विठू

वारी

Submitted by दत्तात्रय साळुंके on 28 June, 2019 - 03:08

वारी

पांडूरंग ध्यानी पांडूरंग मनी
निघाली वारी वैराग्य लेऊनी
तुटे ऐहिकाचे मजबूत बंध
मुखी गोड नाम हरीचे मरंद

कंटक जळाले वादळ पळाले
वाटेवर विठूच्या देहभान गळाले
भूकही निमाली तहान शमली
टाळ निनादे अंतरी विठूमाऊली

नुरे गुणदोष अतंरी प्रदोष
जपा तपा विना भेटे श्रीकृष्ण
मन स्थिरावले चित्तही पावन
नाचे आनंदे अवघे त्रिभुवन

विठू होय सखा विठू होय बंधू
सोयरा तो पाठीराखा तया वंदू
मागणे ना काही मन तृप्त होई
ऐसे वारी सुख वैकुठीही नाही
© दत्तात्रय साळुंके
२७-०६-२०१९

शब्दखुणा: 

असोशी विठूची

Submitted by दत्तात्रय साळुंके on 27 June, 2018 - 06:06

असोशी विठूची

देव नाही गाभाऱ्यात
ओस झाले मंदिरही
सुनी सुनी पायरीही
दैन्य आले कळसाही

दिंडी घेऊनीया विठू
प्रगटला भिमातीरी
टाळ मृदंग गजरी
विठू झाला वारकरी

चंद्रभागेच्या जळात
भक्ती तरंग उठतो
नाथ तीथे अनाथांचा
वारकऱ्यासंगे न्हातो

युगे युगे ताटातूट
जीव नाही की थाऱ्याला
भाग गेला शीण गेला
कृष्ण सुदामा भेटला

विठू देहात भरला
विठू अष्टगंध टिळा
विठू तुळशीची माळ
विठू सर्वांग सोहळा

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - विठू