या भेटीच्या नंतर...

Submitted by मुग्धमानसी on 5 January, 2021 - 08:44

या भेटीच्या नंतर थबकून
जाईल हा बनवास ऋतूविण
या झाडांना, फुला-फळांना
बघशील तू निव्वळ भांबावून

या भेटीच्या नंतर उधळील
माती भिरभिर वादळ इवले
असण्या-नसण्याच्या काठाशी
बसताना घे मिटून डोळे

या भेटीच्या नंतर जे जे
उगवून येईल त्या वाटांवर
ते ते सारे घुटमळेल पण
देऊ नको तू त्यांना उत्तर

या भेटीच्या नंतर अलगद
पुसून घे तू सगळी अडगळ
हिरव्या तांबूस उग्र क्षणांचा
टाक पिऊन तो उत्कट आगळ

आणि तरी शुद्धीत रहा तू...
देऊ नको हे पुन्हा निमंत्रण
बघता बघता एका साध्या
धूळभेटीचे होते बंधन!

या भेटीच्या नंतर केंव्हा...
कधीतरी फारा दिवसांनी
तळव्यावरच्या फिक्या खुणांतून
निर्झरेल सौख्याचे पाणी!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त!