काव्यलेखन

मस्त नशीला वारा आला

Submitted by बेफ़िकीर on 6 May, 2020 - 13:16

मस्त नशीला वारा आला
देहाचा तिटकारा आला

हजारवेळा जात बदलली
त्यानंतर गाभारा आला

हात नेमका जेव्हा सुटला
रस्ताही अंधारा आला

वृद्धाश्रमचालक खुष आहे
एक नवा म्हातारा आला

असा स्वतःच्या घरी पोचलो
जणू कुणी वंजारा आला

हे कळण्यातच जन्म संपला
नजरेतून इशारा आला

इतके छान कुणीही नव्हते
कसा नभी हा तारा आला

आज केवढी मिळकत झाली
एक जुना सुस्कारा आला

'बेफिकीर' व्यामिश्र किती मन
रोमांचात शहारा आला

-'बेफिकीर'!

बंधन

Submitted by राजेंद्र देवी on 6 May, 2020 - 12:42

बंधन

करून तुझ्या हृदयाची चोरी
उजळ माथ्याने फिरतो आहे
तुला भेटण्यासाठी
रात्रं दिवस झुरतो आहे

रोज पाहून वाट उपवनी
पाहतो ताटवे फुलांचे
ऐकतो मी भ्रमर गाणी
मरगळलेल्या आयुष्यात
मिळवतो मी संजिवनी

बस कर आता स्वप्नात येणे
वेळ झाली आयुष्यात येणे
चुकवून टाक नक्षत्रांचे देणे
गुंतवून टाक विवाह बंधनाने

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 

संध्याकाळ

Submitted by pranavlad on 6 May, 2020 - 03:06

तव स्मृतींनी संध्याकाळी
पांघरले वस्त्र तमाचे
गुदमरला श्वास फुलांचा
विरघळले दुःख कुणाचे?

थबकली हवाही इथली
अवघडून वाहत आहे
पारावर कुणी शहाणा
विराणी ऐकत आहे

मज पुन्हा आठवू लागे
तव सदा निरंतर माया
रणरणत्या उन्हात जैसी
वृक्षाची शीतल छाया

एकटेपणा

Submitted by pranavlad on 6 May, 2020 - 03:00

एकटेपणा

सवय होतीच मला एकटेपणाची,
नव्हे कदाचित आवडच होती त्याची..!
नव्हते कोणी माझे अन् मीही नव्हतो कोणाचा,
खरंतर अभिमान होता मला माझ्या एकटेपणाचा..!

उंच, निरभ्र आकाशात स्वच्छंदीपणे,
मुक्त विहार करणाऱ्या गरुडासम, एकटा होतो मी..!
लहान लहान टेकड्यांच्या सहवासात,
उंच हिमालयाच्या शिखरासम, एकटा होतो मी..!

उंचावरुन गर्दीकडे पाहताना, ती कधी हवीहवीशी नाही वाटली,
होतो जरी एकटा, तरी एकटेपणाची भिती नव्हती वाटली..!
पण एकदा वाटले, पाहुया तरी गर्दी कशी असते..
उतरलो खाली, मिसळलो गर्दीत, ती ही काही वाईट नसते..!

शब्दखुणा: 

अधूरे स्वप्न

Submitted by पारिजातका on 5 May, 2020 - 16:14

निघालो होतो जग जिंकाया
पण स्वप्न ते अधूरेच राहिले होते
दावेल वाट विजयाची असे
सारथी तरी कोठे राहिले होते

दांभिकतेने भरलेल्या जगाने
अस्तित्वच माझे पुसले होते
विनवीत होतो ज्या दगडाला त्यात
देवत्व तरी कोठे उरले होते

ऊन सावलीच्या खेळात या
डाव सारे निसटत होते
जिंकाया साथ देणारे
हात तरी कोठे उरले होते

भूतकाळातील जखमांचे
व्रण काही जात नव्हते
वेदना शमतील असे
मलम तरी कोठे उरले होते

मायेने गोंजारणारे
स्वर निःशब्द झाले होते
जीवन मैफिल रंगवणारे
सूर निरागस कोठे राहिले होते

प्रांत/गाव: 

सजवूत आम्ही

Submitted by निशिकांत on 5 May, 2020 - 11:42

वेदनांना छानसे सजवूत आम्ही
सुरकुत्यांनाही करू मजबूत आम्ही

रंग खलुनी घेतले अश्रूत आम्ही
वस्त्र आयुष्या तुझे खुलवूत आम्ही

दु:ख असते पाचवीला पूजलेले
आज सटवाईसही हरवूत आम्ही

का उदासी सांजवेळेला असावी?
बाल आयुष्यात रेंगाळूत आम्ही

पान पिकलेले तरीही देठ हिरवा
निश्चयाने तत्व हे पाळूत आम्ही

वृध्द असुनी मस्त सैलानी कलंदर
काल फिरलो आजही मिरवूत आम्ही

शेवटी जे व्हायचे होईलही पण
आज आकाशी खुल्या विहरूत आम्ही

हासवावे अन् हसावे ब्रीद अमुचे
स्वर्ग आयुष्यात आकारूत आम्ही

नशीब नेत राहिले ............!

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 5 May, 2020 - 10:14

नशीब नेत राहिले.........!
- महेश मोरे (स्वच्छंदी)

मला उन्हात ठेवुनी कसे मजेत राहिले
नकोच जायला तिथे नशीब नेत राहिले

खुडून टाकले कुणी, कुणी जखम उरी दिली
उभ्या जगास तेच फुल सुगंध देत राहिले

असेच काल एकदा अधर चुकून चुंबिले
नि श्वास काळजातले तिच्या कवेत राहिले

जसा गझल लिहायला म्हणून शब्द शोधला
समोर नेमके तिचेच नाव येत राहिले

सुखांस भेटली अधीर वाहवा तुझी-तिची
नि दु:ख मैफलीत फक्त दाद देत राहिले

शब्दखुणा: 

मन वढाय वढाय...

Submitted by मन्या ऽ on 5 May, 2020 - 04:51

मन वढाय वढाय...

nimita यांची 'मन वढाय वढाय' ही कथा वाचल्यावर मनात विचारांची रांग लागली होती... तेच विचार कवितेत शब्दबद्ध करायचा माझा केविलवाणा प्रयत्न... Happy

पसारे ते भावनांचे
आवरावे किती?
मनास माझिया मी
सावरावे किती?

ओढ तुझी, कि
धुंदी आठवांची
मनास माझिया मी
समजवावे किती?

ठेहराव मनाचा
हरपत चालला
निष्फळ उसासे
टाकावे किती?

अविरत देणे...

Submitted by मनोजकुमार देशमुख on 5 May, 2020 - 04:35

अविरत देणे हेच शिकावे
वत्सल वृक्षापरी

मधुर फळे ती पक्षी चाखीती
घरट्या मधूनी पिले राखिती

प्राण्यांसाठी बनून चारा
पथिकाना तो दिला निवारा

दूषित हवा ते स्वये घेऊनी
परती केली प्राणवायू ने

किती औषधी गुण देहाचे
मूळ, खोड अन त्या पांनाचे

सुकल्या फांद्या गळली पाने
आता पालवी कुठे नव्याने?

देण्यासाठी काही न उरले
तरीही देणे नाही सरले

काष्ट होऊनी चिता जाळीली
अन प्रेता ते मुक्ती मिळाली

तो आणि ती

Submitted by Asu on 5 May, 2020 - 01:08

तो आणि ती

मद्याचा एकच प्याला
वेड लावितो दारुड्याला
तो ना सोडी वारुणीला
ती ना सोडी मग त्याला

वार्ता पसरली गल्लोगल्ली
दारूविक्री खुली जाहली
बंद दुकानी रांग जमली
सहा फुटांची वाट लागली

तळीरामांची एकच गर्दी
सचिंत झाली खाकी वर्दी
दारूविना घसा कोरडा
कुणी करो आरडाओरडा

पिऊन काहीही घसा गरम
दारुड्या ना लाज शरम
दारूविना मरणार नाही
मद्यप्यांनो करू नका घाई

कामधंदा, नाही नोकरी
बायको रडते, रडे छोकरी
मुलाबाळांची ना चिंता करी
माणसापरीस जनावरं बरी

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन