मिलिंद

वारी

Submitted by मिल्या on 4 June, 2015 - 23:48

पावसाची सुरू पुन्हा वारी
त्यास विठ्ठल जणू धरा सारी

आरशाचे सदैव का ऐकू?
एवढीही नकोच लाचारी

ह्या सुखाच्या महाग वस्त्रांचा
पोत नसतो कधीच जरतारी

आंधळी न्यायदेवता इथली
आणि सारेच देव गांधारी

मांजरासारखे अती लुब्रे
दु:ख येते पुन्हा पुन्हा दारी

दूर गेलीस खेद ना त्याचा
गंध का धाडलास माघारी?

स्वप्न माझे जळून गेले तर
राख सुद्धा खपेल बाजारी

दु:ख आले निघूनही गेले
सांत्वने एकजात सरकारी

मिलिंद छत्रे

विषय: 

तू पण मी पण

Submitted by मिल्या on 29 January, 2015 - 05:10

विरहामध्ये झुरतो कणकण, तू पण मी पण
घेत राहतो श्वास तरी पण, तू पण मी पण

रात्र घेउनी आली अगणित स्पर्श-सुयांना
करायचे का चांदण-गोंदण, तू पण मी पण

सहवासाची लज्जत तेव्हा वाढत जाते
श्वास ठेवतो जेव्हा तारण, तू पण मी पण

माझ्यामध्ये बिंब तुझे अन् तुझ्यात माझे
तरी भोगतो एकाकीपण, तू पण मी पण

लाट किनारी आल्यावरती लाट न उरते
कधी न केले तसे समर्पण, तू पण मी पण

सोबत असुनी मुक्कामाचा थांग न पत्ता
करत राहिलो नुसती वणवण, तू पण मी पण

मिठीत होतो तरी आपल्यामधे दुरावा
बसलेलो कवटाळत 'मी' पण, तू पण मी पण

- मिलिंद छत्रे

ढोल

Submitted by मिल्या on 13 January, 2015 - 07:54

सांग माझे ढोल मी बडवू कशाला?
सूर्य मी आहेच तर मिरवू कशाला?

स्पर्श कर्जाऊ तिने काही दिलेले
रेशमी देणे असे चुकवू कशाला?

आत्मशोधाची कथा सांगून जाती
चेहर्‍यावरचे चरे लपवू कशाला?

जी कधीही माणसे घडवीत नाही
मी तरी मूर्ती अशी घडवू कशाला

मी तुझ्या डोळ्यांमधे आकंठ बुडतो
दु:ख मग दारूमधे बुडवू कशाला?

ठिकठिकाणी फाटले नाते जरी हे
वीण आहे घट्ट तर उसवू कशाला?

नदीला सागराची ओढ असली तर असू द्या ना

Submitted by मिल्या on 25 September, 2014 - 04:09

नदीला सागराची ओढ असली तर असू द्या ना
मला तुमच्यामधे थोडा तरी सागर दिसू द्या ना

नका सांगू मला प्रेमात पडण्याचे नफे तोटे
तुम्ही फसलात ना! आता मलासुद्धा फसू द्या ना

जरासे मौन धरले तर तमाशा केवढा करता
मला माझ्याच सान्निध्यात घटकाभर बसू द्या ना

तगादा आत्महत्येचा कशाला लावता मागे?
गिधाडांनो मला जमिनीस तर आधी कसू द्या ना

किती ढाळाल नक्राश्रू, व्यथांना पाहुनी माझ्या
किती मी सांत्वने सोसू, मला थोडे हसू द्या ना

मला ही जिंदगी तर एक सोडा बाटली वाटे
सुखे मिळतील, आधी दु:ख सारे फसफसू द्या ना

विषय: 

हातचे सोडुन पळत्यापाठी (खयाली तरही)

Submitted by मिल्या on 12 February, 2013 - 00:28

खयाली तरही मधे माझाही सहभाग. धन्यवाद बेफी

हातचे सोडुन पळत्यापाठी पळते आहे
गज़ल कस्तुरी शोधत वणवण फिरते आहे

कुठे लोपले पूर्वीचे ते प्रवाह निर्मळ?
जिकडे तिकडे केवळ दलदल दिसते आहे

झाड जीर्ण होताच पाखरे सोडुन गेली
वेलींच्या आधारे आता जगते आहे*

तू असताना ज्यांस चांदणे समजत होतो
उन्हात त्या आयुष्य आजही जळते आहे

चहूकडे दगडांच्या राशी पडलेल्या... पण
दगडांत बेडकी मजेत वावरते आहे

रस्ता, मंझिल, वाटाड्या... सारे हाताशी
पाऊल तरी का माघारी वळते आहे?

रात्रभर

Submitted by मिल्या on 26 November, 2012 - 01:59

मीच माझ्या झळा सोसतो रात्रभर
सूर्य माझ्यामधे तळपतो रात्रभर

केवढी वादळे कोंडली ह्या उरी
पण दिवाही तिथे तेवतो रात्रभर

सोबतीला सुनी शांतता घेउनी
आतल्याआत मी भटकतो रात्रभर

मी पहाटे पहाटे हरू लागतो
वेदनांशी लढा चालतो रात्रभर

काय केलीस माझी अवस्था सखे
स्वप्न जागेपणी पाहतो रात्रभर

आंधळी रात्र पण फक्त स्पर्शातुनी
तू मला, मी तुला, वाचतो रात्रभर

ठेवली सर्व स्वप्ने तिजोरीमधे
मी सुखाने अता झोपतो रात्रभर

पुन्हा एकदा

Submitted by मिलिंद हिवराळे on 13 April, 2012 - 07:57

===कसं गावं?===

'' जो तो पिकवितो असत्याचे मळे;
भासवून डोळे सत्यप्रिय.

अनीति, अन्याय रक्तामध्ये ज्याच्या;
हातांमध्ये त्याच्या विश्वचेंडू.

असत्याच्या हाती अनीतिचा हात;
काजळली वात समतेची.

असत्येश्वराचे वाढले पुजारी;
सत्याचे कैवारी दुर्मिळले.

कसं गावं गीत अमर सत्याचं;
वारं असत्याचं वाहताहे.

सत्याचा खराटा द्या हो जोतिराव;
असत्याचं गाव झाडावया...! ''

- मिलिंद देविदास हिवराळे
मो. ९४२३६०१३२०

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तूच तुझी

Submitted by मिलिंद हिवराळे on 12 March, 2012 - 06:11

'' विझवू नकोस
अस्तित्वाचा दिवा;
ती नव्हेच दवा
मुक्ततेची!

सभोवती उभे
वासनांध पशू;
म्रूगजळी अश्रू
गाळताना!

गांधारी, सावित्री
द्रौपदी नि सीता;
नकोस गं आता
पुन्हा होऊ!

कुठवर बाई
भिंतींत दडत;
चुलीत जळत
राहशील?

फाडून बुरखा
विद्रोही सुरुंग;
क्रांतीचे पराग
पेर आता...! ''

- मिलिंद हिवराळे
मो. ९४२३६०१३२०

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जिथे नाही कधी रमलो (तरही)

Submitted by मिल्या on 23 January, 2012 - 06:19

नविन तरहीत माझाही सहभाग..

धन्यवाद कैलास...
------

चरण पकडून श्वासांचे मरण मी टाळतो आहे
जिथे नाही कधी रमलो तिथे रेंगाळतो आहे

कधीकाळी इथे पोहायला शिकवायचो ज्यांना
अता नुसतीच त्यांची लाज मी सांभाळतो आहे

मिळावे खायला भरपेट म्हणुनी लढविली युक्ती
व्यथांच्या भाकर्‍या करुनी भुकेला जाळतो आहे

कलंदर पायवाटांनी मला ना मार्ग दाखविला
हिशेबी राजरस्ते अन स्वत:हुन टाळतो आहे

अरे ह्या कोणत्या देशात नेले आज कवितेने?
जिथे निवडुंगही अष्टौप्रहर गंधाळतो आहे

धरेला घट्ट धरल्याने नभाला जाउनी भिडलो
विजेने लुब्ध व्हावे ह्याचसाठी वाळतो आहे

असा मी आरश्यामध्ये स्वत:ला पाहतो आता

गुलमोहर: 
Subscribe to RSS - मिलिंद