माहीत नाही!

Submitted by मुग्धमानसी on 6 January, 2021 - 00:32

हे जे काही पडले आहे
यात काही जे जडले आहे
माझे होते किंवा आहे,
माहीत नाही...

ते काही जे घडले आहे
त्यातूनच मी घडले आहे
काही आत बिघडले आहे,
माहीत नाही...

काल कालची हुरहुर होती
आज आजची भिरभिर आहे
उद्या कशाची कुरबुर आहे,
माहीत नाही...

जे बोलावे बोलत नाही
कुणी ऐकावे? कुणीच नाही...
तरी कोण... जे ऐकत नाही?
माहीत नाही...

आठवते ते काय असावे?
त्यात काय जे विसरून जावे?
खोडावे नी काय लिहावे?
माहीत नाही...

अंधाराचा एक दिलासा
दिसेचना कोणास पसारा
पुन:श्च घर आवरते आहे....
.


माहीत नाही!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults