काव्यलेखन

आहे

Submitted by रोहितकुलकर्णी on 31 August, 2020 - 11:46

मी पणा मी मोजतो आहे
मी स्वतःशी बोलतो आहे

मी रडत नाहीच काहीही
साल माझी सोलतो आहे

बंद केले मी मनाचे घर
थांब पत्ता खोडतो आहे

नाळ जी तू तोडली आहे
ती नव्याने जोडतो आहे

केवढी दुर्बोध भाषा रे
डिक्शनरी मी शोधतो आहे

उन्ह पाऊस झोम्बती मजला
मी भिजूनी पोळतो आहे

वास्तवाच्या आकारास

Submitted by अविनाश राजे on 30 August, 2020 - 23:43

वास्तवाच्या आकारास, करावे लागते स्वीकार
जरी करता आले रंगकाम, मनमाने थोडे-फार

हातातले सुटतात हात, संबंधांच्या होतात कथा
अशी घसरे पायाखाली, काळाची वाळू अनिवार

मी डोळे मिटून घेतो, नवीन स्वप्न पाहुणे यावे
तेच स्वप्न येते, कळत नाही कसा करू प्रतिकार

इतके हळू बोलू नको, इतकी मने सांभाळू नको
जळू दे जळणारे,असू दे कधी स्वतःचा विचार

आमच्या मधून विस्तव जात नाही, कारणे राहू द्या!
परंतु कधी काळी, आमचे सख्य होते नमुनेदार

माझ्याशीही बोलत नाही--

Submitted by निशिकांत on 30 August, 2020 - 12:02

( तरही. मतल्यातील उला मिसरा प्रसिद्ध गझलकार श्री राज पठाण यांचा. )

कुणास सांगू व्यथा मनाची?, कुणीच येथे ऐकत नाही
अबोल इतका अंतरात, मी माझ्याशीही बोलत नाही

उगाच म्हणती काळ कधीही कोणासाठी थांबत नाही
एकलकोंड्या जिवास माझ्या, वेळ सरकता सरकत नाही

वळून बघता आयुष्या रे! ग्रिष्म असोनी हिरवळ दिसते
कांही केल्या आठवणींची नशा उतरता उतरत नाही

"जन्मू द्यावे का नाही?"चे उत्तर बहुधा "नाही" असते
गर्भीच्या स्त्रीभ्रुणास होते घालमेल जी बघवत नाही

पायथ्यास बसले पांडव अन् उशास बसले कौरव शंभर
कृष्ण आजचा लाच न घेता कधी पारडे झुकवत नाही

आजकाल

Submitted by अनन्त्_यात्री on 29 August, 2020 - 09:28

कोलाहलात गर्दीच्या
एकांत मी कवळतो
अंधारून येता मीच
अंतर्बाह्य झळाळतो
रिक्ततेच्या डोहामध्ये
सदा सचैल डुंबतो
शून्य असूनही थेट
अनंताला हाकारतो
आठवता आठवता
पुन्हा त्याला विसरतो
दशदिशा कोंदून जो
दहा अंगुळे उरतो

जिंकतात तेच हरलेले

Submitted by Santosh zond on 28 August, 2020 - 12:42

जिंकतात तेच हरलेले

स्वप्ने माझी उडण्याची
नभांच्या या पलिकडे
पण छाटलेले पंख माझे
दिसतात मला चोहीकडे

थांबलेले रस्ते सगळे
क्षणही लुप्त झालेले
आठवणींच्या नौकेत या
जिवन असेच वाहिलेले

चेहरे असे अनेक या
जगात मी पाहीलेले
दुःखी असल्यावर हसलेले
आनंदी असल्यावर रडलेले

जीवनाच्या स्पर्धेत शेवटी
जिंकतात तेच हरलेले मग
असतात डोळ्यात त्यांच्याही
आनंद अश्रू लपलेले

पानगळ

Submitted by गंधकुटी on 28 August, 2020 - 11:50

पानगळ
वृक्ष विरागी, पण भोगी
मुकूल कळ्यांचे धुमारे
कोवळ्या फुलांचे फुलोरे
फळांचे वाकलेले घोस
पण मातीस पुन्हा भेटाया
बाळगी पानगळीची आस
पानगळीची आस

जन्मराशी

Submitted by किमयागार on 28 August, 2020 - 05:17

डंख माराया फुलाला एक माशी
साधते संधान ती त्याच्या मधाशी.

घर नभाचे सजविती त्या रोज रात्री
काय नाते तारकांचे अंबराशी?

कोसळूद्या शांत एका पावसाला
थांबवा झगडे विजांनो पावसाशी.

सोड करणे याचना तू सागराची
हाक होडी, काप पाणी, हो खलाशी.

चिंब ज्याचे गाल दोन्ही आसवांनी
तो म्हणे पाऊस पडला ना मगाशी.

एक मालक, एक नोकर भिन्न जाती
का असे? जर एक त्यांच्या जन्मराशी?

----------मयुरेश परांजपे(किमयागार)---------
२७/०८/२०२०
७२७६५४६१९७

कोण तू भगवंत…

Submitted by Asu on 28 August, 2020 - 02:45

कोण तू भगवंत…

हृदय असे तान्हुले माझे
भार किती साहू
हृदयातून रुधिर नव्हे
दुःख लागले वाहू

शब्द सरले अश्रू विरले
राहिले नाही काही
माया ममता भाव भावना
अर्थ उरला नाही

दयामाया नाही तुजला
का म्हणावे दयावंत
उठताबसता दुःख जगतो
पाहशी किती अंत

माणसे रे आम्ही साधी
नाही कुणी साधुसंत
मणभर हे दुःख साहण्या
क्षणभर देई ‌उसंत

भाग्य आमचं कोरोनाहाती
कोण तू भगवंत?
देव म्हणून, तरी पूजितो
मनी वाटते खंत

शब्दखुणा: 

गातो आहे जीवन गाणे

Submitted by निशिकांत on 27 August, 2020 - 22:49

सुखावलो मी, कवेत माझ्या
चंद्र, तारका, शुभ्र चांदणे
घेत भरारी आकाशी मी
गातो आहे जीवन गाणे

प्रयोग नवखे करावयाची
आस जागते उरात माझ्या
परंपराही भिनली आहे
जन्मापसुन मनात माझ्या
टाळ्या पडती ऐकुन माझे
जुन्या स्वरातिल नवे तराने
घेत भरारी आकाशी मी
गातो आहे जीवन गाणे

लाख संकटे आली गेली
बिलगुन होतो निर्धाराशी
एक कवडसा जरी मिळाला
युध्द छेडले अंधाराशी
संघर्षाच्या वाटेवरती
हास्य भेटले मणामणाने
घेत भरारी आकाशी मी
गातो आहे जीवन गाणे

सर्वव्यापी

Submitted by गंधकुटी on 27 August, 2020 - 12:10

दव भिजल्या पानाफुलात तू
धुक्यात हरवल्या दिशात तू
ओल्याकंच हिरव्या रानात तू
नादावलेल्या माझ्या मनात तू

तव प्रकाशाचा मी वारकरी
तुझ्या दिव्यत्वाचा धावा करी
निरंतर मन रमते तुझिया ठायी
मन माझे तुझीच रे प्रशंसा गायी

तव कृपा घनरूपाने बरसते
तव आभा रविचंद्राने फाकते
तुझी ममता धनधान्य देयी
मन माझे तुझीच रे प्रशंसा गायी

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन