गझल

दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

Submitted by अभय आर्वीकर on 24 March, 2013 - 15:35

                        दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

किती गोड ताज्या स्मृती त्या क्षणांच्या, तुझे ते बिथरणें वगैरे वगैरे
छुप्या पावलांनी हळूवार येणे, दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

तुझा शब्द एकेक वेचायचो मी, उतावीळ होतो तुला ऐकण्याला
तुझे मात्र मिथ्या अती भाव खाणे, अबोलाच धरणे वगैरे वगैरे

तुझा केशशृंगार न्याहाळतांना, उभा फ़क्त होतो तुझ्या पायशाला
तरी लाजुनी तू; खळी लाल होणे, मुरकणे, इतरणे वगैरे वगैरे

कुणालाच नव्हती खबरबात काही, कुठे वाच्यता ना कुठे बोलबाला
तुझ्या आणि माझ्यात एकत्व येणे, स्वत:ला विसरणे वगैरे वगैरे

सावरावे जरा

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 14 March, 2013 - 23:25

वेदनेने नवे रुप ल्यावे जरा
सोसणे मोरपंखी दिसावे जरा

गुंतले फार मी, पार नादावले
आवरूनी मना, सावरावे जरा

बंडखोरी नको भावनांची सदा
चेहर्‍याने लपविणे शिकावे जरा

आणभाका स्मरूनी गुलाबी जुन्या
आठवांनी पुन्हा मोहरावे जरा

हात सोडूनिया दूर झालो जिथे
पावलांनी तिथे अडखळावे जरा

पापण्यांनो पहारे करा मोकळे
आसवांना मुक्या वाहु द्यावे जरा

जयश्री अंबासकर

शब्दखुणा: 

कदाचित

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 13 March, 2013 - 03:42

सुखासीन आयुष्य अळणी कदाचित
चवीला व्यथाही जरूरी कदाचित

म्हणावे तशी ती न जगली कधीही
जराही असोशी नसावी कदाचित

पुन्हा चंद्र, तारे झगडले निशेशी
पुन्हा अवस येण्याचि नांदी कदाचित

अपूर्णास पूर्णत्व येण्याचसाठी
तुझी भेट झाली असावी कदाचित

जरा लांबलेलीच ती रात्र होती
दिशाहीन झाली असावी कदाचित

नको आणखी कोणताही उतारा
नशा वेदनांची पुरेशी कदाचित

उभा जन्म गेला करूनी गुलामी
हिशेबात अजुनी उधारी कदाचित

पिते ताक फुंकून फुंकून अजुनी
कुणी पोळलेली असावी कदाचित

शब्दखुणा: 

दु:ख

Submitted by समीर चव्हाण on 11 March, 2013 - 02:28

निराशेच्या निबिड ह्या जंगलाचे
करावे काय मी सांगा मनाचे

जसा रस्ता धुक्याने वेढलेला
उदासी घेरुनी आयुष्य त्याचे

व्यथा थैमान घालाव्यात हृदयी
चहूबाजूंस वारे वेदनांचे

अशी समजूत घालावी मनाची
कुणावाचून का अडते कुणाचे

कधीची सोडली आशा तुझी मी
न आता दु:ख साथीला कशाचे

समीर चव्हाण

शब्दखुणा: 

हा मानवी मनाचा गुंता कसा सुटेना -

Submitted by विदेश on 5 March, 2013 - 11:47

हा मानवी मनाचा गुंता कसा सुटेना
एकास आवडे जे दुसऱ्यास का पटेना

स्पर्धेत जीवनाच्या का ताळमेळ नाही
कुठलाच मनपतंग कटता कसा कटेना

उपदेश कायद्याचा करण्यात गुंततो जो
सुधरावयास तोरा अपुलाच का झटेना

भिक्कार आहे म्हणुनी धिक्कारतो कुणी तो
किति छान आहे म्हणुनी हा दूर का हटेना

माझ्याचसारखा मी समजे कुणी स्वत:ला
गर्वात आत्मस्तुतिचा फुगता फुगा फुटेना
.

शब्दखुणा: 

कहाणी

Submitted by समीर चव्हाण on 5 March, 2013 - 05:00

एक परी येईल कहाणी सांगुन जाइल
नक्षत्रांची सगळी गाणी गाउन जाइल

आकाशाच्या गवाक्षात येतील तारका
पाहण्यास तुज कोण-कोण डोकावुन जाइल

तुझे हास्य येईल घेउनी गंध निरागस
त्या गंधाची छाया जीवन व्यापुन जाइल

स्वप्नांची चाहूल तुला लागेल आगंतुक
कोण कुणासाठी आतुर पण होउन जाइल

स्वप्नझुल्यावर समीर झुलविल तुला निरंतर
झुलता-झुलता झुलणे जगणे होउन जाइल

समीर चव्हाण

शब्दखुणा: 

घर

Submitted by समीर चव्हाण on 27 February, 2013 - 02:47

अधिक आयुष्य सुंदर होत आहे
तुझे माझे नवे घर होत आहे

करूदे काम बघण्याचे मनाला
तुझा शृंगार जोवर होत आहे

असेही चित्र डोळ्यांना दिसावे
उले पाऊल घरभर होत आहे

तुझे माझे जमेना लाख तरिही
तुझ्याविण जन्म दुर्धर होत आहे

मला सांभाळुनी घेशील ना तू
सुखाची जीर्ण चादर होत आहे

समीर चव्हाण

शब्दखुणा: 

जमेल का तुला...

Submitted by हर्षल_चव्हाण on 22 February, 2013 - 03:44

ह्या गझलेचा तिसरा शेर 'आनंदयात्री'च्या सल्ल्याने वृत्त सांभाळून, बदलून लिहिला, त्यामुळे त्याचे धन्यवाद Happy

निघायचे असेल ना? जपून जा,
घरात काय राहिले, बघून जा...

सुने तुझ्याविना असेल देवघर,
(सुगंधरूप त्यात तू भरून जा...)

छतास उंच राहिले करायचे,
इथून तू हळूच अन् लवून जा...

सुकेल बाग ही तुझ्या विना, जरा;
फुलांस स्पर्श एकदा करून जा...

जमेल का तुला फिरून पाहणे?
जमेल त्याक्षणी पुन्हा वळून जा...

पुरे मनात आसवांस ढाळणे,
इथेच यायचेय ना? हसून जा...
----------------------------------------------------------------
हर्षल (२२/२/१३ - सकाळी १०.३५)

शब्दखुणा: 

विडंगझल (झब्बू)- आले कुजलेले मिठ नसलेले

Submitted by योग on 21 February, 2013 - 08:15

||'३४६८१' प्रसन्न!||

(भुंग्याकडून प्रेरणा घेऊन..)

आले कुजलेले मिठ नसलेले
मी एक मठ्ठा (मला) सर्वांनी टाकलेले..

माझे मला कळेना पिऊ कसा मला मी
प्रत्त्येक घोट माझे ईतके 'कोथींबीरलेले'

पिऊ नये कुणाचा मठ्ठा कुणिही
असतात मिशांचे केस सांडलेले

डोळे भरू न देता* आम्ही पिऊन घेऊ
दिसतील सर्व मठ्ठे टेबलावर सांडलेले

ती बाई वाढणारी समजूतदार होती
दिसले कुणास नाही मठ्ठयात थुंकलेले

शिक्षा मला मिळाली वाटीत राहण्याची
मी एक ताक होतो पाणी घुसळलेले

केली कुणि न परवा माझ्या विटं(डं)बनाची
मी आत्मवृत्त होतो लिहून मठ्ठलेले.

Pages

Subscribe to RSS - गझल