काव्यलेखन

प्रसिद्धी

Submitted by aksharivalay 02 on 10 June, 2020 - 08:04

मी मनावर स्वतःच्या अनेक
लादले नियम, घातले निर्बंध
पण प्रत्यक्षात त्यातला एकही
मनाला पाळता आला नाही

जसा जन्मला तो
लोभस पण संधीसाधू विचार
तसा लगेच मनाला तो
जाळता आला नाही

कोणाची तरी समस्या
कोणाला तरी प्रसिद्धी मिळवून देत होती
आणि खरं सांगू
त्या क्षणी मलाही तो मोह
टाळता आला नाही

सारं काही आलबेल आहे..

Submitted by aksharivalay 02 on 10 June, 2020 - 07:02
तारीख/वेळ: 
10 June, 2020 - 06:57
ठिकाण/पत्ता: 
पुणे

आजकाल मुखात माझ्या
मी चा थोडा अतिरेक आहे
आरश्यातले सत्य टाळेन मी जोवर
तोवर सारं काही आलबेल आहे

माझ्या श्रेष्ठत्वाच्या काल्पनिक कथांवर
अनेकांशी माझी जवळीक आहे
विस्मरणशक्ती त्यांची अबाधीत जोवर
तोवर सारं काही आलबेल आहे

संवेदनशील व्यक्तिमत्व माझे
सेवेचा चढता आलेख आहे
खोट्या आसवांचा हिशोब द्यावा लागत नाही जोवर
तोवर सारं काही आलबेल आहे

अलोट गर्दी माझ्या मागे
उजेडात माझी प्रतिमा नेक आहे
अंधाराची भीती त्यांच्या हृदयात जोवर
तोवर सारं काही आलबेल आहे

माहितीचा स्रोत: 
स्वलिखित
प्रांत/गाव: 

सांजवेळी चाळवू या

Submitted by निशिकांत on 9 June, 2020 - 23:28

पेलले ओझे,जिवाचा
शीण थोडा घालवू या
ये सखे पाने स्मृतीची
सांजवेळी चाळवू या

जे घडावे ते न घडले
प्रक्तनाचा खेळ सारा
भोगला होता किती तो!
भावनांचा कोंडमारा
जिंकली आहे लढाई
चल तुतारी वाजवू या
ये सखे पाने स्मृतीची
सांजवेळी चाळवू या

चैन म्हणजे काय असते?
हे कुठे माहीत होते?
पोट भरण्या घाम आणि
कष्ट हे साहित्य होते
भोगले अन्याय जे जे 
चल जगाला ऐकवू या
ये सखे पाने स्मृतीची
सांजवेळी चाळवू या

भावना डोळ्यातली चाळेल कोणी

Submitted by निलेश वि. ना. शेलोटे on 9 June, 2020 - 14:45

सावजाला आयते साधेल कोणी
रान माझे माजले जाळेल कोणी

पापणी ओढून घेतो बोलतांना
भावना डोळ्यातली चाळेल कोणी

थांबले येऊन ओठी शब्द काही
भेद त्यांना वाटले जाणेल कोणी

नागडा बाजार आहे माणसांचा
भ्यायचे आता कशा हासेल कोणी

तारकांचे वेड होते मान्य येथे
चांदणीला दोष ना लावेल कोणी

नाव का मी घ्यायचे आता कुणाचे
घेतले ना ते तरी लाजेल कोणी

निलेश वि. ना. शेलोटे
वृत्त:- मंजुघोषा
(गालगागा गालगागा गालगागा)

भयानक ही शांतता

Submitted by प्रियानिल on 8 June, 2020 - 23:19

भयानक ही शांतता
जीवघेणी ही रात्र
कधी सुटेल यातून
आत्म्याची ती आसं

नसेल कोणी सोबती
उरेल फक्त सावली
जन्मजन्माचा हा प्रवास
असेल एकाकी
- प्रियानिल

शब्दखुणा: 

मुडदे मोजवे लागत नाहीयेत तुला

Submitted by मंगेश विर्धे on 8 June, 2020 - 15:35

गरजा सगळ्या भागून जातील
तू थोडा तगून राहा
माणसंच तुझ्या कामी येतील
जरा भलं वागून राहा

चालायचंच आहे उद्या परत
आज घरी राहून पाहा,
होऊ शकते शब्दांची भ्रांत
आज सुचतायत, लिहून पाहा

कवितेतून व्यथा कसली मांडतोयस?
आर्त पीडितांचे पाश पाहा.
मुडदे मोजवे लागत नाहीयेत तुला,
यातच समाधानी हो, खुश राहा.

- मंगेश विर्धे

प्रेमाची फळं!

Submitted by चंद्रमा on 8 June, 2020 - 12:57

सखे इतके दिवस आपण घालवले सोबत
पण तुला नाही कळली माझ्या प्रेमाची कुवत!
आता तू तोडला माझ्याशी संबंध,
म्हणून घातले स्वतःवर निर्बंध!!

प्रिये तू आता एक काम करशील का.....
माहित आहे का तुला तुझ्यासोबत राहता-राहता!
मि घातला बराच पैसा खर्ची
आता माझ्या तोंडाला लागली आहे मिरची!!

त्यातले तू काही परत करशील का?
कॅन्टीन च्या समोस्याचे राहू दे
पण रेस्टॉरंट मधल्या पिझ्झाचे परत करशील का?
कोल्ड्रिं्स चे हवे तर राहू दे
पण पाइन ऍपल शेक चे परत करशील का?

म्हणून ये बघायला

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 8 June, 2020 - 10:45

म्हणून ये बघायला
- महेश मोरे (स्वच्छंदी),सातारा

नको उशीर व्हायला म्हणून ये बघायला
नकोच साथ आपली अशीतशी सुटायला

ऋतू जसा सरायचा तसा निघून चाललो
उशीर लागतोच ना मनातुनी निघायला

नकोस देउ दु:ख वा नको नवीन वेदना
तुझी जुनीच आठवण पुरेल मज छळायला

उसंत बस् पुरेलशी कळीस दे फुलायला
कितीक वेळ लागतो सुवास दरवळायला ?

जसे सुचायचे सखे अधीर काव्य तुजवरी
हवा तसाच शेर बस् तुझ्यावरी सुचायला

शब्दखुणा: 

रुधिराची प्रार्थना

Submitted by नारूचेता on 8 June, 2020 - 04:00

क्षणैक अवघा रुधिर सांगे
का लुप्त साऱ्या धमन्या
अन शिरा शिरांमधे येथल्या
आटला तप्त ज्वाला रुधिर सांगे

झाली जखम कशी मनगटी
सांधल्या मी शिरा साऱ्या
अणू अणूतून पुनश्च संचरले
रोम रोम अंगी रुधिर सांगे

त्याच शिरा अन त्याच धमन्या
अबोल रिक्त झाल्या कशा
पानगळ होई जशी ऋतुकाळीं
प्राजक्त विरला रुधिर सांगे

कोण आपुले कोण परके
हा नसावा विद्रोह मनी
हीच धमनी अन हीच शिरा
रुजवात होवो अंगी रुधिर सांगे

कोरोनाचा फुत्कार

Submitted by Asu on 8 June, 2020 - 02:57

कोरोनाचा फुत्कार

फुत्कार ऐकता कोरोनाचा
मन भयकंपित होते
नको नको त्या शंका
मन भुताचे घर होते
बातम्या ऐकून
इथल्या तिथल्या
मन दु:खी विचलित होते
घरात शिरता कोरोना पण
तारांबळ, घाबरगुंडी उडते
राव रंक वा असो भिकारी
खाजगी वा नोकर सरकारी
नाती गोती माती होती
नाही कुणी दरबारी
मदत कुणी कुणा
करू शकेना
एका हाती लढणे
असो म्हातारे वा तान्हुले
असहाय्यपणे पहाणे
इच्छाशक्ती, जगण्या भक्ती
शस्त्रच आपल्या हाती
शांत राहून घ्यावी काळजी
मनी नसावी भीती

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन