गझल

~ गांधी नंतर ~

Submitted by Ramesh Thombre on 27 May, 2012 - 02:44

या देशाने काय पाळले गांधी नंतर ?
फोटोला बस हार माळले गांधी नंतर.

विटंबनाही रोज चालते इकडे-तिकडे
पुतळे कसले, तत्व जाळले गांधी नंतर

देश बदलला, देशाचा गणवेश बदलला
खादीलाही नित्य टाळले गांधी नंतर

शस्त्राहुनही खणखर असते निधडी छाती
हिंसेपुढती रक्त गाळले गांधी नंतर

गांधी 'हत्या' 'वध' ठरवण्या आमच्यासाठी ?
इतिहासाचे पान चाळले गांधी नंतर

देश आमचा गांधीवादी सांगत सुटलो,
नथुरामाला किती भाळले गांधी नंतर ?

नको 'रमेशा' निराश होऊ कातरवेळी
'राजघाट'ने नेत्र ढाळले गांधी नंतर.

गुलमोहर: 

मनात काही चलबिचल होते..

Submitted by मी अभिजीत on 19 May, 2012 - 09:33

मनात काही चलबिचल होते
त्याचीच मग पुढे गझल होते

कोडे सत्याचे सुटत नाही
कधी न स्वप्नांची उकल होते

तुझ्या मी सोबतीने चालता
जगणे श्वासांची सहल होते

निष्कर्ष काढणे कुठे जमले
कळले ते नुसतेच कल होते

खऱ्याचे धैर्य देण्याऐवजी
शपथेस गिता, बायबल होते

हवा तो रंग वेळेला दिला
असे झब्बे शुभ्रधवल होते

तुझा उंबऱ्याला स्पर्श होता
झोपडीही ताजमहल होते

तुला वगळून मी लिहितो तरी
गझल नेमकी मुसलसल होते

-- अभिजीत दाते

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

खुशाल राख व्हावे...

Submitted by मुकुंद भालेराव on 26 April, 2012 - 04:16

मी बघतो रोज तिला, असा जगण्यासाठी ।
नि जगतो रोज असा, तिला बघण्यासाठी ॥

लावून आग गेला तो पाऊस आठवांचा ।
सर एक पुरे डोळ्यांना सुलगण्यासाठी ॥

बघते मला अशी ती बघण्याचसाठी आता ।
अन माझ्याचपासूनी मी विलगण्यासाठी ॥

शापीत या जिण्याला उःशाप हाच व्हावा ।
अंती तिने असावे, मला बिलगण्यासाठी ॥

मिठीत विद्युल्लतेच्या लाभे काय वटाला ।
खुशाल राख व्हावे कुणी उमगण्यासाठी ॥

गुलमोहर: 

आजकाल एकटेच फार वाटते

Submitted by मिल्या on 9 April, 2012 - 05:49

आजकाल एकटेच फार वाटते
रक्तही अलिप्त, निर्विकार वाटते

मौन बाळगून काय साधतेस तू?
शस्त्र हे मला तरी दुधार वाटते

केवढे मधाळ काल बोललीस तू?
आणलेस ओठही उधार वाटते

जीवना मला दिलास तू वसंत पण
वेल मी जिला कळीच भार वाटते

मी तुझ्या घरासमोर थांबलो कुठे?
तू चुकून लावलेस दार वाटते!!!

’ये... जरा बसू निवांत...’ बोललास तू
काय मी तुझी नवी शिकार वाटते?

दान द्यायची कशी अजब तर्‍हा तिची?
ज्यास त्यास फक्त ती नकार वाटते

रात्र घाव घालण्यास सज्ज जाहली
शांतता तिचे नवे हत्यार वाटते

गुलमोहर: 

प्रश्न आहे असा..

Submitted by ज्ञानेश on 16 March, 2012 - 11:00

==========================

भोवतालावरी घट्ट ताबा तुझा केवढा राहतो..
दूर गेलो कितीही तरी शेवटी मी तुझा राहतो !

आपल्याला इथे आणले ती जुनी वाट गेली कुठे?
या विचारात रस्ता पुढे चालतो, चालता राहतो

हा कसा क्रूस आहे, इथे रोज अस्थिर का वाटते?
नेमका कोणत्या भावनेचा खिळा हालता राहतो?

प्रश्न नाही असा की पुन्हा का निराशाच केलीस तू
प्रश्न आहे असा- मी तुझ्यावर विसंबून का राहतो?

काय होईल या कल्पनेने शहारून जाते नदी
एक निर्धार जेव्हा पुलाच्या कडेला उभा राहतो..

गुलमोहर: 

जिंदगी कंटाळली

Submitted by आद्या on 15 March, 2012 - 06:43

वाट वारंवार पायाखालची ठेचाळली
आंधळे ऐसे जिण्याला जिंदगी कंटाळली

झाकलेल्या भाकिताच्या शेकडो रेघांतुनी
प्राक्तनाची रेघ होती नेमकी ढेपाळली

ज्या स्मृतींनी तेवलेले सांजवेळीचे दिवे
त्या स्मृतींची सावली तुज पाउली रेंगाळली

सापडे ना आज हक्काचा स्वत:चा चेहरा
आरशानेही तशी मग शक्यता फेटाळली

आठवावी लागली म्हणतेस अपुली भेट 'जी'
एवढया गर्दीतही मी 'ती' स्मृती सांभाळली

दोष कोणा द्यायचा अन रोष कोणी घ्यायचा
कैक पानांची जुनी यादी अता गुंडाळली

वेदनांचे केवढे ओझे उराशी वाहिले
जीव जाता शेवटी हर वेदना ओशाळली

आद्या

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

टाकले पाऊल पहिले...!!!

Submitted by केतन पटवर्धन on 6 March, 2012 - 01:23

टाकले पाऊल पहिले, थांबणे आता कुठे !
शब्द माझे गीत व्हावे सहज गुणगुणता कुठे !

आरसा हसतो मला अन् प्रश्न एकच टाकतो
दावितो जैसे जगा तैसे तुम्हि असता कुठे !

काम त्याचे तेच आहे, तेच तो करणार आहे
दोष का काट्यास द्यावा तो असा रुतता कुठे !

जन्म घेतो, श्वास घेतो, वयपरत्वे वाढतो
पांढरे होतात केसहि, खाउनी खस्ता कुठे !

रंग माझा, पाट माझा, चित्रकारही मीच व्हावे
आणि अलगद तुज टिपावे तु अशी दिसता कुठे !

लपविण्या मी दुखः माझे मार्ग सोपा काढला
हासले खोटेच तेहि, मी असे हसता कुठे !

फासुनी शेंदूर कोणा येतसे दैवत्व का?
झुकविता डोके समोरी दगड तो नुसता कुठे !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

हमी

Submitted by आनंदयात्री on 5 March, 2012 - 04:03

(बांधण जनप्रतिष्ठान आयोजित काल (४ मार्च) पुण्यात झालेल्या "गजलोत्सव २०१२" अंतर्गत मुशायर्‍यामध्ये सादर केलेली गझल. दोन मतले सुचले होते, दोन्ही इथे देतोय)

जुने नाते अजुनही रेशमी आहे
तरीही बघ तुला परकाच मी आहे!

जुने नाते अजुनही रेशमी आहे
अजुनही त्यात थोडासाच मी आहे!

तुझ्या पत्रातला मजकूर विश्वासू!
तुझे प्रत्येक अक्षर मोसमी आहे

अता "आम्ही" म्हणवतो मी स्वतःलाही
(तुझ्याबद्दल दिलेली ती हमी आहे!)

म्हणे तू प्रेमही केलेस माझ्यावर!
तुझ्या-माझ्यातली ही बातमी आहे

भटकतो पावसाचे थेंब शोधत मी
रुजायाची मुळी क्षमता कमी आहे!

कधी हलकेच भळभळतो स्वतःशी मी

गुलमोहर: 

साक्षात्कार

Submitted by आनंदयात्री on 8 February, 2012 - 06:25

ऐकली माझी व्यथा, वरवर दिला आधार त्यांनी
आणि नंतर त्या व्यथेचा मांडला बाजार त्यांनी

सोबतीला मी स्वतःची सावली नेईन म्हणतो
छाटले आहेत सारे वृक्ष डेरेदार त्यांनी

राहत्या वस्तीत माझा छान पाहुणचार झाला
धाडली आमंत्रणे अन् बंद केले दार त्यांनी

आज माझे गीत इतके भावले नसते तुम्हाला
छेडली नसती कधी जर वेदनेची तार त्यांनी

आतमध्ये साचलेले कागदावर मांडले मी
ते कुठे कळले? जरी केली समीक्षा फार त्यांनी

साठले होते तरीही नितळ आणि निखळ होते
डोह करुनी टाकला माझ्या मनाचा पार त्यांनी

शब्द माझ्याशीच माझे वागले परक्याप्रमाणे
बोललो आभार, माझे मानले आभार त्यांनी!

गुलमोहर: 

बेताल वागण्याने मी हैराण झाले

Submitted by manisha bangar ... on 6 February, 2012 - 04:56

बेताल वागण्याने मी हैराण झाले
मवाळ शब्दच ओठातून गहाण झाले

कशी राहू वचनबद्ध तुझ्याशी आत्ता
पुरते वागणेच तुझे बेईमान झाले

सोंग -ढोंग का करतोस सुसंस्कृत पनाचे
कळेना तुझ्यावर मन कसे कुर्बान झाले

जनाची भिस्त जराशी असू दे मनाला
असे सांगणेच जणू पोथ्या पुराण झाले

राहिले उराशी मी सावली बनून तुझी
कशी मी तुझ्या पायातली वहाण झाले

- मनिषा बांगर -बेळगे
६ /२ /२०१२
दुबई

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - गझल