अज्ञात

Submitted by मुग्धमानसी on 19 January, 2021 - 12:42

मी एका अज्ञात जागी येउन अडकलेय
हे रस्ते अनोळखी आहेत
घरांचे दरवाजे बंद आहेत
झाडांच्या सावल्या निष्पर्ण आहेत
झर्‍याच्या पाण्याला ओळखीचा आवाज नाही
पाण्याची चव अनोळखी...
सगळं गाव काळोखी...

धुळीनं माखलेल्या पायांना
या वाटा थारा देईनात
इथं तिथं सगळीकडे... अंधारात पेरलेले सोबती
पण तेही काही साद देईनात
कोलमडून मला स्वत:तच कोसळताना पाहताहेत
पण ते माझ्या हाती हात देईनात

मला वाटा शोधायला हव्यात
की... त्याच भिरभिरत आल्यात अश्या इथवर?
मलाच शोधत?
आणि स्वत:लाच हरवून बसल्याहेत?

या अंधारात काही कळत नाही!
मला डोळे आहेत की नाही?
हे जे वारे इथं धूळवड उडवताहेत...
हे माझ्याही आत वाहताहेत की नाही?
आणि यांतही मिसळलेला
एकही ओळखीचा गंध का नाही?

मी अज्ञात जागी येऊन अडकलेय
इथवर पोहोचण्याचा रस्ता मला विसरलाय
इथून निघण्याचा रस्ता मला माहीत नाही
शिवाय हा काळोख!

पोटात भूक हजार श्वापदांची उसळी मारत....
काळोखानं झिंगलेल्या मस्तकात
अज्ञाताचे वळवळते किडे
अनाकाराची ठसठसती खोल भीती दाखवत....
डिवचत. चिडवत.
आणि मी... इथं.... भर रस्त्यात...
सर्वांगाचे हात पसरून....
अंधार वेचत. सांडत.

नीज येत्येय.
या अज्ञात अंधार्‍या रस्त्याला कुशीत घेऊन,
पोटातल्या आदीम भुकेला शिदोरीतल्या शेवटच्या स्वप्नांचे तुकडे चारून...
मस्तकातल्या वळवळत्या भीतीची चादर पांघरून
आता इथंच नीजून जावं म्हणते.

तर....
मी इथं या अज्ञात जागी पोहोचलेय.
इथंच शांत निजलेय.

काळजी नसावी.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान!