स्वमदत गट, आजच्या काळाची गरज - १

Submitted by अतुल ठाकुर on 3 December, 2018 - 06:40

images_0.jpg

समाजशास्त्र विषयात संशोधन करायला स्वमदतगट हा विषय घेतला होता. पण ठरवलं होतं की हा विषय निव्वळ प्रबंधापुरता मर्यादित ठेवायचा नाही. याबद्दल जास्तीत जास्त लोकांना माहिती द्यायची. सुदैवाने निरनिराळ्या आजारांशी चालवल्या जाणार्‍या स्वमदत गटांचे कार्य पाहण्याची संधी मिळाली. त्याबद्दल लिहावेसे वाटते. अनेकदा असं वाटतं की अल्कोहोलिक अ‍ॅनॉनिमस सारखा अपवाद वगळला तर स्वमदतगट ही संकल्पना आपल्याकडे फारशी रुळलेली नाही. अनेकांना असं काही असतं याची कल्पनादेखिल नसेल. खरं तर आपल्या प्रत्येकाचीच स्वतःची अशी सपोर्ट सिस्टीम असते. ती कुटुंबियांशी निगडीत असेल किंवा मित्र मैत्रिणींशी, कदाचित काही नातेवाईकांमध्ये रमत असतील. पण आपल्याला समस्या आली की आपण काही थोडक्या लोकांकडे मन मोकळं करतो. त्यांना सल्ला विचारतो. आपले जिवलग मित्र, आप्तेष्ट, अनुभवी हितचिंतक आपल्याला योग्य सल्ला देतात आणि आपण त्याप्रमाणे काम करतो. स्वमदतगटाची संकल्पना याहून फार वेगळी अशी नाही. पण त्याचे स्वरुप गुंतागुंतीचे आहे. हे स्वरुप आपल्याला क्रमाने पाहायचे आहे.

बरेचदा इंटरनेटमुळे माहितीचा स्फोट झाला आहे आणि आता हवी ती माहिती आपल्या आवाक्यात आली आहे असा सर्वांचा समज असतो. तो एका अर्थाने खराही आहेच. पण खरा प्रश्न नीरक्षीरविवेकाचा असतो. माहिती प्रचंड आहे पण त्याची विश्वसनीयता काय? त्यातून आपण काय निवडायचे? याचे उत्तर संगणकावर मिळणार्‍या माहितीत असेलच याची खात्री देता येत नाही. शिवाय आयुष्यात अशी परिस्थिती येऊ शकते जेथे हाडामासाच्या माणसांशी बोलणे, बोलायला मिळणे हाच एक महत्त्वाचा उपाय ठरतो. अशी परिस्थिती कोणती हे आपण पुढील लेखांमध्ये पाहणारच आहोत. स्वमदतगट अनेक प्रकारचे असतात. किंबहूना स्वमदत गट या सदराखाली अनेक समाजसेवी संस्था येऊ शकतील. येथे चर्चा होणार आहे ती फक्त निरनिराळ्या आजारांसाठी चालवल्या जाणार्‍या स्वमदतगटांबाबतच. अल्कॉहॉलिक अ‍ॅनॉनिमस च्या सभा या देखिल स्वमदतगटांप्रमाणेच आहेत. मुक्तांगणसारख्या संस्था व्यसनी रुग्णमंडळींसाठी तीस दिवसांचे निवासी उपचार देतात. त्यानंतर त्यांनी फॉलोअप सभांना हजेरी लावावी अशी अपेक्षा असते. या फॉलोअप मिटिंग्ज म्हणजे स्वमदत गटच आहेत.

मात्र इतर अनेक आजारांसाठी जे स्वमदत गट चालवले जातात त्यांच्या मागे मुक्तांगणसारखी एखादी संस्था असेलच असे सांगता येत नाही. हे स्वमदतगट निव्वळ विशिष्ट आजारात एकमेकांची मदत करण्यासाठी स्थापन केले जातात. संशोधनाच्या दरम्यान पुण्याच्या पार्किन्सन्ससाठी चालवल्या जाणार्‍या स्वमदतगटाचे कार्य जवळून पाहता आले. आपल्या मायबोलीवरील डॉ. शोभनाताई तीर्थळी या संस्थेच्या कार्यकारिणीत आहेत. यशोदा वाकणकर चालवत असलेल्या एपिलेप्सीसाठीच्या स्वमदतगटाचीही माहिती घेता आली. हे सारे पाहात असताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे आपल्या समाजात अशा तर्‍हेच्या संस्था मूळात खुप कमी आहेत. दुसरे म्हणजे लोकांना या संस्थांबद्दल फारसे माहित नाही. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संस्था स्वमदतगट म्हणून कार्यरत असल्या तरी आजारागणिक या संस्थांची कार्यपद्धती बदलते. अशासारख्या संस्था चालविण्याचे काम गुंतागुंतीचे आणि अवघड आहे.

स्वमदत गट जरी सर्वसाधारणपणे सारख्याच तत्त्वावर चालवले जात असले तरी त्यात वैविध्य असु शकते. आणि हे वैविध्य प्रामुख्याने जे गट ज्या आजारासाठी चालवले जातात त्यामुळे येते. व्यसनासाठी चालविल्या जाणार्‍या स्वमदत गटात माणुस व्यसन केलेला नसेल तर बहुतांशी सर्वसाधारण माणसासारखाच दिसतो. येथे साधारणपणे विशीच्या पुढची मंडळी आढळतात. अलिकडे हे वयाचं प्रमाण चिंताजनकरित्या खाली उतरलेलं आढळतं. दारु पिऊन झोकांड्या देत असलेल्या माणसाला मी अशा स्वमदत गटात क्वचित पाहिलं असेल. अनेकदा व्यसनी मंडळी सुरुवातीला येथे येतच नाहीत. त्यांचे आईवडीलच त्यांच्या चिंतेने येथे येत असतात. व्यसनी स्त्रियांचे येथे येण्याचे प्रमाण जवळपास नगण्य असते. हेच जर आपण पार्किन्सन्सचा स्वमदत गट पाहिला तर उतार वयातील माणसे येते येताना दिसतात. कारण काही अपवाद वगळता हा आजार सरत्या वयात होताना आढळतो. या आजारात सर्वसाधारण लोकांना माहित असलेला कंप किंवा शरीराच्या अवयवांचे हलणे हे लक्षण हा आजार असलेल्या सर्वांमध्ये आढळतेच असे नाही. या ग्रुपमध्ये बसल्यास अशी लक्षणे असलेली माणसे जशी दिसतात तशीच अशी लक्षणे नसलेली तरीही हा आजार असलेली माणसेदेखिल दिसतात.

काही मनोविकारांमध्ये मूळात रुग्णांना आपल्याला काही झाले आहे हेच पटत नसते. आणि त्यांच्या टोकाच्या वागण्याचा त्रास त्यांच्या आईवडिलांना होत असतो. तेव्हा हे आईवडिलंच आपल्या मुलांच्या वागण्यावर उपाय शोधण्यासाठी स्वमदतगटात आलेले असतात. एपिलेप्सीसारख्या आजारांच्या स्वमदत गटात सर्व वयाची माणसे असु शकतात. सर्वच आजारांच्या मिटींग्जना मी हजर राहु शकलो नाही. पण या गटांची प्राथमिकता काय असते हे आता लक्षात येऊ लागले आहे. त्यानुसार आपण त्यांचे काम पाहु शकतो. तूर्तास इतकेच म्हणून थांबतो की स्वमदत गट ही संकल्पना आपल्या समाजात रुजावी यासाठी काम सुरु केले आहेच. हा लेखनप्रपंच या कामाचाच एक भाग आहे. वाचकांना या संकल्पनेची माहिती मिळावी. गरजु लोकांना त्याचा लाभ व्हावा हाच यामागील उद्देश आहे.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आटोपशीर लेख! परदेशात बहुतेक गोष्टींसाठी अनेक चॅरिट्या आहेत, त्यांच्या तर्फे अशी मदत मिळू शकते.

चांगली माहिती! आयपीएच, पुणे बरेच स्वमदत गट चालवतात... नैराश्य, स्क्रिझोफेनिया, कॅन्सर, , माध्यान्ह, विशेष मुलींच्या पालकांचा, मंत्रचळ ... असे अनेक गट आहेत. सध्या पुण्याबाहेर असल्याने जाणे झाले नाही. परत आले की जाईन. युट्युबवर निलांबरी जोशीचा एक व्हडीओ बघण्यात आला. त्या माईंड जिम असा काही जेनासांठी उपक्रम सुरु करतायेत.