काव्यलेखन

हिरवे शिवार

Submitted by Santosh zond on 11 August, 2020 - 02:34

हिरवे शिवार

नभ दाटता आभाळी
पावसाची आली सर
काळ्या आईस पेराया
हाती घेतले पांभर

ओढ थेंबाची तृणांशी
जशी मखमली शाल
बाप राबतो शेतात
हाती जगाची मशाल

पायी नसतो आधार
चिखलाची त्याची वाट
झोपे चांदण्या रात्रीत
जगा वेगळाच थाट

पोंर आपली हुशार
बाप मायशी भांडतो
जिव ठेवून गहान
दिस उपाशी काढतो

शब्दखुणा: 

स्वप्न

Submitted by तो मी नव्हेच on 10 August, 2020 - 06:18

काचेवरच्या दवबिंदूंचे स्वप्न पाहिले कुणी
अन् काचेवरच्या दवबिंदूंवर स्वप्न रेखिले कुणी

कोणी जगती गत काळातच, बघती स्वप्ने जुनी
लढती काही मार लढाया, तर प्रेम सजवते कुणी

कोणी जगती स्वप्नीच नुसती, कोणी त्या मारती
अन् कुणाच्या स्वप्नांनाही वाहवा मिळते जनी

स्वप्न रंगते ज्याचे त्याचे, नसते सीमा जरी
जो तो पाही स्वप्ने जितकी उर्मी वसते मनी

मी ही जपतो माझी स्वप्ने, अलवार माऊली परि
मीच असतो तिथला ईश्वर, नव सृष्टि घडते मनी

- रोहन

शब्दखुणा: 

हे खरे की ते खरे?

Submitted by निशिकांत on 9 August, 2020 - 23:20

प्रश्न पडतो वेष्टनातिल पाहिल्यावर चेहरे
हे खरे की ते खरे अन ते खरे की हे खरे?

सुख क्वचित काळीच येते पण तरीही साजरे
दु:ख देते साथ अविरत, वाटते का बोचरे?

लोकशाही भार झाली, आणि जनता खेचरे
संविधानी वाचले हाती जनाच्या कासरे

धनगरांनो आमदारांचे कळप का लपविता?
शोधती ते, कोण देते खावया गुळ खोबरे

का असे म्हणतात सारे वेड मजला लागले?
फक्त त्यांना सांगतो, होऊ नका हो हावरे

मागण्या गेलो तिकिट मी सर्व पक्षांच्यापुढे
खानदानी शोधती ते, ना सुशिक्षित पामरे

मी एक प्रवासी

Submitted by द्वैत on 9 August, 2020 - 12:49

मी एक प्रवासी

मी एक प्रवासी माझ्या
पायांतून फुटती वाटा
वाटांना वाहून नेती
क्षितिजाशी वेड्या लाटा

क्षितीजाच्या पार असावे
एक शांत पुरातन गाव
माणूस नसावा कोणी
ना स्पंदविणारे भाव

ना सूर्याचा चंद्राचा
कुठला ना सक्त पहारा
नश्वर माझ्या देहाचा
देहाशी फक्त निवारा

श्वासांवर नाही सक्ती
ना ठोक्यांचा कानोसा
प्राणांतून प्राण उडावा
बंदिस्त पाखरा जैसा

द्वैत

सोहम ध्वनी

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 9 August, 2020 - 12:33

ध्वनी
*****

सोहमचा ध्वनी
आत उमटता
वृतीलागी दडा
पडे जेव्हा॥

तया त्या शून्यात
उरतो एकांत
पाहणारा आत
लीन होतो ॥

शब्दांविन शब्द
मनाला धरून
जाय उतरून
मनापार ॥

तेथे तो बहिरा
होत असे खरा
मातृकांच्या परा
जाऊ शके ॥

विक्रांता सहज
असतो कठीण
माय बापाविन
जन्म असा ॥

*******
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

शब्दखुणा: 

चलेज्जाव!

Submitted by Asu on 9 August, 2020 - 10:38

आज ऑगस्ट क्रांती दिन-
९ ऑगस्ट १९४२ ला ऑगस्ट क्रांती दिनी इंग्रजांना ठणकावतांना परमपूज्य महात्मा गांधी असेच म्हणाले असतील…
('आयुष्य तरंग' या माझ्या काव्यसंग्रहातील कविता)

        चलेज्जाव!

चलेज्जाव आपुल्या देशी
रणशिंग आता फुंकले
अंगी जरी काटकुळा मी
कोटींचे बळ संचारले

भोई न आम्ही पालखीचे
मालक आम्ही इथले
परदेशी, कुठून आले
किडे मकोडे कुठले!

किडून, पिडून अवघा देश
पोखरून आम्हा लुटले
कडकडून घेतील चावा
मोहोळ आता उठले

शब्दखुणा: 

पाऊस वाऱ्याची

Submitted by रोहितकुलकर्णी on 9 August, 2020 - 06:47

झाडास कळली वंचना पाऊस वाऱ्याची
खिडकीस कळली वेदना अडकून पडण्याची

लपवू नको तू चेहरा दिसणार नाही तो
घाई नको अन आरश्याला दोष देण्याची

मी प्राक्तनाला दोष देणे सोडले आहे
मी याचना नाही करत ते खुश होण्याची

दमदार दुःखे दे मला माझ्यात रग आहे
हे आतडे पचवून बसले साल जगण्याची

बांधू नको तू घर इथे, हे गाव म्हातारे
मातीत इथल्या वासना भंगून धसण्याची

लाटा किती फुटल्या जश्या फिरल्या तश्या मागे
धरणास आहे आस लाटांच्या उसळण्याची

सांगू नदीचे दुःख आताशा समुद्राला
ती भेटते त्याला जिथे तडफड प्रवाहाची

भासांंशी नाते जडले

Submitted by किमयागार on 9 August, 2020 - 05:13

मी मलाच शोधत फिरलो वनवास मलाही घडले
अस्तित्व टिकावे माझे इतकेच श्वास बघ उरले.

बगळ्याने गौरव केला आकाश ठेंगणे दिसले
गरुडाशी घेता पंगा मज रूप नभाचे कळले.

बहुतेक आज काटेरी शब्दांनी किमया केली
मुखवटे फेकुनी सारे हृदयात दुःख अवतरले.

मी काय तुला सांगावी वेदना उरी दडलेली
तू असा कसा मनकवडा?मन तुझ्याकडे अवघडले?

ती जादू कसली केली स्वप्नांनी माझ्यावरती?
आश्वस्त भावना झाल्या भासांशी नाते जडले.

---------© मयुरेश परांजपे(किमयागार)---------
०९/०८/२०२०

अस्फुट

Submitted by अनन्त्_यात्री on 9 August, 2020 - 01:19

नि:संग फकीरी नभ हे
धरतीला भिडते जेथे
त्या धूसर क्षितिजावरती
अस्फुट काही खुणवीते

मरुभूमीतुनी जडाच्या
चेतन अवघे लसलसते
त्या अद्भुत सीमेवरती
अस्फुट काही खुणवीते

शब्दांच्या निबिड अरण्यी
अर्थाचे बंधन विरते
त्या अपार मुक्तीलाही
अस्फुट काही खुणवीते

मी काही फार काळ

Submitted by कन्यकापरमेश्वरी on 8 August, 2020 - 23:44

मी काही फार काळ
तुझ्यासोबत असणार नाही

मी काही फार काळ
तुझ्यावरती रुसणार नाही

मी काही फार काळ
तुझ्याशिवाय मुरणार नाही

मी काही फार काळ
तुझ्याभोवती दिसणार नाही

मी काही फार काळ
तुझ्यामागून चलणार नाही

मी काही फार काळ
तुझ्यासारखी फुलणार नाही

मी काही फार काळ
तुझ्याचसाठी मळणार नाही

मी काही फार काळ
तुझ्यापासून उगणार नाही

मी काही फार काळ
तुझ्यावाचून सलणार नाही

- कन्यकापरमेश्वरी गंगाजळीवाले
- 9 ऑगस्ट 2020

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन