लक्षात आले. येथे अमेरिकेत आषाढ-श्रावण म्हणजे फक्त उन्हाळा आणखी जास्त होतो, बाकी काहीच फरक नाही. पण भारतात आणि ते ही पूर्वी शाळेत असताना या सुमारास केवढा बदल व्हायचा! कॅलेंडर कडे बघता बघता मी काही वर्षे एकदम मागे गेलो... हा जर चित्रपट असता तर चित्र धूसर होऊन कॅलेंडर च्या पानांसारखेच फडफडून एकदम काही वर्षांपूर्वीचा मी तसाच कालनिर्णय कडे बघत उभा असलेला शॉट समोर आला असता.

एकतर दोन महिन्यांची सुट्टी संपून शाळा चालू व्हायची. म्हणजे वैताग! त्यात पाऊस चालू व्हायचा, पण इतका नाही की शाळेला दांडी मारता येईल Happy

अजूनही आषाढ-श्रावण म्हंटले की डोळ्यासमोर काही ठराविक गोष्टी उभ्या राहतात्: नुकताच संपलेला आंब्यांचा सीझन आणि तरीही विजेच्या तारेवर लटकणार्‍या कोयी, अधून मधून गाडीवर विकायला येणारे तोतापुरी आंबे व कोणतेतरी तमाशाप्रधान चित्रपटातील गाणे ऐकून तोतापूरी आंब्याची कोय फोडून त्यात भुंगा निघतोय का ते पाहाणे. मातीचा वास, नवीन पुस्तकांचा वास, कव्हरे घालणे वगैरे. तेव्हा Back to school sale वगैरे भानगडी नसल्याने अप्पा बळवंत चौक किंवा जवळ नवीनच निघालेल्या दुकानात आम्ही आणायला जायचो. नंतर मग प्रत्येक विषयासाठी १०० की २०० पानी ते कळाल्यावर वह्या आणणे. घरासमोरच्या मातीत येणारी हिरवळ, कहाण्या आणि मग गणपतीच्या 'मीटिंग्स', ज्यात ठरवून कधीही त्याबद्दल चर्चा होत नसे. मधे राखी पौर्णिमा यायची. तेव्हा एवढे 'उत्तरीकरण' झालेले नसल्याने ही नारळी पौर्णिमाही होती. दिवे, दिंड आणि नारळीभात. नागपंचमी च्या दिवशी काय करता येत नाही याची चर्चा, "नागोबाला दूध"! (दिव्याची अमावस्या नंतर 'गटारी' ही झाली, पण ते चिकन वगैरे खाऊ लागल्यावर) तसेच दहीहंडी. आम्ही कॉलेज मधे एकदा दुसरे काही मिळाले नाही म्हणून एक टेस्ट ट्यूब टांगून दहिहंडी केली होती. आणि झेंडावंदन. खादी किंवा पांढरे कपडे घालून फिरणारे कार्यकर्ते, सायकलच्या हॅंडलला लावलेले झेंडे आणि भिरभिरे. सार्वजनिक ठिकाणी सकाळी सकाळी 'कर चले हम फ़िदा...' पासून सुरू होणारा लाउडस्पीकर वरचा मूड संध्याकाळपर्यंत 'मुंगळा...' वर जायचा. दारू पिउन नाचायला तेच कार्यकर्ते. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यावर इतक्या वर्षांत काय झाले त्याचे एका दिवसात हायलाइट्स!

त्याच्या थोडे आधी पालखी. पालख्यांचा मुक्काम पुण्यात २-३ दिवस असल्याने त्यावेळेस पुण्यात तेच वातावरण असायचे. ज्या दिवशी पालख्यांचे पुण्यात आगमन होते (फक्त येथेच 'आगमन' शब्द योग्य वाटतो. 'सिंहगड एक्सप्रेस ने कल्याण स्थानकावर आगमन झालेल्या' वगैरे कशासाठी? '...स्थानकावर आलेल्या' का नाही?) त्या दिवशी (आता जुन्या) मुंबई पुणे रस्त्यावरून सकाळी जाताना खडकी पिंपरीत काय वातावरण असते! तेथील सगळ्या कंपन्या आपला कॉर्पोरेटपणा सोडून दारात मांडव घालून वारकर्‍यांसाठी थोडेफार खाणे व पाण्याचे लाल कापडात गुंडाळलेले माठ ठेवायचे व भीमसेन जोशी किंवा प्रह्लाद शिंदे जोरात असायचे. मग पालख्या पुण्यातून पुढे गेल्यावर दुसर्‍या दिवशी पेपर मधे हमखास येणारा पूर्ण दिवे घाट व्यापून टाकलेला वारकरी व पालख्यांचा फोटो.

दर पावसाळ्यात हमखास लक्ष जाणारी शाळेच्या दुसर्‍या मजल्याच्या जवळ असलेली पानशेत च्या पुराच्या वेळची पाण्याची लेव्हल दाखवणारी रेघ आणि नेहमी शाळेभोवती जमणारे पाणी. घरी धुतल्यानंतर तिसर्‍या दिवशीही थोडेसे दमट राहणारे कपडे. पावसाळा सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी सर्वांच्या अंगणातील झाडीत दिसणारा तो हिरवागार रंग अजूनही डोळ्यासमोर आहे पण त्याचे नेमके वर्णन करता येत नाही.

मग वापरली जाणारी काळी दणकट छत्री. आमच्या आजोबांच्या जमान्यातील आणि आता हळुहळू नाहीश्या झालेल्या गोष्टी म्हणजे त्या काळ्या छत्र्या आणि काळ्या सायकली. पावसाळ्यात एखाद्या सायकल ला मागे मडगार्ड नसेल तर तिच्या चाकाची धार थेट आपल्या अंगावर यायची, म्हणून तसे कोणी दिसले तर त्यातून वाचण्याची धडपड. सायकलीची घंटाही थोडी गंजून 'ट्रिन्ग ट्रिन्ग' न करता नुसताच काहीतरी घासल्यासारखा आवाज काढत असे.

ही सायकल अत्यंत टिकाऊ होती, फक्त कधी पडली की मग पायडल चेन कव्हर वर घासून तो "खणंग" सारखा आवाज यायचा, नेमका मुलींसमोरून जाताना तो आवाज आला की एव्हढा राग का यायचा त्याचे आता आश्चर्य वाटते. पुढे मग गाडीने जाताना रेनकोट घालायचा कंटाळा म्हणून पाऊस नसेपर्यंत जायचे आणि मग कोठेतरी शेड, झाड वगैरे शोधायचे हा उद्योग. झाडाखालीही वरती फांद्यांवर किंवा पानांवर पडून जमलेले मोठे थेंब आपल्या कॉलर च्या मधून थेट पाठीवरच पडायचे. लहान असताना त्यातही झाडावर आधी वीज पडते की लोखंड वगैरे शोधून तिकडे जाते याची चर्चा चालायची. तसेच इंद्रधनुष्य पडले की ते बाहेरचे दुसरे दिसते का म्हणून दुसर्‍याला दाखवायची धडपड आणि ते बाहेरचे इंद्रधनुष्य कायम रंगात बुचकळल्यावर बर्‍याच वापरलेल्या ब्रशने काढल्यासारखे फक्त सुरुवातीला आणि शेवटी उमटत असे आणि मधे दिसत नसे. हे बहुतेक वेळा संध्याकाळीच पाहिल्याने पूर्वेला दिसले, पण क्वचित एक दोनदा सकाळी पश्चिमेला ही पाहिल्याचे आठवते.

पाऊस 'अमुक इंच' पडला हे कसे ठरवतात ते कळायचे नाही आणि वाटायचे की अंगणात जमणार्‍या पाण्यात पट्टी बुडवून बघत असावेत (मग ते शास्त्रशुद्ध रीतीने कसे बघतात ते नंतर कोणत्यातरी इयत्तेत कळाले). तसाच आणखी एक उद्योग म्हणजे पावसाचे पाणी सर्वात स्वच्छ असते हे कळाल्यावर पाऊस पडताना रस्त्यात वरती 'आ' करून ते पाणी डायरेक्ट प्यायचा केलेला प्रयत्न!

बसमधे जर कोणी निष्काळजी पणाने खिडकी उघडी ठेवली तर बसायची एक जागा कमी होत असे. पुढे कंपनीच्या बसमधे ही तसेच. तेव्हाही नेमकी पावसाच्या दिवशी छत्री नेलेली नसे, तर काही नग असे होते की अगदी फेब्रुवारीत पाऊस आला तरी त्यांच्याकडे बरोबर छत्री असायची. एक सीट कमी होणे मी लोकल्स मधे ही पाहिले आहे. पण पाऊस बघायला आवडणार्‍या प्रत्येकाने त्या दिवसात रेल्वेने पुणे मुंबई प्रवास करावाच. त्याबद्दल मी रंगबिरंगी वर लिहिले आहे म्हणून पुन्हा इथे लिहीत नाही.

पुण्यात निदान तेव्हातरी मे च्या शेवटी गारांचा पाऊस पडत असे. कधी कधी जोरदार मोठ्या गारा पडायच्या. माझी एक आठवण म्हणजे पुणे विद्यापीठाजवळ एका ठिकाणी आम्ही चहा, सामोसे वगैरेच्या दुकानात उभे होतो आणि एकदम तसा पाऊस सुरू झाला. समोरच गर्द हिरवळ होती आणि त्यात असंख्य मोती विखरून ठेवल्यासारख्या त्या गारा दिसल्या... अगदी ५-१० मिनिटे वितळेपर्यंत. आम्ही वर्गातील ८-१० मुले व मुली तेथे होतो आणि 'तसे' काहीही नसताना उगीचच तो शॉट मला कायम रोमॅंटिक वाटतो. कदाचित 'रिमझिम गिरे सावन...' सारख्या पावसाळी वातावरणातीलच वाटणार्‍या गाण्यांचा परिणाम असेल पण नेहमी दिसणार्‍या मुलीही अशा वेळी आम्हाला कदाचित जास्त सुंदर वाटत. आम्ही, म्हणजे मुले, त्यांना कसे दिसायचो कोणास ठाऊक?

आमच्या घरासमोर काही जण पावसात खेळताना मी छोटे बर्फाचे तुकडे असलेल्या ट्रेमधला बर्फ त्यांच्या अंगावर आम्ही दिसणार नाही असा फेकायचो. मग ते ही गारा पडतायत असे समजून वेचू लागायचे, आणि तो ठराविक चौकोनी आकार पाहिल्यावर त्यांच्या लक्षात यायचे (एक दोघांच्या तरीही यायचे नाही). सर्वात मोठ्या गारा मी लिंबाच्या आकाराच्या पाहिल्या आहेत पण त्याहुनही मोठ्या असतात म्हणे. याच सुमारास कोठेतरी बातम्यांत केरळच्या किनार्‍यावर मॉन्सून आला आहे असे कळायचे आणि काही दिवसांनी तो चालू व्हायचा. कधी मधे बराच खंड पडायचा तर कधी वळवाचा कुठला आणि मॉन्सून कुठला कळत नसे.

पावसात क्रिकेट खेळता येत नसे, फूटबॉल खेळायला जास्त मजा यायची, पण का कोणास ठाऊक ती आवड टिकली नाही. पण लोखंडी गज किंवा जरा टणक फांदी घेऊन रस्त्यालगतच्या मातीत 'रवारवी' खेळणे हा पाऊस थांबल्यानंतर चा आवडता खेळ असे. म्हणजे प्रत्येकाने तो गज जोरात आपटायचा, माती असेल तर तो रोवला जाऊन उभा राहतो, नाहीतर पडतो. त्यावेळी असे पाहिजे तेव्हा गज कोठे मिळायचे कोणास ठाऊक? त्यावेळी मला 'गज' शब्दाचा तोच एक अर्थ माहीत होता (हिंदीतील मोजमाप माहीत नव्हते) त्यामुळे 'दो गज ज़मीन के नीचे' यात गजासंबंधी एवढे भीतीदायक काय असेल ते कळत नसे.

आणि पुण्यातील पाऊसही मला वाटते तेव्हा कमी असायचा. बालकवींनी "क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे" हे कदाचित पुण्याच्या पावसाबद्दल लिहिले असावे, कारण तेव्हा साधारण ऑगस्ट मधे पुण्यात तसाच पाऊस पडत असे. म्हणजे कोणी फारसे भिजत नसे. मग कधीतरी धरणातून पाणी सोडले की मुठा आपले खरे रूप दाखवायची, ते पाहायला लकडी पुलावर झुंडी च्या झुंडी यायच्या. एरव्हीची मुठा बघताना विश्वासही बसणार नाही की 'वरती' एव्हढे पाणी आहे. पुलाच्या कमानीपर्यंत पाणी आले की पुलाच्या मध्यभागी उभे राहून खाली एकटक बघितले की पाणी पुढे जात नसून पूल आणि आपणच उलट्या दिशेला जात आहोत असे वाटायचे. मात्र या लेव्हल ला पाणी आले की किनार्‍यावर राहणार्‍या लोकांचे खूप हाल व्हायचे. अर्थात मुठेच्या पाण्याची पातळी आधी ठरवूनच एवढी वाढत असल्याने त्या लोकांची व्यवस्था करणे शक्य असायला हवे, प्रत्यक्ष किती करतात काय माहीत.

आमच्या घराबाहेरच रस्ता असल्याने पावसाचे वाहणारे पाणीही लगेच दिसायचे. त्यामुळे त्यात कागदाच्या होड्या करणे, थोडीशी माती लावून धरण वगैरे बांधायचा प्रयत्न करणे वगैरे असले उद्योग चालायचे. त्या होड्या पाण्यात कलंडायच्या म्हणून आम्हाला कोणीतरी डबल होडी शिकवली होती, त्यात दोन होड्या असल्याने ती पाण्यातून 'स्टेबल' जायची. पाऊस खूप जोराचा झाला की रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहणारे ओहोळ मोठे होऊन रस्ताच व्यापून टाकायचे.

हे पाणी आता घरापासून खूप लांब राहिले, किंवा आम्ही त्यापासून लांब आलो. वय वाढले म्हणून, फ्लॅट मधे आलो म्हणून की बदलत्या काळाचा अपरिहार्य परिणाम म्हणून, सांगता येत नाही. पण असे वाटते की आपल्या पुढच्या पिढीचा हा पावसाशी एव्हढा जवळाचा संबंध येत नाही. घरातून पाऊस पाहणे आणि कधी येता जाता त्यात भिजणे यापेक्षा असंख्य वेगळ्या गोष्टी पावसाशी संबंधित असतात त्याचे अनुभव त्यांना मिळाले नाहीत तर त्यांना कदाचित कळणारही नाही पण आपल्यालाच वाईट वाटेल ते कशाला मुकतायत याचे. कदाचित असेही असेल की आपल्या आधीच्या पिढीने असेच वेगवेगळे अनुभव आपल्यापेक्षा जास्त घेतले आणि प्रत्येक पिढीला हे असेच वाटत असणार. येथेही अमेरिकेत पाऊस आल्यावर कोणते शेतकरी काय करतात त्याच्या किंवा 'ओंकारेश्वर पावसाळ्यात एकदा तरी बुडतोच किंवा गणपतीच्या दहा दिवसांत एकदा तरी पाऊस येतोच' अशा कहाण्या गावागावांत असतीलही पण 'सबर्ब' मधे राहून त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. आणि तसे झाले तरी या पिढीला त्या आपल्या गोष्टी ऐकायला आणि अनुभवायला मिळत नाहीत असे वाटेलच.

छे! त्यापेक्षा कालनिर्णय कडे इतक्या वेळ बघायलाच नको! कॉम्प्युटर च्या कॅलेंडर मधे मे आणि जून मधे तारीख वार सोडले तर काही फरक दिसत नाही, तेच पाहणे बरे!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी पाऊस आणि पावसाचं वातावरण उभं राहीलं.
सुंदर लेख !

पाऊस आणि थंडीताप ही आठवण आहे. लो़णावळा, तोरणा, सिंहगड, खडकवासला, कार्ले - भाजे लेणी,लोहगड हे सगळं आठवलं.

लेखामुळे अनेक आठवणींना उजाळा मिळाला. लेख मस्त आहे.
मी कँटॉन्मेन्ट एरियात रहात होते. समोर टेकडी. टेकडीवरती मेंढपाळ मेंढ्या आणत. एकंदर फार निसर्गसंपन्न भाग. पहील्या दुसर्‍या म्हणजे, हस्ताच्या पावसानंतर मला वाटतं किती मुंग्यांना पंख फुटायचे. असंख्य मुंग्या घरात ट्युबलाईट, बल्ब भोवती फिरु लागायच्या. पक्ष्यांची तर चंगळच होत असे. हवेतच मुंगी पकडून मटकावणे. आणि खरच सांगते हजारो बेडूक विविध साईझचे म्हणजे लहान मोठे बाहेर पडत. रात्री तो डरांव आवाज ऐकत झोपणे फार मस्त वाटे. नेमका बिल्डिंगच्या बाहेर मोठ्ठा गटाणा टोड बसलेला असे म्हणजे आमची फेफे. घरी तर जायचय पण पायरीच्या कोपर्‍यावरती हा भला मोठा बेडूक.
मुले तो गजवाला खेळ खेळत आम्ही मुली खेळत नसू. आम्ही खूप चकरा मारत असू. कॉलनी बाहेर , कॉलनीच्या आत. २-३ मुलींचे कोंडाळे करुन भटकणे, फेरफटका मारणे हा आवडता उद्योग.
नव्या वह्या पुस्तकांचा वास - हे मात्र अगदी खरे आहे. खूप आवडे मला. शाळा सुरु झाली की आपले नाव वहीवरती घालणे. काही मुलींकडे सेंटेड इरेझर्स असत. मग त्यांचे आकारही फुलपाखरु, कुत्रा, घर असे काय काय असत. तो सुगंध फार आवडे. गारा पडलेल्या खूपदा पाहील्यात अगदी अमेरिकेतही क्वचित पाहील्यात. गारा वेचायला उलटी छत्री धरलेली आहे. त्यांची चवही जीभेवरती आहे. आणि स्फटिकासारखे रुप.

टपटप टपटप काय बाहेर पडतय ते पाहू
चल ना आई चल ना आई त्या पावसात जाऊ Happy

क्वचित इंद्रधनुष पाहीले आहे. पण बे एरियात मात्र इंद्रधनुष्य अतिकॉमन आहे. अगदी डबल इंद्रधनुष्यही अतिकॉमन च आहे.

मस्त लिहिलंयस फा. लहानपणी अनुभवलेले कित्येक पावसाळे डोळ्यासमोर तरळून गेले.

“ शाळेच्या दुसर्‍या मजल्याच्या जवळ असलेली पानशेत च्या पुराच्या वेळची पाण्याची लेव्हल दाखवणारी रेघ” - सेंट विमलीज??

छान लेख, जून July ऑगस्ट सगळेच कव्हर झाले.

तसे बरेच गोष्टी रिलेट झाल्या. पण खालची रिलेट झालेली गोष्ट मजेशीर वाटली.

<<<<< पावसात क्रिकेट खेळता येत नसे, फूटबॉल खेळायला जास्त मजा यायची, पण का कोणास ठाऊक ती आवड टिकली नाही.>>>>>

सेम असेच.. कदाचित ती आवड फुटबॉलची नसून पाऊस पाणी चिखलात कसलाही विचार न करता मित्रांसोबत तुफान धावता येते याची असावी.

लेख आवडला.

पाऊस श्रावणातला आवडायचा.
नाहीतर "पाऊस म्हणजे चिखल सारा.." हे आणि असेच डोक्यात येई.
गाड्या बंद पडणं, उशिरा धावणं, लाईट जाणं, पाणी साठण हे दर पावसाळ्यात एक दोनदा तरी होई.

पाऊस पडत असताना धो धो पावसात चिंब भिजायला आवडे, सायकल जोरात हाणत, तोंडावर येणारा पाऊस आवडे.
पण नंतरचा तो चिखल, रापरापाट, ड्रेस वर उडणारा चिखल हे सर्व अजिबात न आवडणारे .

बाहेर पाऊस पडत असताना , घरी बसून आरामात कॉफी/ वडापाव/ भजी (आयत बसून) खावे, छानसे पुस्तक हाती मिळावे आणि पायावर पाय टाकून ते मस्त वाचत बसावे.. असा पाऊस जास्त हवासा वाटतो. खिडकीतून दिसणारा, ऐकू येणारा, जाणवणारा... Happy
लोकल ने प्रवास करू लागल्यावर दुसऱ्याच्या छापल्या पाय त्या गर्दीत आपल्या पायावर पडू नये याची प्रार्थना करावी लागे Happy

मस्त.. मजा आली वाचताना.
दिव्यांची आवस तेव्हा गटारी झाली नव्हती आणि नारळी पौर्णिमा रक्षाबंधन ह्याला अनुमोदन ... ह्यात आणखी एक भर म्हणजे गणपती तेव्हा बप्पा ही नव्हते. Happy

हा लेख फारेण्डचा आहे , हे सांगितलं नाही, तर फारेण्डचा वाटणार नाही - पहिल्या परिच्छेदातला सिनेमा इफेक्ट मात्र खास फारेण्ड . लेख आवडला अर्थात.

तुमच्या कालनिर्णयात ज्येष्ठ महिना नाही का? पाऊस ज्येष्ठातच सुरू व्हायचा ना? वटपौर्णिमाही असते.

मस्त!
मी कायमच कोकणी पाऊस अनुभवल्यामुळे पुण्याचा पाऊस माहिती नव्हता, पालखीचं वातावरण अनुभवलं नव्हतं! आईकडून पानशेतच्या आठवणी ऐकून होते.

आवडलंच हे!

फा, सुंदर आणि चित्रदर्शी लेख.
यातील बऱ्याच गोष्टी अनुभवल्या आहेत.
गावाकडील आणि मुंबईतील पावसाच्या आठवणी मनात अजून घर करून आहेत.
गावी पावसाळा सुरू झाला की शेतीच्या कामांना ऊत आलेला असे. मृगाचा किडा दिसला की त्यावर हळद कुंकू टाकलं जायचं. आषाढ तळला जायचा. घरामागे खाचरात पाणी साठल की भात लावणी व्हायची. बेडकांचा कान फाडणारा आवाज रात्रंदिवस चालू व्हायचा. काही बारक्या बेडक्या तर पार घरात यायच्या. बेडूक मारला तर पुढच्या जन्मी माणूस मुका होतो यावर आमचा गाढ विश्वास असायचा. गावातल्या नदीला किती पाणी आलं ते बघायला सारखं जायचो. ओरडा मिळायचा त्यासाठी. छत्री पेक्षा पोत्याची खोळ जास्त सोयीस्कर वाटायची वापरायला.

इकडे मुंबईत पावसाची चाहूल शाळेची पुस्तके दप्तर आणि सँडल किंवा गम बूट खरेदी करून चालू व्हायची. त्यात पाणी गेले की चालताना तो पचाक पचाक आवाज काढून चालायला मजा यायची. आम्हाला एकरंगी, शक्यतो काळाच रेनकोट असायचा. तोही जुनाच. पण रंगीबेरंगी रेनकोट हवाहवासा वाटे पण तो काही मिळायचा नाही.
शाळेला श्रावणी सोमवारी अर्धी सुट्टी. आई, आजी कहाण्या वाचत. कधीतरी आम्हाला वाचायला सांगत. आघाडा, दुर्वा, माका सहज मिळत असे. रोवारोवी आम्ही पण खेळत असू.
घरात सगळीकडे कपडे वळत घातलेले असायचे. लाईट तर हमखास जायची. गारा वेचायला भांडे घेऊन जायचो. ते 'आ' करून पाणी प्यायचो आम्हीपण Happy घामोळे झाले असतील तर पहिल्या पावसात भिजायला रीतसर परवानगी दिली जायची.
बसमध्ये , ट्रेनमध्ये खिडकीच्या बाजूच्या सीटवर पाणी असले की हातातल्या छत्रीने पुसून बसायचो. टिश्यू पेपर अजून जन्माला यायचा होता. दरवर्षी घरातल्या एकाचा तरी छत्री हरवण्याचा/ विसरण्याचा कार्यक्रम यथासांग पार पडायचा.
सर्दी पडस खोकल्याची साथ यायची, काढे केले जायचे. यासाठी डॉक्टर फार माहीत नव्हता. पाण्यात खेळणे, साधी होडी, डबल होडी, बंब होडी करून शर्यत लावायची.
एखादा भिजून आला की खिशातल्या ओल्या झालेल्या नोटा तव्यावर वाळवल्या जायच्या.
अजून बऱ्याच आठवणी....

सुरेख.

पुण्यात गारा कॉमन पण आमच्याकडे गारा पडत नाहीत आणि ते आकर्षण वाटायचं, मी एकदाच डोंबिवलीत गारा बघितल्या.

1986 च्या डिसेंबर मध्ये डोंबिवलीत गारा पडलेल्या. साल लक्षात आहे कारण त्याचवर्षी आम्ही नव्या घरी राहायला आलेलो. महिना चुकीचा असू शकतो, पण सप्टेंबर नंतरच असावा.

भन्नाट लिहिलंयस, फा! बर्‍याच गोष्टी रिलेट झाल्या. शेवटी एकाच शहरातले आणि बरेचसे समकालीन आहोत आपण Happy
वर्णनं अगदी चित्रदर्शी आहेत. काही काही ठिकाणी असं वाटलं की माझ्याच डोक्यातले शब्द उतरवले आहेत.

तेव्हा कर्वेनगरात खूप शेतं वगैरे होती. हिरवाई पण भरपूर. पावसाळा निसर्गसंपन्न असायचा अगदी. आमची शाळाही तशीच भरपूर झाडं असलेली. खूप मस्त वाटायचं. ठळकपणे आठवतात ती मधल्या सुट्टीत भिजत गोळा केलेली बुचाची फुलं.

प्रसन्न करणारा लेख आहे. आवडला.

डोंबिवलीत गारा ????

१९८६ म्हणजे मी खूप लहान असणार त्यामुळे आठवत नाहीये Happy

मस्तच लिहीले आहेस फा!
यातील बर्‍याच गोष्टी केल्याच आहेत.

कोर्‍या वह्या-पुस्तकांचा वास, काही हुशार मुलांनी वह्या-पुस्तकांना लावलेली प्लॅस्टिक ची कव्हरं, शाळेच्या ग्राउंड वर चहाच्या रंगाचे साठलेले पाण्याचे डबके , सायकलीच्या चाकात जमलेला चिखल, श्रावण सोमवारी संध्याकाळी हमखास केली जाणारी शिकरण-पोळी आणि सन्ध्याकाळी लवकर सोडलेला उपास..... ट्रांसपरंट रेनकोट चे आकर्षण!
खूप आठवणी आहेत.
पावसाळा सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी सर्वांच्या अंगणातील झाडीत दिसणारा तो हिरवागार रंग अजूनही डोळ्यासमोर आहे पण त्याचे नेमके वर्णन करता येत नाही. >>

हे वाक्य मनाला भावले आहे!
आमच्या घराजवळच रेल्वे कॉलनी होती. तिथली जुनी पण एकसारखी कौलारु घरे आणि त्यासमोर फक्त पावसाळ्यात पसरलेली हिरवळ पाहून अगदी असेच वाटायचे.

सुंदर पण फा चा आहे हे नाव वाचल्याशिवाय न कळणारा लेख!
Happy

>>>>>पावसाळा सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी सर्वांच्या अंगणातील झाडीत दिसणारा तो हिरवागार रंग अजूनही डोळ्यासमोर आहे पण त्याचे नेमके वर्णन करता येत नाही.
गारुड असतं ते. आत काहीतरी लक्ककन हलतं आणि नंतर तो रंग आठवला की नॉस्टॅल्जिक होतो आपण.