बाप कसा असा तू न्यावे खांद्यावरुनी

Submitted by दत्तात्रय साळुंके on 21 July, 2018 - 08:22

बाप कसा असा तू न्यावे खांद्यावरुनी

नामघोष पंढरीचा माझ्या कानी आला
विकलांग देह , मन आले माझे भरुनी
विरह सोसण्याचा अतिरेक झाला
बाप कसा असा तू न्यावे खांद्यावरुनी

नामा नाचता दारात थिरके माझा पाय
किर्तनी तुकयाच्या हरखले पंढरपूर
सारे पुण्यवंत देवा मीच पापी काय
पापणीत दाटे तुझ्या दुराव्याचा पूर

गलितगात्र देहातही चैतन्य जागवीतो
तुझ्या कृपाप्रसादाने विश्व आनंदले
गंजला ओठही गाणे तुझे गातो
मज मात्र कष्टविशी अपराध काय झाले

वायुवेगे दिंडी गेली दुरी तुझी साहवेना
मीच अभागी असा मागे मन रेंगाळेना
गळाभेटी संताच्या सावकाश घे ना
एकवार मजलागी पंढरीसी ने ना

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुरेखच आहे पण वाचताना अडखळल्यासारखं का होतय?
म्हणजे लय सापडत नाही, असं काहीसे.
भावर्थ तर छानच!

भाव पोहोचला. खरंच पंढरपुरी मन ओढ घेतंय पण जाता येत नाहिये का? नका खंत करू. आषाढीला जमणार नसेल तर एरव्ही कधी निवांतपणे जाऊन त्या स्थानाचा आनंद लुटा.

हे पुढे लिहितेय ते तुम्हाला उद्देशून असं नाहिये. नोकरी व इतर व्यापांमुळे हे माझं मलाच उद्देशून कित्येक वेळा असतं तेच इथे उतरतंय. जेव्हा २ वेळा प्रत्यक्ष पंढरपूरला गेले तेव्हाही तसंच .
--्---्--
मूळ ढाच्यातल्या गर्दी नसलेल्या सभामंडपात बसून समोर विठ्ठलाकडे पाहात पाहात "ह्याच सभामंडपात तुकोबा, एकनाथ, जनाई वगैरे वावरले असतील" हा विचार करून भरून येते. चोखोबांना व त्यांच्या परिवाराला बाहेरून आतला विठोबा पहावा लागे म्हणून स्वत:ही बाहेरून त्याला बघायचा आटापिटा करा. पायऱ्यांवरच्या माणसान्मुळे तो बाहेरून दिसत नाहीच. मग त्यांची किती घालमेल होत असेल ते सूतभर तरी अनुभवता येतंय का पाहा. मग विठोबा कसा चोखोबांना भेटायला स्वत:च बाहेर येई ते आठवा..... आपोआप हलके स्मित उमटेल. नामदेवाच्या पायरीवर पाय कसा द्यायचा? ह्या विचाराने तिथे रेंगाळा. मग सरळ तिथे माथा टेकवून पाय पलिकडे टाकून जाता येतंय का पहा. बाजूने फिरणाऱ्या दर्शनाच्या मार्गिकेत पुढे जात असताना मागे पुढे चालणाऱ्या ग्रामीण भागातल्या लोकांची भासाड्या आवाजातली तरीही त्यातल्या भावामुळे कानाला गोड लागणारी भजने/अभंग ऐका. विठ्ठलासमोर आल्यावर भेटला एकदाचा म्हणत हात लांब करून चरणांवर घट्ट धरा. सिक्युरिटीने पुढे ढकललं नाही तर हलकेच चरण दाबून घ्या. मग मागे जावून रखुमाईचे दर्शन. त्यानंतर गर्दी नसलेल्या चंद्रभागेच्या वाळवंटात पुंडलिकाच्या मंदिराच्या पायठणीवर बसून नदीच्या पात्राकडे पाहात पुंडलिकाची गोष्ट आठवत राहा.

पंढरपूरला एरव्हीही जाणे शक्य नसेल तर तुकोबांच्याच वडाळा विठ्ठलमंदिरात जा. कुठल्याही विठ्ठल मंदिरात जा. कुठेही नाही गेलात तरी आपल्या हृदयात प्रत्येक स्पंदनात वावरणाऱ्या आत्मारामावर मन केंद्रीत करा.

कुठे शोधिशी रामेश्वर अन् कुठे शोधिशी काशी
हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी ...... असे होवू नाही दिले की बास!!

--्---्---

मला कधी पंढरपुराची आठवण आली की मी मनाने तिथे फिरून येते. नाहितर माझा विठोबा इथेच आहे. त्याला मी इथेच भेटते.

सुंदर लिहिलय.
अश्विनी, नविन धागा काढा. फार सुंदर लिहीलय! >> +१

@ अश्विनी
आपल्या शब्दशिल्पातून दर्शनवारी घडली . आपले आंतरराष्ट्रीय राजकारणावरचे लिखाण आणि हे लिखाण दोन्हीतले वेगळेपण ठळकपणे अधोरेखित होते .
खरच एक छान धागा होऊ द्या पंढरीच्या माहात्म्यावर एकादशी निमित्ताने . तुम्ही म्हटल्याप्रमाणे आत्मरुपाशी कुठेही एकरुप होऊ शकतो तरी संत नामदेवांच्याच शब्दात सांगायचे तर
पंढरीच्या सुखा अंतपार नाही लेखा | शेषा सहस्त्र- मुखा ना वर्णवेचि ||
पंढरीच्या सुखा तोचि अधिकारी | जन्मोजन्मी वारी घडली तया ||
किंवा
आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी |
असे तुकोबाराय म्हणाले
असं हे सर्वश्रेष्ठ तीर्थक्षेत्र . त्याची मोहिनी आगळीच .
वयवर्षे ५ असताना माझ्या हरीभक्त वडिलांच्या खांद्यावरून दर्शनबारीत गेलो आणि दर्शन घेतले .
पहिल्या दिवशी महिलांची रांग छोटी म्हणून आईबरोबर गेलो . गर्दीने हैराण झालो तेव्हा आईला दर्शन न घेताच बाहेर आणले, म्हणालो आपण कळसालाच हात जोडू .
दुसऱ्या दिवशी वडिलांच्या खांद्यावरुन दर्शन घेतले . योगा योग पहा माझ्या वडिलांचे नाव देखिल कृष्णा आहे .
त्या नंतर अद्याप पंढरपूर पाहिले नाही . काव्य करताना माझ्या सारखेच इतर भक्तजन जे जाऊ शकत नाहीत ते डोळ्यासमोर होते .
आपला प्रतिसाद वाचताना डोळे कधी ओलावले कळले नाही .
खूप खूप धन्यवाद....

@ शाली
आपला प्रतिसाद वाचल्यावर काही बदल केले . खूप धन्यवाद सुचनेबद्दल ...

आनंद , पंडित आपलेही खूप धन्यवाद सुंदर प्रतिसादाबद्दल...

श्रीराम _/\_

असं हे सर्वश्रेष्ठ तीर्थक्षेत्र . त्याची मोहिनी आगळीच .>>>> खरं आहे...

धागा काढण्याइतपत काय लिहिणार मी? जे आपोआप स्फुरलं ते लिहिलं गेलं इतकंच! इदं न मम _/\_

जेष्ठ कवयित्री अरुणाताई ढेरे याच्या भक्तीभावाने ओतप्रोत शब्दात काल पांडूरंगाचे गुणगान News 18 वर ऐकले त्याची UTube link .

https://youtu.be/sZa1hRb58C8

विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या भक्ताची कविता आवडली आणि अश्विनी .के यांची शब्दसांत्वनाही छान .