प्रेमकविता

उताराची वाट

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 25 June, 2019 - 10:25

वाटेवरी उतारी त्या
हात हातात कुणाचे
भलतेच काय बरे
वेड्या असे वागायचे

रितभात जगताची
काय तुला ठाव नाही
चढ उताराची धाव
मध्ये कुठे गाव नाही

कुणी कुणा सावरावे
कळण्यास वाव नाही
कुणी कुठे घसरावे
थांबण्याचे नाव नाही

जाणणारे अंध डोळे
अर्थ तोच मोजणारे
उमटून प्रश्न मनी
भुवयात अडणारे

सांग बरे तूच आता
यात असे काय खरे
उताराचा स्वभाव वा
बहाणा ही वाट धरे

प्रेम..

Submitted by मन्या ऽ on 19 June, 2019 - 23:32

प्रेम..

प्रेम म्हणजे
अथांग सागर
प्रेम म्हणजे
वाळवंटातील मृगजळ
ज्याने तहानलेल्याची
तहान काहीकेल्या
भागत नाही

प्रेम म्हणजे
विश्वास
प्रेम म्हणजे
आपुलकी
जो वेळप्रसंगी
माणुसकीला जागलेच
असे नाही

प्रेम म्हणजे
अटी
प्रेम म्हणजे
बंधन
जे माणसाला
एक माणुस म्हणुन
वागवत नाहीत
मुक्तपणे जगु देत नाही

मी गुलाब आणले होते..

Submitted by रोहितगद्रे१ on 12 March, 2013 - 10:57

मी गुलाब आणले होते
काटे काटे ते काढून
नव्हते माहीत तेव्हा
काय ठेवलाय वाढून...!!
मी गुलाब आणले होते
तुला तुलाच द्यायला
तुझ्या नजरेचे बोल
सारे टिपून घ्यायला...!!
मी गुलाब आणले होते
लाल लाल मखमली
आत खोल काळजात
होती दसरा दिवाळी
मी गुलाब आणले होते
तू दिसता दिसना
इथे तिथेही पाहिले
कुठे कुठेच भेटेना...!!
दिस ढळत निघाला
चालले गुलाब कोमेजून
माझे मीच ते तेव्हा
गेलो होतो समजून
बसलो दूर पारावर
लागेना कशाचाच थांग
कापर शिरशिरी भरे
सुन्न झालं होत अंग
तुला दिलेच नाहीत
देऊ आता त्या नदीला
गेला हात बाजूला ते
गुलाब घ्यायला
नव्हते तिथे ते गुलाब

उत्सव

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 14 February, 2013 - 09:27

मागे वळता दिसते जेव्हा
संसाराची चौकट हसरी
नकळत होते कशी अचानक
पापण्यांची या झालर भिजरी

आठवणी नव नवलाईच्या
लख्ख काही अन्‌ काही पुसटशा
काही गाफिल, सावध काही
चुकार अन्‌ लडीवाळ जराशा

कधी उतावीळ, कधी अनावर
शांत डोह कधी उगाच डचमळ
आवरतांना सावरतांना
सैरावैरा उठते मोहळ

आठवात त्या भिजतांना मग
काळ जरासा थांबून जातो
तुझ्यासवे या जगण्याचा मग
उत्सव होतो... उत्सव होतो.

जयश्री अंबासकर

शब्दखुणा: 

~ शराबी शराबी ~

Submitted by Ramesh Thombre on 1 June, 2012 - 01:36

असा धुंद वारा, शराबी शराबी.
तुझा स्पर्श न्यारा, शराबी शराबी.

कशाला भुलावे, उगी त्या नशेला
तुझा ओठ प्यारा, शराबी शराबी.

जगावे कळेना, मरावे कळेना
तुझा दोष सारा, शराबी शराबी

उद्याला करावा, तुझा त्याग थोडा
असे फक्त नारा, शराबी शराबी

तुझे शब्द राणी, कसे सावरावे
सुरांचा पसारा, शराबी शराबी.

नको पावसाळा, नको चिंब होणे
नशेच्याच धारा, शराबी शराबी.

मनाची कवाडे, मनाच्याच भिंती
मनाचा पिसारा, शराबी शराबी

कसा रे रमेशा, कुणी घात केला
नशेने बिचारा, शराबी शराबी.

- रमेश ठोंबरे

गुलमोहर: 

त्याचे येणे

Submitted by मृण_मयी on 9 April, 2011 - 03:49

स्पर्श अहेतुक झाला होता असे वाटले
सहज जवळ तो आला होता असे वाटले ||धृ||

नयनी लज्जा, अनाहूत गालावर लाली
तप्त श्वास अन्‌ उरात धडधड सोबत आली
एकटाच तो आला होता असे वाटले ||१||

स्वागत करण्यासाठी लज्जित शब्द जुळवले
अबोध ओठांवरुनी त्याने अलगद टिपले
मद्याचा तो प्याला होता असे वाटले ||२||

अशाच गाठीभेटी व्हाव्या सांज-सकाळी
अशीच व्हावे राधा मी अन्‌ तो वनमाळी
पावा हृदयी घुमला होता असे वाटले ||३||

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - प्रेमकविता