रस्सीखेच

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

मीच ढग, पाऊस मी, मातीत गेलो मिसळुनी
मी मला शोधू कसा, ना राहिलो कोठेच मी

जवळ ती होती कधी, आभास आता राहीले
होत अश्रू टपकतो गाली तिच्या हलकेच मी

नाव माझे चर्चिले गेले अनेकांच्या मुखी
होत बदनामीच होती, समजलो भलतेच मी

वाटले मी उत्तरे होतो सवालांची तिच्या
समजले आता मलाही फक्त होतो पेच मी

'विसरले सारे!' मनाला मी जरा समजावले
अवचितच पुढच्या क्षणाला हाय खाल्ली ठेच मी

ती जगाला दाखवे आता सुखाने नांदते
अंतरी वसते तिच्या जी तीच रस्सीखेच मी

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

मीच ढग, पाऊस मी, मातीत गेलो मिसळूनी
मी मला शोधू कसा, ना राहीलो कोठेच मी<<< उत्तम (मिसळुनी केल्यास बरे होईल)

(तसेच, राहिलो केल्यासही)

जवळ ती होती कधी, आभास आता राहीले
होत अश्रू टपकतो गाली तिच्या हलकेच मी<< वा वा

नाव माझे चर्चिले गेले अनेकांच्या मुखी
होत बदनामीच होती, समजलो भलतेच मी<<< मस्त

वाटले मी उत्तरे होतो सवालांची तिच्या
समजले आता मलाही फक्त होतो पेच मी<<< गुड वन

ती जगाला दाखवे आता सुखाने नांदते
अंतरी वसते तिच्या जी तीच रस्सीखेच मी<< दुसरी ओळ - व्वा!

धन्यवाद रमड!