तिची तब्येत सद्द्या बरी नाही!

Submitted by मुग्धमानसी on 24 July, 2019 - 07:25

तिची तब्येत सद्द्या बरी नाही!

तिच्या ओठावरचं हासू अजून मावळलेलं जरी नाही...
तिची तब्येत खरंच बरी नाही!

उन्हाळा भर देहावर झेलत कडेकडेनं आटत जावं एखाद्या नदीनं...
तशी ती कणाकणानं संपत चालली आहे.
स्वत:च स्वत:ला होले होले कुरतडत
स्वत:ची स्वैर अमर्याद रेघ अल्लाद खोडत
ती स्वत:ला पुसत चालली आहे...!
तिच्या देहावरलं कणभरही मांस ढळलेलं जरी नाही....
तरी तिची तब्येत खरंच बरी नाही!

पूर्वी जी अंतरं ती सहज ओलांडायची... एका धावेत...
आता त्यांच्याकडे पाहतानाच ती दमल्यासारखी दिसते
पूर्वी भिरभिर धावायची अन् असायची निघून गेल्यावरही
आता जिथे खरंच असते... तिथंही ती सहसा नसते!
हल्ली जरा थकलीये, फार स्वप्न पहात नाही
झोप आली - भरून पावलं! डोक्यात काही रहात नाही!
वेंधळलेलं ध्यान तिचं जगताना गोंधळतं,
रस्ते धुंडून भांबावल्यागत त्याच चौकाशी रेंगाळतं!
तिचं चित्तं बुद्धिपासून अजून चळलेलं जरी नाही...
मला माहीतेय तिची तब्येत बरी नाही!

मला माहितेय तिच्या जिभेला आताशा चवच लागत नाही
स्पर्श असो पावसाचा... फुलांचा... वा माझा....
शहार्‍याची कविता तिच्यात म्हणावी तशी जुळत नाही!
ती आताशा पेटत नाही धगधगीत ज्वाळेसारखी
माझ्या नभात भरारत नाही बगळ्यांच्या माळेसारखी
हसते काही कळल्यावर
रडते नजर वळल्यावर
समजलंय मला हे अजून तिला कळलेलं जरी नाही...
मला माहीतेय तिची तब्येत बरी नाही!

चढ उतारावर रूप पालटणारे तिचे मूड्स... तिचे रंग....
तिचे कुढणारे हार्मोन्स तिचे बदलणारे ढंग...
अजूनही खोल रुजून प्रसन्न हुळहुळणारी तिची जगण्याची झिंग!
तिचा राग! तिचा हळवेपणा!
मलाही झिडकारण्याचा तिचा सपशेल वेंधळेपणा!

मी जरासा लांब थांबून पाहतोय तिला... निथळताना...
माझ्या आतून पुन्हा पुन्हा तिचे ऋतू कोसळताना!
जराशानं वाहून जाईल सारं काही साचलेलं
ओली नजर ओतत राहील कधीकाळी वाचलेलं
ती रिकामी होईल तेंव्हा... ताप सरून जाईल तेंव्हा...
तेंव्हा... त्या क्षणी.... मी तिला कवेत घेणार आहे!
पुन्हा पुन्हा कितीही वेळा... मी हेच करणार आहे!
मी तिचं ’ती’पण आहे!
जेंव्हा जेंव्हा ती शोधेल मला... मी... मी तिला सापडणार आहे!
मी इथंच थांबणार आहे!

माझी माया काही तिच्या लहरींसारखी अधांतरी नाही!
फक्त सद्ध्या तिची तब्येत बरी नाही!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Great

छान!