तो मूर्ख म्हणाला मला

Submitted by मुग्धमानसी on 30 April, 2019 - 02:37

तो मूर्ख म्हणाला मला, असा लागला, जिव्हारी भाला...
तळपला असा अधिकार, अनाहूत वार, सवयीचा झाला!

तो मूर्ख म्हणाला मला....

तो मूर्ख म्हणाला मला, पावले जरा जरा अडखळली,
शून्यात बुडाली वाट, जळून पहाट, पुन्हा मावळली!

तो मूर्ख म्हणाला मला, खोल कुणीकडे, छेडला षड्ज,
शांतता अशी ओरडली, मौन बडबडली,
मनाची गाज!

तो मूर्ख म्हणाला मला, एवढे काय त्यात कोसळले?
तू तीच तोही तो तोच तेच शिरपेच पुन्हा पाजळले!

तो मूर्ख म्हणाला मला....

का मूर्ख म्हणाला मला? बोलले काय जरा नावडते?
की असे वागले या बुद्धीचे कौतुक सारे झडले?

मी बुद्धी माझी... मीच देह हा माझा
हा शब्दही माझा, दुखरा अर्थही माझा!

तो मुर्ख म्हणाला मला, असो.. ते काही अवचित नाही!
मी आहे जी मी असते जे ते कुणास उमगत नाही.

मी मूर्खही नाही, बुद्धीमानही नाही.
मी काही शब्दांतून प्रकाशत नाही!

तू मूर्ख म्हणावे मला, याहिवेगळा, कुठे सन्मान?
प्रतिसाद तुझा, अभिमान... तुझे मी भान!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults