रुंजी

Submitted by समीर चव्हाण on 8 January, 2013 - 01:24

किती रुंजी अशी तिथल्या तिथे घालत रहावे
नवी क्षितिजे, नवे आकाश धुंडाळत रहावे

कधी हे मौन पडते आपल्या पथ्यावरी पण
शहाण्याने मनाशी वाद नित घालत रहावे

तुझ्या गाण्यात विरघळती व्यथा अवघ्याच माझ्या
तुला ऐकत रहावे बस तुला ऐकत रहावे

तुझ्या डोळ्यांतले गाणे तुझ्या मौनातली धुन
तुला ऐकत रहावे की तुला पाहत रहावे

कधी देशील एखादीच पण परिपूर्ण रचना
किती सौंदर्य तुकड्यांतून न्याहाळत रहावे

(हौस संग्रहातून)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुला ऐकत रहावे बस तुला ऐकत रहावे<<< व्वा व्वा

सगळेच शेर सुंदर! तुझ्या गाण्यात आणि सौंदर्य तुकड्यातून सर्वाधिक आवडलेले शेर!

तुला ऐकत रहावे बस तुला ऐकत रहावे
>>>>>>>>>>>>

क्या बात है...... मैफिलीत प्रत्यक्ष ऐकवल्यासरल्यासारखा भास होतोय वाचताना..... ! मस्त!

तुझ्या गाण्यात विरघळती व्यथा अवघ्याच माझ्या
तुला ऐकत रहावे बस तुला ऐकत रहावे

कधी देशील एखादीच पण परिपूर्ण रचना
किती सौंदर्य तुकड्यांतून न्याहाळत रहावे..... वाहवा..

आवडली गझल.

समीर!
सुंदर गझल!
सुंदर वृत्त!
किती रुंजी अशी तिथल्या तिथे घालत रहावे
नवी क्षितिजे, नवे आकाश धुंडाळत रहावे
<<<<<छान मतला.

कधी देशील एखादीच पण परिपूर्ण रचना
किती सौंदर्य तुकड्यांतून न्याहाळत रहावे

अप्रतिम आध्यात्मिक शेर! आवडला.

भुंगाशी सहमत.
>> मैफिलीत प्रत्यक्ष ऐकवल्यासरल्यासारखा भास होतोय वाचताना..... ! >>
खरेच !!
रचना जोरदार आवडली.