आरण्यकेश्वर..

Submitted by अ'निरु'द्ध on 18 June, 2019 - 09:48
aryanakeshwar

आडरानी दाट
भग्न शिवालय
उध्वस्त पाषाण
तयाचेही...

खुल्या प्रांगणात
सोसे उन्ह ताप
नंदी पाषाणाचा
धष्टपुष्ट...

पसरी आवारे
पाला नि पाचोळा
सुखे विहरती
नाग सर्प...

वन्य श्वापदांचा
अवचित डेरा
वाघाचाही फेरा
कधिमधी...

कधी काळी कोणी
एखादा पांथस्थ
आणिक भाविक
तुरळक...

योगी साधकांचा
कधी पदस्पर्श
परी अशा वेळा
कवचित...

गाभारी विलसे
सदा ही अंधार
जागे गूढ भाव
अंतरीचा...

परि रोज एक
दिवटी ती तेवे
तिजला पेटवे
कोण जाणे...

अशा त्या काळोखा
भेदी तो प्रकाश
भासवोनी त्यास
गूढगर्भ...

परि साधकासी
नसे भय चिंता
जागे आत्मज्योत
अंतरंगी...

माथा मी टेकिता
आरण्यकेश्वरा
वाहे डोळा पाणी
अनिरुद्ध... !!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे फोटोही आहे की. मी नंतर पाहिले. कविता वाचुन जे चित्र डोळ्यापुढे उभे राहीले अगदी तसाच आहे फोटो.

मन्या ऽ पहिल्या वहिल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद..

शाली तुमचेही धन्यवाद..

आज लेखन पहिल्यांदाच मोबाईलवरुन केलं त्यामुळे Google Photos ची फक्त लिंकच देऊ शकलो. (एरवी लेखनाचा धागा लॅपटॉप वरुन करतो. तिथून मला Embeded Link देता येते.)
दरम्यान मायबोली वरुन फोटो दिला आहे..
आता पहातो, ठेवायचा कि काढायचा..

अहाहा! सुरेख ! डोळ्यासमोर चित्र उभे राहीले. निरु, मला तर बैजुबावरा आठवला. अशीच ब्लॅक अँड व्हाईट पार्श्वभूमी, अध्यात्माने ओथंबलेली गाणी. सुंदर आहे कविता. एर्‍हवी कविता म्हणल्या की त्या डोक्यावरुन पळतात, म्हणून उशिरा बघीतली. पण सत्कारणी लागली.

महाश्वेता, 'सिद्धि', हर्पेन, साधना, anjali_kool, प्रांजलीप्रानम, आणि शशांकजी....
प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार..
@ रश्मी.. बैजुबावरा खूप लहानपणी बघितला होता, कृष्णधवल टी.व्ही. वर..
विशेष आठवत नाही, पण आता बघणे आलेच...
अभिप्रायाबद्दल धन्यवाद _/\_

सुंदर

डॉ.विक्रांत...

अभिप्रायाबद्दल धन्यवाद _/\_

@ मनापासून

प्रतिसादाबद्दल आभार....

सुंदर चित्रकविता
नजरेसमोर दाविता
देवालयाची दिव्यता
असे परी

निरु तुझा होत भास
साधक एक ज्यास
आत्मज्योत तेवण्यास
साधले असे

सुंदर.

सायु, सामो, मनीमोहोर, सर्वेश के, मानव पृथ्वीकर, mi manasi, _तृप्ती_

उत्साहवर्धक अभिप्रायाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार...

चित्रदर्शी कविता
गूढ, घनगंभीर....
शिव तत्वाचा अंश जाणवणारी
शिवोsहं शिवोsहं
ओंम् नमः शिवाय

कवितेत दिलेले प्रकाशचित्र दिसत नाही म्हणून बऱ्याच जणांनी कळवलं, म्हणून तिच प्रतिमा प्रतिसादात डकवत आहे...
(मला गुगल क्रोम मधे कवितेखाली दिसते पण फायर फाॅक्स मधे दिसत नाहीये..)


Pages