काव्यलेखन

सुरुवात होत आहे

Submitted by निशिकांत on 17 October, 2021 - 10:21

ओली कपार हृदयी विरहात होत आहे
नुकतीच पावसाला सुरुवात होत आहे

माझे, तुझे न कांही, सारे असून अपुले
आता हिशोब कसला प्रेमात होत आहे

झालो वयस्क, व्हिस्की देते मला इशारा
बेहोष फक्त एका ग्लासात होत आहे

लाऊन चेहर्‍यांना बनतात सभ्य, बघुनी
मी लपविण्यात मजला निष्णात होत आहे

कामांध ग्राहकांना नाचून रिझवताना
रडताच बाळ हृदयी, आघात होत आहे

वाचून दिग्गजांच्या गझला, कुठे अताशा
माझी गझल जराशी वृत्तात होत आहे

दाऊन वाकुल्या मी सार्‍या जगास जगलो
का दु:ख शेवटीच्या सत्रात होत आहे?

सकाळ कोवळी

Submitted by पाषाणभेद on 17 October, 2021 - 02:05

सकाळ कोवळी रात्रीनंतर हासत येई
हिरव्या गवताचा गर्द गंध घेवून येई

धुक्यातून दव फुलले उतरे अलगद पानांवर
शिखरावर झाडांच्या उन्ह सोनेरी हळूच येई

झुळू़क हवेची थंडगार वाहते चुकार अल्लड
सरत्या पावसाची सर ठिबठिबणारी सोबत येई

रान फुलले रानफुलांचे रंग लेवून ताजे सुंदर
वार्‍यावरती हालती डूलती नजरेला सुखवीत जाई

फुलपाखरांसवे पक्षी उडती वरती आरव करती
खोल दरीतून दूर कुणीतरी आल्हादक गीत गाई

- पाषाणभेद
१७/१०/२०२१

शब्दखुणा: 

मी वळून पाहीन तेव्हा हसून थोडं बघ...

Submitted by देवभुबाबा on 15 October, 2021 - 23:36

पाहिलंय तुला अनेकदा उगाचच लाजतेस...

मी निघून गेल्यावर मागे वळून पाहतेस...

समोर असेन तेव्हा मन भरून बघ....

डोळ्यांत डोळे घालून माझे हावभाव तु ही बघ....

पाहण्याचा तो आटापिटा नाही लपून राहत...

आरशा पुढची नट नट वाटे कोणीच नाही पाहत...

केस सावरताना थोडी लाजूनच बघ...

डोळ्यांच्या कोनातून लाली आता बघ...

मी जाईन बाजूने, आतुरतेने तु पाहत बसशील...

ओठ दातात दाबून हसू गाली साठवत बसशील...

हळू आवाजातच एकदा साद घालून बघ...

मी वळून पाहीन तेव्हा हसून थोडं बघ...

जेव्हा येईल दिवाळी, तु नटशील माझ्यासाठी...

सांग ना सये, ऐकशील का?

Submitted by देवभुबाबा on 15 October, 2021 - 23:35

माझ्या कविता तुला साद घालतात,

सांग ना सये, ऐकशील का?

उचंबळून येणाऱ्या आठवणी शब्दांमध्ये सांगतात....

पाठी फिरुनी फक्त एकदा बोलना, सांग ना सये, ऐकशील का?

गहिवरलेल्या मनातून आणि दाटून आलेल्या कंठातून,

शब्द नाही फुटणार...

हृदयातून हळहळणारा मी, मुक्यानेच साद घालेन...

जाणीव होईल तुलाही तेव्हा, सांग ना सये, ऐकशील का?

एकांतात तुला भेटतील चांदण्या, स्पर्शून जाईल हवा...

मी सुद्धा तेव्हाच, मोजत असेंन चांदण्या,

जी कमी पडेल मोजण्यात, तीच गुंतलेली असेल तुझ्याशी बोलण्यात...

चांदणी अन प्रियकर

Submitted by पाषाणभेद on 14 October, 2021 - 14:08

कुणी एक चांदणी नवथर
खाली आली धरणीवर
काय कसले तिला ना ठावे
इकडे तिकडे कोठे जावे
भूकेलेली रडवेली
रडून कोमेजलेली
तशात भेटला तिजला प्रियकर
अशाच चांदणीसाठी होता आतूर
कोण कुठली तू आलीस कशी
आपूलकीने त्याने केली चौकशी
लांब असते दूरदेशी येथे परदेशी
कोण मज पाठवील पुन्हा मजदेशी
प्रियकर उदार उमदा चांदणीस आवडला
परी स्वगृहाच्या ओढीने जीव खंतावला
मी तर तुझा आताचा प्रियकर
घर तुझे कधीचे सुखकर
नको तू गृह विरह सहू
तू अन मी वेगळे होवू
प्रियकर त्वरीत निर्णय घेई
प्रियेस त्याच्या पोहचवून देई

शब्दखुणा: 

लपाछपीचा डाव

Submitted by पाषाणभेद on 14 October, 2021 - 13:06

निळ्या जांभळ्या ढगांआडूनी कोण बरे बोलावतो?
इकडे आहे मी इकडे तिकडे देखील मीच आहे असे बोलतो.

लपाछपीचा डाव असा हा राज्य माझ्यावर यावेळी
शोधण्यासाठी त्याला निघालो वेळ अवेळी

शोधता शोधता मी दमतो थकतो
त्यानंतर हळूच कधी तो चाहूल देतो.

दडूनी पुन्हा तो ढागांआड मला पुकारी
शोध घेण्या पुढे जातसे कानोसा घेऊनी

हा डाव कसला ठावूक नाही कधी संपतो
कधी येईल समोर त्याची मी वाट पाहतो

पाषाणभेद
१४/१०/२०२१

शब्दखुणा: 

आपुल्या फुलण्यातुनी

Submitted by निशिकांत on 14 October, 2021 - 11:23

बोलती झाली अबोली
आपुल्या फुलण्यातुनी
गारवा देते मनाला
गोडशा हसण्यातुनी

बारमाही फूल असते
बहरलेले अंगणी
जर कधी सुकलेच तर ते
दाटतो गुदमर मनी
प्रेमही, वेडी अबोली,
व्यक्तते रुसण्यातुनी
गारवा देते मनाला
गोडशा हसण्यातुनी

चाललेले काय असते?
अंतरी ती जाणते
यत्न करता लपवण्याचा
शस्त्रही ती उपसते
डाव हुकुमी खेळते ती
पापण्या ओलाउनी
गारवा देते मनाला
गोडशा हसण्यातुनी

अदलाबदल--( तरही )

Submitted by निशिकांत on 12 October, 2021 - 21:44

झोपडीचे स्वप्न होते, भोगतो आहे महल
भाग्यरेषांची कुणी केली अशी अदलाबदल?

सत्यवादी मी इरादे व्यक्त केले ज्या क्षणी
राज्यकर्त्यांनी समूहातून केले बेदखल

वाहुनी येतात खळखळ वेदना माझ्याकडे
राहतो मी ज्या ठिकाणी, भाग तो आहे सखल

कष्ट करतो वेगळा, पण सातबारावर तरी
शेत नाही पाहिले त्या मालकाचा का अमल?

काल मी होतो कुठे अन् आज मी आहे कुठे?
प्रश्न पडतो जीवनाची योजिली कोणी सहल?

भोगुनी लाखो सुखांना, दु:ख जेंव्हा भेटते
वाटते सारेच जीवन का असे झाले विफल?

गोठलेले भाव जेंव्हा वाहती डोळ्यातुनी
नेमकी साकारते कलमेतुनी माझ्या गझल

बहुरूपी

Submitted by अनन्त्_यात्री on 11 October, 2021 - 01:27

बोबडी अंगाईकविता
कोवळीशी बालकविता
अस्फुटाची मुग्धकविता
हुरहुरीची प्रेमकविता
मायपाखर स्निग्धकविता
सातमजली हास्यकविता
नवरसांच्या विभ्रमांनी
विनटलेली भावकविता
विफलतेची दग्धकविता
शृंखलांना तोडणारी
अग्निगर्भी क्रांतिकविता
गृहितकांना छेदणारी
इंद्रजाली गूढकविता

पैलतीरावरून रात्री
अथक हाका मारणारी,
क्लांत जीवी श्रांत गात्री
प्राणफुंकर घालणारी,
सर्वव्यापी,सर्वसाक्षी
शब्दविरहित.....
....आदिकविता

अस्तित्वाचा तुझ्या दाखला

Submitted by निशिकांत on 10 October, 2021 - 12:16

किती मंदिरे पवित्र क्षेत्रे !
प्रवास केला रुचला नाही
अस्तित्वाचा तुझ्या दाखला
कुठेच देवा दिसला नाही

पूजा अर्चा कर्मकांड अन्
महा आरत्या सदैव होती
नवरात्राच्या एके दिवशी
पशूस एका बळी चढवती
कधी दयाळू भवानीसही
गुन्हा बळीचा कळला नाही
अस्तित्वाचा तुझ्या दाखला
कुठेच देवा दिसला नाही

समान वस्त्रे सर्व घालती
उच्चनीच हा भेद विसरुनी
हज यात्रेचा शेवट करती
सैतानांना खडे मारुनी
पण सैतानी राज्य चालते
भेदभावही सरला नाही
अस्तित्वाचा तुझ्या दाखला
कुठेच देवा दिसला नाही

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन