मराठी गझल

माझी पावले

Submitted by वैभव फाटक on 30 July, 2012 - 23:46

आली तुझ्या मागावरी चालून माझी पावले
रक्ताळली, पण चालली हासून माझी पावले

आश्चर्य याचे वाटले, सीमा कशी ओलांडली ?
प्रत्येकदा मी टाकली, मोजून माझी पावले

मी शोधला रस्ता नवा, नेईल जो विजयाकडे
नंतर किती गेले तिथे, पाहून माझी पावले

फासे पलटले प्राक्तनी, लाथाडले ज्यांनी कधी
मागे पुढे घोटाळले, वंदून माझी पावले

जादूभरी ताकद तिच्या होती मृदू शब्दांमधे
कित्येकदा आलो पुन्हा वळवून माझी पावले

बांधील होती आजवर, आला तुझा होकार अन..
सरसावली बेड्या जुन्या तोडून माझी पावले

------- वैभव फाटक ( २६ जुलै २०१२) -------

गुलमोहर: 

रिमझिमतो हृदयात सारखा गतकाळाचा मेघ सावळा!

Submitted by सतीश देवपूरकर on 30 July, 2012 - 10:04

गझल
रिमझिमतो हृदयात सारखा गतकाळाचा मेघ सावळा!
वैशाखाचा दाह भोवती, आत परंतू ऋतू वेगळा!!

लकाकताना विजा स्मृतींच्या, क्षणात उजळे व्योम मनाचे;
मृद्गंधाचा सडा दरवळे चित्तामध्ये जणू आगळा!

स्वप्नांच्या उमलल्या कळ्या अन् मोहरले रोमरोम गात्री;
प्राणामध्ये सुरू जाहला एक अनोखा रंगसोहळा!

लावण्याने नटली सृष्टी, नजर हवी ती पहावयाला;
अवघा देहचि झाले डोळा, भले जरी मी असे आंधळा!

त्या वृष्टीने पुन्हा पेरल्या हृदयामध्ये नवीन आशा!
मातीमधुनी वर डोकावे नवस्वप्नांचा कोंब कोवळा!!

अखेर तो पाऊस थांबला, पण पाघोळ्या झरत राहिल्या;
थेंब थेंब मी वेचत बसलो, म्हणो कुणीही मला वेंधळा!

गुलमोहर: 

बेइमानी जीवनाची काय मी सांगू कहाणी..

Submitted by प्राजु on 30 July, 2012 - 01:36

बेइमानी जीवनाची काय मी सांगू कहाणी
जायचे होते कुठे ते पोचले कुठल्या ठिकाणी

एकटी रडता कधी मी तीच येते सांत्वनाला
काय सांगू वेदना माझी किती आहे शहाणी!!

मांडती सार्‍या मुलींना लग्न-बाजारी कशाला?
'लोक म्हणती वाजवूनी घ्यायची असतात नाणी!!'

आठवांच्या धुसरलेल्या दर्पणी डोकावताना
ओळखीचा चेहरा वा ना दिसे कसली निशाणी!

कोवळी होती कथा झाली पुरी ना ती कधीही
बेगडी वचनास राजाच्या पुन्हा भुललीच राणी!

सप्तरंगी सोहळ्यातच रंगले आयुष्य आता
'ऊन्ह' जीणे रोजचे अन दाटते डोळ्यात पाणी

गुलमोहर: 

धडपडलो मी, तडफडलो मी उठण्यासाठी!

Submitted by सतीश देवपूरकर on 28 July, 2012 - 06:44

गझल
धडपडलो मी, तडफडलो मी उठण्यासाठी!
काय काय मी केले नाही जगण्यासाठी!!

कधी झोपड्यांमध्ये केव्हा रंगमहाली;
कुठे कुठे हिंडले लुटारू लुटण्यासाठी!

जरी मनाच्या खिडक्या केल्या बंद तरीही;
गतकाळाची झुळूक येते छळण्यासाठी!

कधीच गेली जळून माझी तमाम स्वप्ने;
काय राहिले सरणावरती जळण्यासाठी?

अनेक वाटा, पळवाटाही समोर माझ्या;
पायच उरले नाही आता पळण्यासाठी!

भले नसेना दृष्टी मजला जगाप्रमाणे!
स्पर्श, नादही मला पुरेसे बघण्यासाठी!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

माझी समीक्षा ..

Submitted by कमलाकर देसले on 27 July, 2012 - 09:08

माझी समीक्षा ..

का बरे घेतोस देवा एवढी माझी परीक्षा ;
शिकवण्यासाठीच देतो ,की मला तू रोज शिक्षा ?

कोसळू दे पर्वतांचे मेघ आकाशातले. पण-
बाणु दे अंगात माझ्या या धरित्रीची तितिक्षा..

हे मला दे ,ते मला दे. मागणे जमणार नाही ;
कर्ण होणारा कधी का ,मागतो रे सांग भिक्षा ..

पाप-पुण्याचे रसायन मिसळले माझ्या मनीही;
पण विवेकानेच करतो रोज मी माझी समीक्षा..

मी जिथे आहे तिथे उमलेल,गंधाळेल.ऐसी -
जीवना द्यावीस मजला जीवनाची तूच दिक्षा..

गुलमोहर: 

जिंदगी माझी जळाली, मात्र झाला धूर नाही!

Submitted by सतीश देवपूरकर on 27 July, 2012 - 07:04

गझल
जिंदगी माझी जळाली, मात्र झाला धूर नाही!
या उरामधले कुणाला समजले काहूर नाही!!

माझिया राखेमधे मी आजही आहेच जिंदा,
शोध तू येथेच मजला, मी कुणी कापूर नाही!

का मला माझीच गीते वाटती परक्याप्रमाणे?
कोण माझे गीत गाते? त्यात माझा सूर नाही!

का मला पाहून सारे लोक परतू लागले हे?
ओसराया लागलेला मी नदीचा पूर नाही!

छाटण्यासाठी स्वत:ची मान हातांनी स्वत:च्या,
माझिया इतका कुणीही जाहला आतूर नाही!

जन्म घेताना गझल या आतड्यांना पीळ पडले!
काळजामधली तरीही संपली हुरहूर नाही!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,

गुलमोहर: 

विठ्ठलाचा हात आहे..

Submitted by कमलाकर देसले on 26 July, 2012 - 08:45

विठ्ठलाचा हात आहे..

मी तुझ्या श्वासात आहे;
प्राण माझा गात आहे..

शोधतो सौन्दर्य मी जे;
आतल्या लैलात आहे..

बावरी राधा बिचारी;
श्याम आभासात आहे..

चावला ना सर्प.कारण-
काढला मी दात आहे..

या उजेडाची प्रभू रे-
कोणती ही वात आहे..

संपले कार्पण्य माझे;
टाकली मी कात आहे..

बिघडण्यामध्ये तुक्याच्या-
विठ्ठलाचा हात आहे..

या सरीतुन,या झर्‍यातुन-
ईश्वरा तू गात आहे..

पाहिला मी बाप माझा-
राबत्या बैलात आहे..

एक त्यान्चा प्रश्न की,मी ;
कोणत्या पक्षात आहे ..

गुलमोहर: 

डोळ्यात मेघ राणी वेगे भरून आले.

Submitted by सुधाकर.. on 26 July, 2012 - 05:47

नाहीच कोण येथे आले बनून ढाले*
छातीत खोल माझ्या गेले रुतून भाले.

पश्च्यात* कोण माझी चेष्टा करून गेले
डोळ्यात मेघ राणी वेगे भरून आले.

सोडून गाव आता जावे निघून कोठे?
गावात निंदकांचे पाढे रचून झाले.

आहेस कोण तू ही? आला कशास येथे?
माझाच भास मजला कोडे अशक्य घाले.

ओठात शब्द खोटा नाही कधीच आला
सत्याचे रोज ओठा द्यावे कुठून प्याले.

कोणास कोण खांदा कोणी कुणास वांदा
विश्वात गैर आता गाडा असाच चाले.

-----------------------------------------------------------------------------

ढाले = अंगावर येणारे वार ढालीने अढवणारा, दुसर्‍याचा जीव वाचवणारा.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पावले माझीच होती एकट्याची!

Submitted by सतीश देवपूरकर on 26 July, 2012 - 04:45

गझल
पावले माझीच होती एकट्याची!
वाट ती घनदाट होती जंगलाची!!

कूसही बदलू दिली नाही शवाला;
केवढी घाई चितेला पेटण्याची!

भेटला प्रत्येक लाटेला किनारा;
लागली वर्णी न माझी एकट्याची!

राहिली माणूसकी नाही कुठेही;
माणसे उरली न आता काळजाची!

सोबतीला माझिया असलीस तू की..
रात्र होते पौर्णिमेच्या चांदण्याची!

तू अशी येतेस इतक्या लगबगीने..
सर जशी येवून जावी श्रावणाची!

थांबला वणवा घराच्या उंब-याशी
जाहली हिम्मत न त्याची जाळण्याची!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

वेबमास्तर

Submitted by चक्रम on 26 July, 2012 - 00:04

आणखी देशात आले वेबमास्तर आपले
'भावना' म्हणते तयांची भोग निस्तर आपले

अ‍ॅडमिनची वाहणारी सांगते तुजला विपू
नावडीच्या आयडीवर काढ नस्तर आपले

आत्महत्या जन्मठेपा वा दिले फाशीवरी
नवनवी ड्यू आय तरिही दाखवी स्तर आपले

धार्मिकांचा नास्तिकांचा त्याच त्या मुद्द्यावरी
वाद चाले , अ‍ॅडमिन तू दाव शास्तर आपले

हापिसाच्या सिस्टमीवर काम पहिले कोणते
पसरणे माबोवरी हे बाडबिस्तर आपले

चक्रमा डोकावलासी बहु दिसांनी या इथे
शोध कंपू ओळखीचा निवड मास्तर आपले

चक्रम रिटर्न्स!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मराठी गझल