तिच्या स्पंदनांचे गीत ऐकता आले असते, तर बरे झाले असते.
एकल्या रात्री हळूच कुशीत सामावता आले असते, तर बरे झाले असते.
वाटा शोधता शोधता जीव भांबावून गेला नसता.
क्षणभराच्या ही निवांतीत, हृदय ओतून घेता आले असते, तर बरे झाले असते.
भल्या भावनांना जपून ठेवायला कोंदण कधी सापडलेच नाही, कदाचित सापडणारही नाही.
फक्त एकदाच का होईना, अश्रूंची किंमत जरी कळली असती, तर बरे झाले असते.
[सप्टेंबर २०२२]
"
वेचले क्षण सारे ,
श्वेत कृष्ण धाग्याने ;
आठवणी मी गुंफल्या
मातीतून आल्या तरी ,
ओंजळीत क्षणभर जरी;
पुन्हा मातीतच निवल्या
उमलते, बहरते, निजते ,
प्राक्तनाचे प्रत्येक पान ;
जशी प्राजक्ताची फुले |
"
~ प्राजक्ता शिरुडे.
(१ जानेवारी २०२२)
तोलले मोजले जवळच्यांनी
लांब मज ठेवले जवळच्यांनी
जोडलेल्या नवीन नात्यांना
साफ नाकारले जवळच्यांनी
संस्कृती आड स्वाभिमानाला
छान संभाळले जवळच्यांनी!
रोज माझ्या नव्या विचारांना
पार धुडकावले जवळच्यांनी
खोल माझ्या मनातले प्रश्न
सारखे टाळले जवळच्यांनी
पान माझ्या कठोर गझलेचे
फाडुनी टाकले जवळच्यांनी
गोंधळाला ये गं अंबे गोंधळाला ये
आई भवानी दुर्गा माते गोंधळाला ये
तुझ्या लेकीना सक्षमतेचे धडे द्यायला ये
गोंधळाला ये गं अंबे गोंधळाला ये
उदे उदे उदे उदे
सरस्वतीच्या लेकीला तू
सबल करण्या ये
नवदुर्गांच्या रुपाचे तू
स्मरण द्यायला ये
गोंधळाला ये गं अंबे गोंधळाला ये
उदे उदे उदे उदे
चंडी काली अन् दुर्गेची
शक्ती द्यायला ये
मनगटात या बळ लेकीच्या
अता द्यायला ये
गोंधळाला ये गं अंबे गोंधळाला ये
उदे उदे उदे उदे
मराठी भाषा दिनानिमित्त एकतरी कविता लिहावी असे डोक्यात होते.एक मुलगी, माहेरवाशीण काय विचार करेल? असे डोक्यात आले आणि भाषाही हीदेखील एक प्रकारे मुलगीच जी जगाच्या अनेक प्रदेशात नांदत आहेत, त्यावर आधारित माहेरवाशीण नजरेतून लिहिलेली नवीन कविता.
मुद्दाम पहिले कडवे आणि शेवटचे कडवे संलग्न लिहिण्याचा (प्रारंभ-अंत्य) असा नवा प्रकार हाताळण्याचा प्रयत्न केलाय. नक्की अभिप्राय द्या.
सासरी दरवळतो नित्य मोगरा तरी
मृद्गंध माहेरचा कसा विसरू ?
नवीन हक्काचे घर अन् माणसे तरी
माहेरचे जागांचे ठसे कसे विसरू ?
दूर कुठे होतो घंटांचा नाद कधीचा
जागे येथे डोळे माझे पहाटवेडे
जन्म घेतला जाणे कुठल्या नक्षत्राला
जाणे केव्हा सुटेल आयुष्याचे कोडे
मला आठवे काळोखातील बागुलबुवा
घर बांधुया उन्हात त्याचे, सांगे आजी
अजून आहे दडलेला तो मनात माझ्या
अजून त्याला ठाऊक आहे नस नस माझी
धरू पहातो, कुठे राहते मुठीत वाळू?
धाप लागते तरीही पाऊल थांबत नाही
उद्या उद्यासाठी हा केला किती पसारा
आवरता आवरता मागे उरते काही
निळे जांभळे
निळे जांभळे रेखिलेसे रुजामे
फुलांनी किती भव्य पायातळी
झर्यातून काही खळाळे खुळावे
कसे बिंबते दर्पणाचे मनी
फुले साजिरी सोनकीही भरारे
लकाके तरी कंच पाचूवरी
कुठे शीळ वृक्षावरी ही सुखावे
मना घेउनी जातसे अंबरी
निळे मोकळे थेट आभाळ जागे
जरा मेघ कोठे खुळावे वरी
कडा डोंगराच्या खूणावून जाती
दरी काजळीची विसावे उरी
निळे जांभळे
निळे जांभळे रेखिलेसे रुजामे
फुलांनी किती भव्य पायातळी
झर्यातून काही खळाळे खुळावे
कसे बिंबते दर्पणाचे मनी
फुले साजिरी सोनकीही भरारे
लकाके तरी कंच पाचूवरी
कुठे शीळ वृक्षावरी ही सुखावे
मना घेउनी जातसे अंबरी
निळे मोकळे थेट आभाळ जागे
जरा मेघ कोठे खुळावे वरी
कडा डोंगराच्या खूणावून जाती
दरी काजळीची विसावे उरी
गच्च मिटावे भगवे डोळे
महाभूतांच्या किंकाळीवर
मुठी आवळून व्यक्त करावा
संसर्गाने चढणारा ज्वर
अवगत व्हावी अशी साधना
शाप निघावा शापासाठी
रिक्त करावे संचित सारे
पिढ्यापिढयांच्या पापासाठी
उत्क्रांतीची उकल अशी की
पशुपासुनी पशु भयंकर?
एक खरे की स्वर्ग लाभतो
माणूस म्हणुनी मेल्यानंतर
द्वैत