सवय

Submitted by मुग्धमानसी on 15 April, 2020 - 00:39

चार भिंतींनाही असते दोन डोळ्यांची सवय,
बंद कुलुपालाच कळते काय अन कसली सवय!

बंद खिडक्या आत बघणे टाळती... कुढती जणू!
स्थिर पडद्यांना चिकटते मंद वाऱ्याची सवय!

सावलीतून कोंडलेले उन्ह प्राशून तप्त ती
फरशीवर रांगती अनाहूत पायरव... त्याची सवय!

बैठकी खुर्च्या तपेली जीव ते निर्जीवसे...
एकमेकां सांगती त्या रम्य स्पर्शाची सवय!

त्या पलंगावर पहुडलेल्या डहुळ निद्रेसही
सोडवेना भाबड्या अंगाईगीतांची सवय

त्या पसाऱ्यातून तुंबून राहिला एकांत का?
त्यास पुन्हा लागलेली मुक्त घुमण्याची सवय!

पुस्तके चित्रे फुले ते रंग अन ती धुळही
मूक शब्दांनी गिरवते एक गुणगुणती सवय!

त्या घराला श्वास आहे थंड आतूर संथसा
त्या लयीवर थिरकण्याची मी कशी विसरू सवय?

मी पुन्हा येईन तेंव्हा हास हरखून हे घरा!
मी सुधा खोलेन माझी बंद खोल्यांची सवय!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults