काव्यलेखन

पानगळ

Submitted by गंधकुटी on 28 August, 2020 - 11:50

पानगळ
वृक्ष विरागी, पण भोगी
मुकूल कळ्यांचे धुमारे
कोवळ्या फुलांचे फुलोरे
फळांचे वाकलेले घोस
पण मातीस पुन्हा भेटाया
बाळगी पानगळीची आस
पानगळीची आस

जन्मराशी

Submitted by किमयागार on 28 August, 2020 - 05:17

डंख माराया फुलाला एक माशी
साधते संधान ती त्याच्या मधाशी.

घर नभाचे सजविती त्या रोज रात्री
काय नाते तारकांचे अंबराशी?

कोसळूद्या शांत एका पावसाला
थांबवा झगडे विजांनो पावसाशी.

सोड करणे याचना तू सागराची
हाक होडी, काप पाणी, हो खलाशी.

चिंब ज्याचे गाल दोन्ही आसवांनी
तो म्हणे पाऊस पडला ना मगाशी.

एक मालक, एक नोकर भिन्न जाती
का असे? जर एक त्यांच्या जन्मराशी?

----------मयुरेश परांजपे(किमयागार)---------
२७/०८/२०२०
७२७६५४६१९७

कोण तू भगवंत…

Submitted by Asu on 28 August, 2020 - 02:45

कोण तू भगवंत…

हृदय असे तान्हुले माझे
भार किती साहू
हृदयातून रुधिर नव्हे
दुःख लागले वाहू

शब्द सरले अश्रू विरले
राहिले नाही काही
माया ममता भाव भावना
अर्थ उरला नाही

दयामाया नाही तुजला
का म्हणावे दयावंत
उठताबसता दुःख जगतो
पाहशी किती अंत

माणसे रे आम्ही साधी
नाही कुणी साधुसंत
मणभर हे दुःख साहण्या
क्षणभर देई ‌उसंत

भाग्य आमचं कोरोनाहाती
कोण तू भगवंत?
देव म्हणून, तरी पूजितो
मनी वाटते खंत

शब्दखुणा: 

गातो आहे जीवन गाणे

Submitted by निशिकांत on 27 August, 2020 - 22:49

सुखावलो मी, कवेत माझ्या
चंद्र, तारका, शुभ्र चांदणे
घेत भरारी आकाशी मी
गातो आहे जीवन गाणे

प्रयोग नवखे करावयाची
आस जागते उरात माझ्या
परंपराही भिनली आहे
जन्मापसुन मनात माझ्या
टाळ्या पडती ऐकुन माझे
जुन्या स्वरातिल नवे तराने
घेत भरारी आकाशी मी
गातो आहे जीवन गाणे

लाख संकटे आली गेली
बिलगुन होतो निर्धाराशी
एक कवडसा जरी मिळाला
युध्द छेडले अंधाराशी
संघर्षाच्या वाटेवरती
हास्य भेटले मणामणाने
घेत भरारी आकाशी मी
गातो आहे जीवन गाणे

सर्वव्यापी

Submitted by गंधकुटी on 27 August, 2020 - 12:10

दव भिजल्या पानाफुलात तू
धुक्यात हरवल्या दिशात तू
ओल्याकंच हिरव्या रानात तू
नादावलेल्या माझ्या मनात तू

तव प्रकाशाचा मी वारकरी
तुझ्या दिव्यत्वाचा धावा करी
निरंतर मन रमते तुझिया ठायी
मन माझे तुझीच रे प्रशंसा गायी

तव कृपा घनरूपाने बरसते
तव आभा रविचंद्राने फाकते
तुझी ममता धनधान्य देयी
मन माझे तुझीच रे प्रशंसा गायी

तडे हे पाडले कोणी?

Submitted by निशिकांत on 26 August, 2020 - 00:08

मनाच्या तावदानाला तडे हे पाडले कोणी?
खड्यांना आठवांच्या, शांत डोही टाकले कोणी?

कुणाची साथसंगत लाभली तर सोडले कोणी
कुणी उत्साह वाढवला, नि मागे ओढले कोणी

जरी खाते हवामानातल्या बदलास वर्तवते
मनाच्या वादळाला का कधी सांभाळले कोणी?

कसे दोघातले नाते अताशा सैलसर झाले?
विचारा आपुल्याला, घट्ट टाके उसवले कोणी ?

अनाथाचे जिणे जगली तरी का घाट श्राध्दाचा?
मरायाच्या अधी आईस का ना पोसले कोणी?

नको ते नेमके घडते, असे का? सांग आयुष्या
मनाजोगे घडे ज्यांच्या, असे का जन्मले कोणी?

दुःखाची कविता

Submitted by द्वैत on 25 August, 2020 - 09:41

दुःखाची कविता

दुःखाच्या कवितेमधले
हे मर्म कसे सांभाळू
उद्विग्न किनाऱ्यावरती
मी मुठीत धरतो वाळू

प्रत्येक वेदना माझ्या
डोळ्यांतून वाहून जाते
देहावर जाणे कुठली
काळी पडछाया उरते

वर हलते काहीबाही
खोलात उरे अंधार
डोहात मनाच्या धसतो
काठाचा मूळ आधार

एक अशी अवस्था जेथे
हातातून सारे सुटते
तितक्यात नव्याने पुन्हा
दुःखाची कविता सुचते

द्वैत

आठवणी

Submitted by गंधकुटी on 25 August, 2020 - 06:27

आठवणींचे डोंबारी
बांधतात कुठेही दोर
कसेही, कधीही येऊन
ठोठावतात मनाचे दार

कधी धरून उन्हाचे कवडसे
अंगणात उतरतात त्यांच्या पोरी
सुखावतात, रमवतात मग
सुखद आठवांच्या झुल्यावरी

कधी ऐन तापल्या दुपारी
झोप उडून जाते दूर
ऐकू येतात त्यांचे ढोल
उसासत, धपापत राहतो उर

कधी सरत्या संध्याकाळी
उडवत येतात गोधूळी
सुखदुःखाचे हिशेब कशाला
हुरहुरत्या कातरवेळी

ताणून काळाची दोरी
झुलत राहतात आठवणी
घटना आणि माणसं
बनतात स्मरणमाळेतले मणी

कोण कुणी कुणाचे

Submitted by मुक्ता.... on 25 August, 2020 - 04:24

कोण कुणी कुणाचे?

कुणी कुणाच्या काळजात नाही
कुणी कुणाच्या काळजीत नाही
कुणी कुणाला ओळखत नाही
आजकाल,
प्रेम कुणी डाव्या खिशातही बाळगत नाही!!!

कुणी कुणाला दारात उभं करत नाही
कुणी कुणाला घरात घेतही नाही...
कुणी कुणाला आपलं म्हणत नाही..
आजकाल,
देवळातला देव आपले दार उघडत नाही!!!

कुणी कुणाला दान देत नाही
कुणी कुणाच्या दुआ घेत नाही..
कुणाला कुणाची रिकामी झोळी दिसत नाही...
आजकाल,
माझेच माझ्या कमाईत भागत नाही
आणि
दान देण्यासारखे सत्पात्र विश्वास ठेवण्यासारखेच नाही...

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन