व्यसन, एक दुर्दैवी निरिक्षण

Submitted by अतुल ठाकुर on 13 July, 2019 - 10:43

संशोधनाच्या दरम्यान अनेक मनोगतं ऐकली. त्यांचा अभ्यास करावा लागला. त्यामुळे जुन्या समजूती मागे पडल्या. दु:खाच्या अतिरेकाने, प्रेमात वैफल्य आल्याने माणसे दारुला जवळ करून व्यसनी होतात असे हिन्दी चित्रपट पाहून वाटायचे. आजुबाजुला तसे कधी घडताना दिसले नाही. प्रत्यक्ष संशोधनाच्या वेळीही तसे दिसले नाही. बहुतेकांनी झिंग येण्यासाठी, उत्सुकता, गंमत म्हणून दारुचा प्याला जवळ केला होता. पण माणसे दारु कधी सोडतात, कशामुळे सोडतात हा भाग सुद्धा महत्त्वाचा होताच. ते अभ्यासताना मात्र काही पॅटर्न दिसून आला. त्याबद्दल लिहिताना मी जे काही लिहित आहे ते अगदी वैयक्तीक मत असल्याने संशोधनाच्या विभागात हे लेखन टाकलेले नाही. शिवाय सर्वांच्याच बाबतीत हे असे असते असेही नाही. पण जे जाणवले ते दुर्दैवी वाटले म्हणून हा लेखनप्रपंच.

व्यसनमुक्तीचा अभ्यास करताना असं जाणवलं की बहुतेकांचे डोळे स्वतःच्या जीवावर बेतलं की उघडतात. पण आपल्या व्यसनामुळे इतरांना अतोनात त्रास होतो आहे, बायकामुलांचा छळ होतो आहे, चांगले मित्र दूर जात आहेत, शरिरीक, मानसिक, भावनिक, आर्थिक सर्व आघाड्यांवर नुकसानच होत आहे. चाललं आहे हे योग्य नव्हे या कारणासाठी फार कमी लोकांनी व्यसन सोडले असेल. असं दिसतं की मला व्यसनामुळे शारिरीक त्रास सुरु होतो. मला डायबेटिस होतो, माझा रक्तदाब वाढतो, माझं लिव्हर खराब होतं. पोटाचे विकार जडतात, मानसिक आजार होतात. अशा अनेक गोष्टी होतात. मग मी मरणाच्या दारात पोहोचतो. किंवा माझा अपघात होतो. किंवा मला नोकरीवरून काढून टाकतात. किंवा मला घरातून हकलून देतात. आपण अगदी रस्त्यावरच आल्यासारखे होते. घरचे विचारत नाहीत. मित्र उभे करत नाहीत. तेव्हा कुठे आपण आपल्या व्यसनाबाबत काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटायला लागतं.

मला नेमकी हीच गोष्ट अतिशय दुर्दैवाची वाटते. कारण हा रॉकबॉटम गाठेपर्यंत आपण बायकोला मारझोड केलेली असते, मुलांना मारलेलं असतं. आईवडिलांना शिव्या दिलेल्या असतात. आपल्यामुळे घरची म्हातारी माणसे आजारी पडू लागलेली असतात. आपल्यामुळे मुलांचे बालपण हरवलेलं असतं. आपल्यामुळे कुटूंबाला समाजात, नातेवाईकांत मान वर करता येत नसते, आपण पैशासाठी अनेकांना फसवलेले असते हे फारसे कुणाच्या गावीही नसते. व्यसन का सोडायचं तर आता ते माझ्या शरीराला सोसत नसतं. व्यसन का सोडायचं तर त्यामुळे माझी नोकरी गेलेली असते. व्यसन का सोडायचं तर त्यामुळे माझी बायको मला सोडून जाणार असते. व्यसन का सोडायचं तर त्यामुळे मी रस्त्यावर आलेला असतो.

थोडक्यात काय तर मी स्वार्थी म्हणून व्यसन करतो आणि मी स्वार्थी म्हणूनच मला व्यसनातून बाहेर पडायचं असतं. व्यसनामुळे आपण आपले माणुसपण गमावलेले आहे या जाणीवेपोटी व्यसन सोडणारे कितीजण असतील हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

अर्थात हे निरिक्षण सर्वांनाच लागु होतं असं नाही. पण बरीच उदाहरणं अशी आढळतात. त्यामुळे व्यसन आणि स्वार्थीपणा या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत असं मला ठामपणे वाटतं. स्वभावाचा हा भाग पुढे कल्पना करून वाढवला तर काय दिसेल याचाही विचार कधीकधी मनात येतो. समजा अशा माणसांची व्यसन करूनदेखिल प्रकृती फारशी बिघडली नाही तर व्यसनामुळे आपल्या हातून बायकामुलांचा छळ होतो आहे म्हणून माणूस व्यसन सोडून द्यायला तयार होईल काय? कि व्यसन करून अगदी जीवावर बेतेपर्यंत किंवा काहीतरी भयंकर घडेपर्यंत हा घरच्यांचा छळ सतत चालतच राहणार? याप्रश्नाचे प्रामाणिक उत्तर शोधले पाहिजे.

मध्यंतरी परदेशातील काही डॉक्युमेंट्रीज आणि मालिका पाहिल्या. सत्य घटनांवर आधारित, महिला गुन्हेगारांच्या मुलाखतींवर आधारित अशा या मालिका होत्या. यातील बहुतेक गुन्हेगार तुरुंगवासात काळ घालवित आहेत. त्यात अनेकजणी अंमली पदार्थ घेणार्‍या होत्या हे पाहून धक्काच बसला. अंमली पदार्थांचे व्यसन हे अनेक गुन्ह्यांमधील महत्त्वाचे कारण आढळले. आपल्याकडे आपण जसे सहजपणे गाडीवर वडापाव घेतो इतक्या सहजपणे मंडळी कोकेन वगैरेंचे व्यसन केले सांगताना दिसली.

व्यसनांची लागलेली चटक, ते व्यसन मिळविण्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची तयारी यामुळे हातून भयानक गुन्हे घडल्याने ही माणसे तेथील कायद्यांप्रमाणे दोन तीन जन्मठेपा, चाळीस, साठ वर्षे गजाआड घालवणार होती. अनेकजण तुरुंगातून कधीही बाहेर येणार नव्हते. काहींना पॅरोलची संधी मिळण्याआधी दहा वीस वर्षे आत खितपत पडावे लागणार होते. गुन्हेगार बायकांची मुले बाहेर होती. त्या मुलांच्या वेगळ्याच समस्या. यातील बरेच जणांना आपल्याला वाजवीपेक्षा जास्त शिक्षा झाली असे वाटत होते. तर काहीजण आपण निर्दोषच आहोत असे सांगत होते. पण व्यसन हा बहुतेकांना सांधणारा समान दुवा होता.

आता या पार्श्वभूमिवर जेव्हा मी आपल्याकडल्या व्यसनमुक्तीकेंद्रातील व्यसनी पाहतो तेव्हा मला ते आता जास्त सुदैवी वाटतात. असले काही भयंकर गुन्हे घडण्याआधीच त्यांना सुधरण्याची एक संधी मिळालेली आहे. आणि मला त्याचवेळी एक जाणवते की आपण पाहिलेल्या या व्यसनमुक्तीकेंद्रातील जगापेक्षाही एक भयानक जग पडद्याआड आहे. ज्यात अतीशय निर्घृण, आपल्याला कल्पनाही करवणार नाही असे गुन्हे व्यसनामुळे घडलेले आहेत. असे असताना रॉकबॉटम गाठण्याची वाट पाहात माणसे व्यसन करत राहतात. गळ्याशी आले तरच व्यसन सोडण्याची भाषा करतात. पण यावेळेपर्यंत या व्यसनामुळे ज्यांनी अतोनात त्रास सहन केलेला असतो त्यांचे काय? व्यसनाच्या अगदी कडेला, टोकाशी आले आणि त्याची धग स्वतःलाच लागु लागली तरच काहींना उपरती होऊ लागते. व्यसनमुक्तीच्या मार्गातील हा भाग मला अतिशय दुर्दैवी असा वाटतो.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बहुतेकांचे डोळे स्वतःच्या जीवावर बेतले कि उघडतात.+9999. अगदी खरं!
माझ्या डोळ्यासमोर अशी 2 माणसं आहेत.जी आत्ता व्यसन करत नाहीत. पण त्यातल्या एकाला दारुचे व्यसन होते.आणि तसेच चालु ठेवल्यास डॉक्टरांनी लिव्हर ट्रान्सप्लांट सजेस्ट केल्यावर महाभाग सुधारलेत.

निरीक्षण विचार करण्यासारखे आहे.

'लग्न झाल्यावर सुधारेल-मुल झाल्यावर सुधारेल' अशा गैरसमजुतीमुळे या व्यसनी पुरुषांची लग्न-मुलं होतात की लग्न-मुल झाल्यानंतर ते पुरुष व्यसनी होतात? दोन्ही प्रकारचे असणार म्हणा, पणतरी कोणता प्रकार जास्त आहे?
जर पहिला प्रकार जास्त असेल तर तुमचे निरीक्षण 'व्यसनी पुरषाशी आपल्या मुलींचे लग्न लावू नका, ते स्वःतचे नुकसान झाल्याखेरीज सुधारणार नाहीयत' अशा सुदैवी(?) पद्धतीने घेता येईल.

> आणि मला त्याचवेळी एक जाणवते की आपण पाहिलेल्या या व्यसनमुक्तीकेंद्रातील जगापेक्षाही एक भयानक जग पडद्याआड आहे. ज्यात अतीशय निर्घृण, आपल्याला कल्पनाही करवणार नाही असे गुन्हे व्यसनामुळे घडलेले आहेत. > हे भयानक जग कधीतरी पांढरपेशा समाजपुढे येईल अशी आशा आहे.

लेखन आवडलं तरी कसे म्हणू ? Sad

ओळखीतल्या कुटुंबातील व्यसनामुळे उदवस्थ झालेली माणसं बघितलीत .त्यांच्या कुटुंबाची वाताहत बघितली आहे .

फक्त व्यसनीच का, सगळीच माणसे सगळ्याच बाबतीत स्वार्थी असतात..... सुरवातीला तुम्ही लिहिलेले वाचताना लक बाय चान्सचा शेवटचा प्रसंग अचानक आठवला.

परदेशात घडलेले काही गुन्हे जे व्यसनी लोकांच्या हातून घडले ते वाचताना एक गोष्ट लक्षात आली की व्यसनामुळे एक वेगळी मानसिकता किंवा विकृती डोक्यात जन्म घेते आणि ही विकृतीच भयंकर गुन्हे हातून घडवते.

नवीनच दृष्टिकोन वाचायला मिळाला. अनिल अवचट यांचे मुक्तांगण वाचले होते आणि बायकाही व्यसनाच्या आहारी जातात हे वाचून तेव्हा धक्का बसला होता. अजून या विषयावर वाचायला आवडेल.

असेही ऐकले/ वाचले आहे की काही लोक जेनेटिकली ससेप्टिबल असतात. त्यात निराशा, कमतरता, आजूबाजूच्या परिस्थितीविषयी चीड आणि त्याचा सामना करण्यातली हतबलता ह्या गोष्टी भर घालतात. ह्या हतबलतेत थिडा अपराधी भावसुद्धा असतो. प्रत्यक्षात काहीच प्रयत्न न करता स्वर्गसुखात विहरण्याची क्षणिक आणि खोटी (त्यांच्या दृष्टीने खरी) अनुभूती मिळवता येते, दु:ख आणि कष्टांचा विसर पडतो. थोडक्यात सांगायचे तर पलायनवादही असतो.

व्यसन
दारू पिणे शरीराला अपायकारक आहे हे नशेत नसताना माणसाला माहीत असतं .
पण वेळ झाली की माणूस दारू पितो त्याच स्वतःच्या मनावर नियंत्रण राहत नाही .

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.

मोबाईलचे व्यसन यात घाला. हेही तितकेच भयंकर आहे.
साधना मोबाईल आणि इंटर्नेटचे व्यसनसुद्धा आता इतर व्यसनांप्रमाणेच गंभीर मानले जाते.

पण वेळ झाली की माणूस दारू पितो त्याच स्वतःच्या मनावर नियंत्रण राहत नाही .
अगदी खरे आहे. या स्वभावदोषावरच काम करावे लागते.

असेही ऐकले/ वाचले आहे की काही लोक जेनेटिकली ससेप्टिबल असतात.
असे एक मत आहे खरे. पण असेही पाहण्यात आले आहे की काही व्यसनी मंडळींच्या मुलांच्या मनात व्यसनाविषयी पराकाष्ठेचा तिटकारा निर्माण झालेला असतो. बाकी बायोलॉजिकल कारणे जी सांगितली जातात त्याचा दुर्दैवानेअनेकदा वापर व्यसनाचे उदात्तीकरण करण्यासाठी आणि स्वतःचे दोष लपवण्यासाठी केला जातो.

व्यसनी लोकांचे कुटुंबात लाडसुद्धा होतात.
खरे आहे. आणी त्याचे गंभीर परिणाम उपचारांच्यावेळीही दिसतात. ही मंडळी केंद्रात यायलाच तयार नसतात. तो एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

अजून या विषयावर वाचायला आवडेल.
चंपा या विषयासंदर्भात मी बरेच लेखन केले आहे मायबोलीवर.

मला अनेक व्यसनी महाभाग व्यसनांचे फायदे सांगतात, जसे एकाग्रता साधणे, झोप चांगली लागणे वगैरे वगैरे..
मग मी त्यांना म्हणतो " अरे व्वा. मग तुमच्या बायको मुलांना पण सवय लावा की." असे म्हटले की निरूत्तर होतात.

अत्यंत वास्तवदर्शी लेख ...

या विषयावरचे तुषार नातू यांची "नाशायात्रा" आणि "बंडखोर" हे दोन पुस्तके आवर्जून वाचावीत अशी आहेत...

आनंद आणि व्यसन याची सीमारेषा खूपच पुसट आहे .. तोल सांभाळणे आवश्यक

मला अनेक व्यसनी महाभाग व्यसनांचे फायदे सांगतात, जसे एकाग्रता साधणे, झोप चांगली लागणे वगैरे वगैरे..
जीवावर बेतत नाही तोपर्यंत असे फायदे सांगणारे अनेक सापडतात. रात्रपाळीला जागे राहावे म्हणून तंबाखु खाणारे आहेत.

आनंद आणि व्यसन याची सीमारेषा खूपच पुसट आहे .. तोल सांभाळणे आवश्यक
एकदा व्यसन लागले की पुढे तोल सांभाळून ते करता येत नाही.

अगदी थेट सांगायचे तर मध्यमवर्गीय माणूस इतका भित्रा असतो कि तो याकडे सामाजातल्या व्यसनाबद्दलच्या चर्चेमुळेच आणि तशा लोकांबद्दलच्या समाजिक द्रुष्टी मुळे वळतच नाही.
उच्च मद्यम आणि श्रीमंत लोकांकडे घरात प्रचंड व्यक्तीस्वातंत्र्य , कुटूंबातल्या प्रत्येकाची आत्मनिर्भरता आणि प्रचंड सुबत्ता असते यामुळे छळ - मारपीट असे काहीही घडत नाही.
अशा प्रकारची उदाहरणे ही माझ्या पाहण्यात आली आहेत ती फक्त निम्न उत्पन्न गटातली आहेत. म्हणजे शहरात धुणे- भांडी अशी कामे करणार्या बायकांचे उनाड , काहीही काम न करणारे नवरे व्यसनाधीन असतात. त्यांचे व्यसन हे पौरुष सिद्ध करण्यासाठी एकमेव उपाय या भूमिकेतून पोसले जाते. यांच्या आया त्याना पाठीशी घालणार्या असतात बहुतेक वेळा. बायको शिकलेली असेल किंवा विचार करू शकणारी असेल , तिला माहेरचा पाठिंबा असेल तर ती आपले पैसे मिळवून मुलांवर लक्ष केंद्रित करून नवर्याला जागेवर ठेवते. ती जर तशी नसेल तर कुटूंबाची वाताहात अटळ असते.

पशुपत जी मनुष्य केवळ आर्थिक परिस्थितीमुळे संस्कारी किंवा असंस्कारी बनतो. धनसंपदा माणसाला हालचाल करण्याला,प्रगती करण्याला प्रेरित करते. पैसा नसला की माणूस स्वत:ला अपयशी माणूस समजायला लागतो व नैराश्यात व्यसनाच्या आहारी जातो. असं माझं निरीक्षण आहे. शिवाय प्रत्येकाचा स्वभाव कारणीभूत असतो, आत्मविश्वास कमी असणारे लोक व्यसनाचा आधार घेतात.

<< अपयशी माणूस समजायला लागतो व नैराश्यात व्यसनाच्या आहारी जातो. असं माझं निरीक्षण आहे.आत्मविश्वास कमी असणारे लोक व्यसनाचा आधार घेतात.>> हे बरोबर आहे पण या कारणामुळे व्यसनाधीन होणार्यांची संख्या खूप कमी असावी.

<<< अगदी थेट सांगायचे तर मध्यमवर्गीय माणूस इतका भित्रा असतो कि तो याकडे सामाजातल्या व्यसनाबद्दलच्या चर्चेमुळेच आणि तशा लोकांबद्दलच्या समाजिक द्रुष्टी मुळे वळतच नाही. >>>
हे जरा सरसकटीकरण आहे. मध्यमवर्गीय लोकांमध्ये पण व्यसनाधीन असतात आणि अशी बरीच उदाहरणे बघितली आहेत. व्यसन फक्त दारुचेच नाही तर धूम्रपान, जुगार, मटका, पत्ते खेळणे, वेश्यागमन, सट्टा किंवा शेअरबाजारात पैसे लावणे असे वेगळ्यावेगळ्या प्रकारचे असू शकते.

माणूस मागच्या जन्मी अपुऱ्या राहिलेल्या इच्छा घेऊन जन्म घेतो व नव्या जन्मात इच्छा पुऱ्या करतो अशी थियरी वाचली होती. काही लोकांच्या पिंडाला कावळा शिवत नसेल तर दारुची बाटली, तंबाखू पुडी पिंडाजवळ ठेवतात.

अती आत्मविश्वासावाली माणसे सुद्धा नकळत व्यसनांच्या जाळ्यात ओढली जातात, कधी, केव्हा, कसं त्यांच्याही कळत - नकळत! आयुष्यात कुठलेही एक / विशिष्ट ध्येय नसणे, ध्येय ठरवण्यासाठी आवश्यक ते मोटीव्हेशन / प्रेरणा नसणे आणि तसं काही असावं अशी काही परिस्थिती नसणे यामुळेसुद्धा काही लोक वहावत जातात. सगळं काही कळत असतं, पण अगदी गळ्याशी येईपर्यंतही ते थांबत नाही. शिवाय, ज्याला गरजेपुरतं मिळत असेल तरी चालतं, अशा व्यक्तीस गरजेपेक्षा जास्त मिळालं तर गरजेपुरतं उपभोगून बाकीचं व्यसनांत गमावलं असंही होतं. अशा लोकांना व्यसन का आणि कसं लागलं याचं उत्तरही देता येत नाही, त्यामुळे ते थांबवायचं कसं हे ही कळत नाही. अर्थात जेव्हा जबाबदार्‍या असतात, आणि त्या पार पाडतांना ओढाताण होते, तेव्हाच सद्सद्विवेक बुद्धी असलेली लोक थांबण्याबद्दल विचार करू शकतात. व्यसनमुक्तीच्या मार्गातलं तुमचं जे दुर्दैवी निरीक्षण आहे, ते योग्यही आहे, पण अशा प्रकारच्या लोकांमध्ये ते एक प्रकारचं आयुष्यातलं झगडा करून यशस्वी होण्याचं मोटीव्हेशनही असू शकतं! कायम सहज सुखी असणारी लोक ज्यांना काही संघर्ष हवा असतो, त्यांना कदाचित स्वतःहोऊन ओढवून घेतलेल्या ह्या परिस्थितीवर मात करणं हे ठीकही वाटू शकतं... (अर्थातच दुसर्‍यांना त्रास होऊ न देता, हे फार क्वचित प्रसंगी होत असतं...)

<< व्यसन फक्त दारुचेच नाही तर धूम्रपान, जुगार, मटका, पत्ते खेळणे, वेश्यागमन, सट्टा किंवा शेअरबाजारात पैसे लावणे असे वेगळ्यावेगळ्या प्रकारचे असू शकते.>>
बरोबर आहे , पण मध्यमवर्गीय माणसाच्या संदर्भात ते , मारपीट - घरदार रस्त्यावर येणे किंवा स्वतःच्या जीवावर बेतण्यापर्यंत जात नाही.

काहीजणांना मूळ लेखापेक्षा भले मोठे लंबे चौडे प्रतिसाद देण्याचेही आणि सोबत विविध लिंका देत विद्वत्ता सिद्ध करण्याचेही व्यसन असते असे हल्लीच्या काही निरीक्षणातून प्रकर्षाने जाणवले.

जिथे एखाद्या गोष्टीची पुनरावृत्ती होताना ती आपल्या नाशासाठी कारणीभूत ठरते ते व्यसन मानले तर ही गोष्ट व्यक्ति सापेक्ष बदलत जाणारी ठरते त्यामुळे दारू पिणे हे वाईट म्हटले तरी काही जणांना ते त्यात्या परिस्थित संजीवनीसारखे जीवन देणारे ठरते. सियाचिन सारख्या भागातील चौकीवर असलेला सैनिक गरज म्हणून रम पिणार असेल तर ते व्यसन कसे म्हणता येईल ? मात्र सामान्य नागरिक पब मध्ये निव्वळ मस्ती करण्यासाठी तीच दारू पितील तर ते वाईट व्यसन म्हणता येईल.

दारु हे निव्वळ एक उदाहरण म्हणून घेतले आहे मात्र आजच्या काळात अनेक गोष्टी एकास व्यसनी म्हणून वाईट ठरवतील तर दुसरीकडे त्या नित्याच्या बाबी असल्या तरी व्यसन म्हणता येणार नाही

माझ्या घरातील अगदी जवळच्या व्यक्तीचा सिऱ्होसिसने प्राण घेतला.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गांमध्ये होणारी व्यसनाधीनता आणि सधन कुटुंबांमध्ये होणारी यातही फरक आहे.
सधन कुटुंबांमध्ये काहीवेळा आपल्याला व्यसन आहे आणि हे "सोशल ड्रिंकिंग" नाहीये हे कळण्यातच खूप वेळ निघून जातो.
यातही विकेंडला होणारे बिंज ड्रिंकिंग/उपाशी पोटी पिणे/रात्री घरचे झोपल्यावर टीव्ही बघत एकटे पिणे या सगळ्या पायऱ्या हळू हळू ओलांडत माणूस कधी आहारी जातो ते कळत नाही. त्यात अनेकवेळा व्यसनी माणसाच्या जवळच्या व्यक्तीसुद्धा व्यसन आहे हे मान्य करत नाहीत. आणि सगळ्यांनाच तुम्ही म्हणता तसे अगदी शेवटी लक्षात येते, जेव्हा उशीर झालेला असतो.
इथे तुम्ही म्हणता तसा फिजिकल व्हायलेन्स (बायकोला मारझोड) वगैरे होत नाही. पण मानसिक तणाव नक्कीच वाढतात. आणि आपल्या जवळची व्यक्ती (नवरा/मुलगा) जास्त पिते आहे हे कळत असते पण त्याला स्पष्टपणे व्यसन म्हणायचे धाडस होत नाही. आणि हे "बाहेर" सांगायचे नाही या तणावाखाली अनेक स्त्रिया होरपळून निघतात.
त्यामुळे व्यसनाच्या व्याख्या बदलून त्या समाजापुढे ठेवल्या पाहिजेत. बाहेरच्या देशात, किती स्टॅंडर्ड ड्रिंक्सच्या पुढे अतिसेवन आहे याच्या गाईडलाईन्स आहेत. तशा भारतात आहेत की नाही माहित नाही. पण सधन लोकांपर्यंतसुद्धा अतिसेवन म्हणजे नक्की किती हे पोहोचायची गरज आहे.

<< व्यसन फक्त दारुचेच नाही तर धूम्रपान, जुगार, मटका, पत्ते खेळणे, वेश्यागमन, सट्टा किंवा शेअरबाजारात पैसे लावणे असे वेगळ्यावेगळ्या प्रकारचे असू शकते.>> शेयर बाजारात पैसे लावणे हे व्यसन ? काही जणांचे त्या वर संसार उभे आहेत . तो त्यांचा एकमेव कमाईचा स्रोत आहे आणि मजेत चाललंय त्यांचं . मग ते व्यसन कसे म्हणावे ?

कुठलीही गोष्ट जी मर्यादेत असते तिला व्यसन म्हणत नाहीत . जी गोष्ट माणसावर हावी होते . जी गोष्ट केली नाही तर धड धड होते . शरीराला कंप सुटतो . आहे त्या स्थितीत मन लागत नाही .सुचत नाही . सारखं त्या गोष्टीकडे मन धाव घेत . थोडक्यात शरीर आणि मन दोन्ही बंड पुकारते त्यालाच व्यसन म्हणावे . अर्थात "पत्ते खेळणे " या व्यसना बाबतीत शरीरावर काही परिणाम होत नसावा

मलाही हे सारखं माबोवर यायचं व्यसन लागले आहे. कितीतरी कामांची चालढकल करीत इकडे गुंतून जातो. नंतर बोलणी पडतात.

अध्यात्माच देखील व्यसन असत.

Submitted by प्रकाश घाटपांडे on 28 July, 2019 -
>> प्रकाशजी अध्यात्म हा विषय पलायनवादी लोकांनी बदनाम केला आहे. कर्म आचरण करीत स्वधर्माचे ( स्विकारलेली चाकरी, व्यवसाय) पालन करत शांततामय, विकाररहीत जीवन जगणं हे खरं अध्यात्म आहे.
पण चमत्कार, भौतिक लाभ याच्या आशेने लोक बुवाबाजीला भुलतात. विरस झाला की अध्यात्माला नावं ठेवायची.

Pages