दिल जो न कह सका, वोही राज ए दिल...

Submitted by अतुल ठाकुर on 23 March, 2019 - 00:08

arts.png

काही गाण्यांचे शब्द, त्या गाण्याला लावलेली चाल, त्या गाण्यातले संगीत आणि अर्थातच त्या गाण्याला दिला गेलेला आवाज हे रसायन इतकं काही जमून येतं की आता त्यात कसलाच बदल व्हावा असं वाटत नाही. "दिल जो न कह सका" बद्दल माझी भावना अशीच आहे. अगदी ते गाणं पडद्यावर प्रदिपकुमारने गायिलं आहे तरीही. तो ही त्यात शोभून दिसतो. त्याच्या अभिनयाच्या कितीही मर्यादा असल्या तरी त्याचे व्यक्तीमत्व राजबिंडे आहे यात वाद नसावा. शिवाय रफीने गाणे इतक्या ताकदीने गायिले आहे की चेहर्‍यावर भावनांना अनुकूल हावभाव आपोआपच उमटत जावेत. गाण्याची सुरुवात एका "जाम" ने होते. प्रदिपकुमार एका झटक्यात ग्लास रिचवतो आणि फेकून देतो. त्याच वेळी रोशनचा व्हायलिनचा पीस ऐकू येतो. आणि रफीचे भग्न हृदयाची व्यथा स्वरात तंतोतंत साकारणारे गाणे सुरु होते ..दिल जो न कह सका...

या गाण्याबद्दल लिहिण्याआधी गाण्याच्या आजुबाजूचे काही कळावे म्हणून मी हा १९६५ साली आलेला "भीगी रात" चित्रपट थोडासा पाहिला. नंतर लक्षात आलं की निव्वळ गाणे पाहून लिहिले असते तरी चालले असते इतका हा गाण्याचा तुकडा बोलका आहे. कुठल्याशा गैरसमजामुळे प्रदिपकुमारला मीनाकुमारी बेवफा आहे आणि ती पैशांसाठी अशोककुमारशी लग्न करते आहे असे वाटते. लग्नाच्या बंधनात दोघे बांधले जाणार त्याची घोषणा करताना पार्टी दिली जाते. त्यात प्रेमभंग झालेला चित्रकार प्रदिपकुमार त्याने आपल्या प्रेयसीची काढलेली चित्रं घेऊन येतो. आणि पार्टीत "म्युझिक" आहे ऐकल्यावर आपली व्यथा आपल्या प्रेयसीसमोर मांडण्याची संधी साधतो. मात्र ही व्यथा मांडताना जे शब्द त्याने वापरले आहेत ते चाबकाच्या फटकार्‍यासारखे आहेत आणि शब्दाशब्दाला त्या वेदना मीनाकुमारीच्या चेहर्‍यावर दिसतात. आणि त्याचा त्रास तिच्या होणार्‍या नवर्‍याच्या चेहर्‍यावर म्हणजेच अशोककुमारच्या चेहर्‍यावर दिसतो.

बाकी तिन चार मिनिटाच्या गाण्यात भावनांचा हा कल्लोळ उभा करायचा तर तेवढ्याच ताकदीचे अभिनेते हवेत. प्रदिपकुमारच्या मदतीला रफीचा आवाज आहे, मजरूहचे शब्द आहेत, रोशनचे संगीत आहे. पण मीनाकुमारी आणि अशोककुमारने मात्र त्या शब्दांना आपल्या भावनांच्या प्रतिक्रिया ज्या परिणामकाररित्या चेहर्‍यावर दाखवल्या आहेत त्या गाण्यातच पाहायला हव्या. मजरूहने गाण्यांत निव्वळ भग्न हृदयाची कैफियत मांडलेली नसून आता तू पैशांसाठी मला सोडून दुसर्‍याकडे गेलीस याचा त्या प्रियकराला आलेला संताप शब्दाशब्दांत मांडला आहे. तो म्हणतो "मुबारक़ तुम्हे किसी की, लर्ज़ती सी बाहों में, रहने की रात आयी". पुढे एका कडव्यात "उछा लो गुलों के टुकड़े
के रंगीन फिजाओं में, रहने की रात आयी". आणि शेवटी कळस साधताना "पियो चाहे खून-ए-दिल हो, के पीते पिलाते ही रहने की रात आयी" मजरूहचे शब्द हा या गाण्याचा कणा आहे.

रोशनच्या चाली तशा वेगळ्याच असतात. ही थोडी अवघड चाल. त्यातच त्याने निरनिराळी वाद्ये वापरत भावनेचा कमाल परिणाम साधला आहे. रफीने मूर्तीमंत व्यथाच आवाजात उतरवली आहे. त्यातही त्याने काही वेळा शब्दांवर वेगळी हरकत घेऊन भावना आणखी गडद केल्या आहेत. खास करून "उछा लो गुलों के टुकड़े के रंगीन फिजाओं में, रहने की रात आयी". या ओळीत "फिजाओंमें" शब्दावर रफीने जे काही केलं आहे ते ऐकताना हा माणून अजरामर का झाला हे लक्षात येतं. गाण्याच्या शेवटी अशोककुमार मीनाकुमारीला तिच्या विनंतीवरुन गॅलेरीतून आत नेतो. त्यासाठी तो व्हीलचेअर आणतो. तिचे अपंगत्व प्रदिपकुमारला माहित नसते. अशावेळी व्हीलचेयर आणण्यापासून ते तिला त्यात बसवून आत नेईपर्यंत प्रदिपकुमार पाठ वळवून "जाम" रचवण्यात मग्न असतो. पुन्हा वळून पाहतो तर मीनाकुमारी तेथे नसते. तो आपले शब्दच विसरतो. गाण्याचा हा तुकडा आवाजाशिवायच आहे. त्यानंतर पुन्हा भानावर येऊन रफीचे उदास स्वर सुरु होतात. दिग्दर्शकाची ही किमयाही या गाण्यात पाहण्याजोगी.

भाषेच्या दृष्टीने उर्दूत "किस्मत" म्हणतानाचा "क" वेगळा आणि "कब" म्हणतानाचा "क" वेगळा. रफी "किमत" म्हणताना तो विशिष्ट "क" वापरतो यात नवल नाही. पण प्रदिपकुमारसुद्धा आपले संवाद म्हणताना या "क" चा वेगळा आणि स्पष्ट उच्चार करताना दिसतो. हे असं अलिकडे असतं का याची कल्पना नाही कारण मी जुन्याच गोष्टीमध्ये इतका काही गुंतलो आहे की नवे चित्रपट फारसे पाहात नाही. हे गाणं चित्रपटाच्या जवळपास शेवटीच आहे. शेवट साधताना या गाण्याच्या धूनचा अतिशय कल्पक वापर केला आहे. कुणी तरी आनंदी आहे, कुणीतरी समाधानी आहे. कुणाला आपलं प्रेम मिळालं आहे तर कुणाला आपण जिच्यावर समरसून प्रेम केलं ती आपली नाही हे लक्षात आलं आहे. सार्‍या भावना त्या धूसर होत जाण्यार्‍या स्वरात हळुवारपणे मिसळलेल्या आहेत...प्रत्येकाचे राज ए दिल सांगणारे हे गाणे चित्रपट संपतानादेखिल चटका लवून जाते.

अतुल ठाकुर

हे गाणे येथे पाहता येईल
https://www.youtube.com/watch?v=3EDPAe4P2EY

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय.
गाणंही छान आहे. रफी चा आवाज असताना दुखभरं गाणं अप्रतिम न होते तर नवल.
सिनेमा पाहिलाय. तिघेही थोराड दिसतात.

हे गाणे माझया आवडत्या 10 गाण्यात आहे. अजूनही धून कानी पडली तरी तिथेच थांबले जाते, स्टेशन बदलणे मुश्किल होते Happy

आमिर-मनिषाचा 'मन' हा 'भिगी रात' चा आधुनिक अवतार आहे, कथा काय आहे हे यावरून लक्षात येईल.

भाषेच्या दृष्टीने उर्दूत "किस्मत" म्हणतानाचा "क" वेगळा आणि "कब" म्हणतानाचा "क" वेगळा. रफी "किमत" म्हणताना तो विशिष्ट "क" वापरतो यात नवल नाही. पण प्रदिपकुमारसुद्धा आपले संवाद म्हणताना या "क" चा वेगळा आणि स्पष्ट उच्चार करताना दिसतो. हे असं अलिकडे असतं का याची कल्पना नाही कारण मी जुन्याच गोष्टीमध्ये इतका काही गुंतलो आहे की नवे चित्रपट फारसे पाहात नाही>>>>

जुन्या चित्रपटात हे पाळले जायचेच पण गायक उच्चार आवर्जून जाणून घेऊन ते योग्य व्हावेत याची काळजी घेत. आताची भाषा खूप बदललीय, शुचितेचा आग्रह धरणारे अडगळीत जातात.

जिंद ले गया वो दिल का जानी... हे गाणे लता व अनुराधा दोघींच्याही आवाजात रेकॉर्ड केले गेले होते व दोन्ही गाणी यु ट्यूबवर आहेत. अनुराधा मला आवडते पण तिने जिंद मधल्या जि चा जो उच्चार केलाय तो कानाला खड्यासारखा टोचतो. आणि पूर्ण गाण्यात तिने तसाच उच्चार केलाय.

छान लिहिलंय. तुमच्या लेखातून गाण्यातले भाव आणखी उलगडले.

या गाण्याचं एक रोमँटिक व्हर्शनही आहे, लताच्या आवाजात.

अशोककुमार- प्रदीपकुमार- मीनाकुमारी या तिघांचे आणखीही चित्रपट आहेत. बहु बेगम, चित्रलेखा हे चटकन आठवले.

सुरेख मांडलेत अतुलजी Happy

फक्त....
राजे दिल... च्या ऐवजी 'राज - ए - दिल' कराल का? __/\__

आवडत्या गाण्यांपैकी एक. छान लिहलंय.

> पुन्हा वळून पाहतो तर मीनाकुमारी तेथे नसते. तो आपले शब्दच विसरतो. गाण्याचा हा तुकडा आवाजाशिवायच आहे. त्यानंतर पुन्हा भानावर येऊन रफीचे उदास स्वर सुरु होतात. दिग्दर्शकाची ही किमयाही या गाण्यात पाहण्याजोगी. > हा भाग अतिशय आवडतो.
> त्याच्या अभिनयाच्या कितीही मर्यादा असल्या तरी त्याचे व्यक्तीमत्व राजबिंडे आहे यात वाद नसावा. > +१ त्याच्याइतके रुंद खांदे त्याच्याकाळात कुणाचेच नसतील. बरीचशी पाप्याची पितरं (कि पात्र?) होती.

छान लिहिलंय.
या आणिआशा अनेक गाणी/गझलांमधे रफीचा आवाजाला तोड नाही.याहू वगैरे गाण्यांमुळे (शम्मीकपूरची सर्व गाणी) रफीचा कंटाळा आला होता.

हे गाणं कधीच पाहिलं नव्हतं, आता युट्यूबवर लता आणि रफी दोन्ही वरजन्स पाहून आले. ऐकून दोन्ही आवडायची, मस्त गाणं आहे.
पाहिलं नाही तरी चाललं असतं. हिरो हिरोईन वयस्कर सुजकट दिसतात. मीना कुमारी ओव्हर actingचा खजाना.

याहू वगैरे गाण्यांमुळे (शम्मीकपूरची सर्व गाणी) रफीचा कंटाळा आला होता>

आरारा.. किती मस्त गाणी आहेत शम्मी कपूर-रफीची.

शुचितेचा आग्रह धरणारे अडगळीत जातात.
अगदी खरं आहे साधनाजी Happy

सर्वांचे मनःपूर्वक आभार Happy शम्मी कपूरची गाणी खुप आवडता मलाही Happy

देखीये साहिबो.... हे तिसरी मंझील मधले फारसे फेमस नसलेले गाणे. यावरही कधीतरी लिहा. खूप वेगळे आहे हे गाणे.

छान . माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे . आता च लास्ट भाग पाहिला बिना आवाजाचा, जमलाय. तुमचे गाण्यांवरचे लेख छान असतात Happy

छान लिहिलंय! संगीतकार रोशनजींच्या जीवनावर एक दूरचित्रवाणीवर कार्यक्रम बघताना हे गाणं मी पहिल्यांदा ऐकल होत ते म्हणजे लताच्या आवाजातील प्रणयगीत. त्यावेळीच चाल, शब्द आणि लताच्या आवाजातील माधुर्यामुळे हे गाणे आवडले होते. त्यावेळी हेच गाणे रफींच्या आवाजात सुध्दा स्वरबध्द झालेय त्याची कल्पना नव्हती. त्यानंतर एक-दोन वर्षानंतर रफींच्या आवाजातील हे गीत युट्युबवर ऐकले. एकाच चालीवरील दोन वेगळ्या मनस्थितीचे दर्शन घडवणारी ही दोन्हीही गाणी श्रवणीय आहेत. यात गायक, गीतकार यासोबतच संगीतकार रोशनजींचे योगदान खुप आहे.

रफी सारखा दुसरा कोणी होणे नाही.
नेहमी सारखा उत्तम लेख.
आरारा.. किती मस्त गाणी आहेत शम्मी कपूर-रफीची. >> +१११

आवडले..!
हे माझे आवडते गाणे आहे