पुन्हा जीवा तीच आस
पुन्हा मनी तोची ध्यास
ओढ पंढरीची खास
या आषाढी पावलास
झिरपलं पाणी रानी
ओल तव पाझरोणी
तृण बहरासी आलं
रोमरोम झकांरलं
वर सावळी सावली
संगती तुका, माऊली
अंतरी विठू कल्लोळ
वाटेलागी संतमेळ
तुझा दूत हा पवन
त्यानं धरियले बोट
वाट सरे फुलावाणी
नाही पावलाशी कष्ट
सुर्यदेवाच्या रथाला
अश्व भावाचा जोडला
पर्वत अडी नडीचा
पार लिलया म्या केला
विठू अनंता व्यापून
परी विरक्ती अंतरी
सजे तनमन भरजरी
आगळे रितेपण ऊरी
दरबार हे युट्युब वरील शास्त्रीय संगीताच्या जाणकार चाहत्यांसाठी एक महत्वाचे चॅनेल आहे. ह्यांचे अॅप पण आहे. काल परवात एक लिंक अचानक समोर आली व तिने झपाटून टाकले. दोन तीन दा व्हिडिओ बघितला मग हेड फोन लावुन पंधरा वेळा तरी ऐकले पण मन तृप्त होईना. वन ऑफ माय फेवरिट्स झाले आहे.
सध्या वारीचा माहौल आहे म्हणून दर्दी माबोकरांसाठी लिंक देत आहे.
हाळी पंढरीची आली
बंधनांची बेडी तुटली
पाऊले बेभान धावली
पंढरपूरी ती विसावली
गेले गळूनी देहभान
कुठे अंथरुण,पांघरुण
ध्यास एकची रातदीन
आला वैष्णवांचा दिवाळसण
नको सांगाती द्रव्यराशी
लुगडं,धोतर,घडशी पुरेशी
अनमोल सखा विठू बरोबर
सांडीला संसार वा-यावर
गर्वाला नाही स्थान
सारेची संत सज्जन
भेदाभेद गेले विरुनी
मीपण गेले सरुनी
मीठ, भाकरीही पक्वान्न
तोंडी लावाया भजन
तुका आंधळ्याची काठी
माऊली धरीते पोटी
कळीकाळाचे ते | सुटले ग्रहण ||
अभ्यंगाचे स्नान | भिमातीरी ||
ऐसी पंढरीशी | साजिरी दिवाळी ||
भक्त मांदियाळी | पायरीशी ||
झाडीले अंगण | विठूने सकाळी ||
रेखाटे रांगोळी | रखमाई ||
सजले तोरण | महाद्वारी छान ||
तुळशीचे पान | गंधाळले ||
नाम गजराचा | फुटला फटाका ||
त्याचाच दणका | दाहीदिशा ||
नामाचाच लाडू | करंजी नामची ||
जाजमे भक्तीची | बैसावया ||
बैसल्या पंगती | पंढरी नगरी ||
विठू हारोहारी | वाढतसे ||
भेटली विठ्ठली | नेत्र पाणावली ||
आस निववली | हृदयीची ||
बाप कसा असा तू न्यावे खांद्यावरुनी
नामघोष पंढरीचा माझ्या कानी आला
विकलांग देह , मन आले माझे भरुनी
विरह सोसण्याचा अतिरेक झाला
बाप कसा असा तू न्यावे खांद्यावरुनी
नामा नाचता दारात थिरके माझा पाय
किर्तनी तुकयाच्या हरखले पंढरपूर
सारे पुण्यवंत देवा मीच पापी काय
पापणीत दाटे तुझ्या दुराव्याचा पूर
गलितगात्र देहातही चैतन्य जागवीतो
तुझ्या कृपाप्रसादाने विश्व आनंदले
गंजला ओठही गाणे तुझे गातो
मज मात्र कष्टविशी अपराध काय झाले
प्रेमतीर्थ
कर कटावरी । उभा तो पंढरी । भक्तांसी हाकारी । प्रेममूर्ति ।।
भक्तांसी केवळ । वाटतो निर्मळ । गोड प्रेमजळ । मुक्त हस्ते ।।
होवोनी सुस्नात । पावन तीर्थात । भक्त अानंदात । विरालेचि ।।
भक्तांची मिराशी । एक प्रेमराशी । प्रपंच विनाशी । नाठविती ।।
देव सुखावला । भक्तांसी फावला । प्रेमभाव भला । अासमंती ।।
सत्संगे अाकळे । येरव्ही नाकळे । भक्तांसी सोहळे । प्रेमतीर्थी ।।
जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल....
मिराशी - परंपरागत हक्क
लावोनिया चंदन उटी मणी कौस्तुभ शोभे कंठी|
भक्ताचिया साठी युगे अठ्ठावीस उभा जगजेठी |
शोभे तुळशी माळ ज्याचे गळा|
राजस सुकुमाराचा मज लागो लळा|
वाळवंटी जमे वैष्णवांचा मेळा|
पाहावा सुख सोहळा डोळे भरोनिया |
पंढरीत होती साऱ्या संतांचिया भेटी |
वैकुंठ अवतरे भूवरी चंद्रभागे काठी |
अवघे संत गाती ज्या पंढरीचे महती |
फिकी तिच्यापुढे इंद्राची अमरावती |
©परिमल विश्वास गजेंद्रगडकर
माघ शुक्ल एकादशी शके १९३३
(२ फेब्रुवारी २०१२)