संशोधनाच्या दरम्यान अनेक मनोगतं ऐकली. त्यांचा अभ्यास करावा लागला. त्यामुळे जुन्या समजूती मागे पडल्या. दु:खाच्या अतिरेकाने, प्रेमात वैफल्य आल्याने माणसे दारुला जवळ करून व्यसनी होतात असे हिन्दी चित्रपट पाहून वाटायचे. आजुबाजुला तसे कधी घडताना दिसले नाही. प्रत्यक्ष संशोधनाच्या वेळीही तसे दिसले नाही. बहुतेकांनी झिंग येण्यासाठी, उत्सुकता, गंमत म्हणून दारुचा प्याला जवळ केला होता. पण माणसे दारु कधी सोडतात, कशामुळे सोडतात हा भाग सुद्धा महत्त्वाचा होताच. ते अभ्यासताना मात्र काही पॅटर्न दिसून आला.
स्वमदत गट हा संशोधनाचा विषय घेतला तेव्हा हा विषय अफाट आहे याची थोडी कल्पना आली होती. मात्र या विषयात आजारागणिक प्रचंड गुंतागुंत आहे हे तेव्हा तितकेसे लक्षात आले नव्हते. प्रत्येक स्वमदत गट हा गंभीर समस्येसाठी कार्यरत असला आणि बहुतेक स्वमदत गटांची काम करण्याची पद्धत जी काही अंशी सारखी असली तरी त्यात खुप वैविध्य देखिल आहे. काम करण्याची पद्धत सारखी याचा अर्थ स्वमदत गटात विशिष्ट आजार असलेली किंवा समस्या असलेली माणसे एकत्र येऊन एकमेकांना मदत करतात. त्यांच्या नियमित सभा होतात, त्यांच्या गटातर्फे तज्ञांना बोलावून व्याख्याने ठेवली जातात. त्यांच्या सहली निघतात.
श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये