काव्यलेखन

हुंदके

Submitted by अभिषेक_ on 20 July, 2023 - 15:00

संवाद झाकलेले
हे शब्द मापलेले,
अन अंतरी मनाच्या
हे भाव गोठलेले

दडपून भावनांना
उरती सवाल अंती,
का बंद ही कवाडे?
उभ्या कशास भिंती?

अडवू शकेल गाणे
ऐसी ही भिंत नाही,
आलाप देण्या परंतु
कोणा ऊसंत नाही

चक्रात जीवनाच्या
अडकून श्वास मेले,
स्वर छेडिताच ओठी
का हुंदकेच आले?

शब्दखुणा: 

आठवांचे वादळ

Submitted by अभिषेक_ on 20 July, 2023 - 14:56

मनास घास आशेचे, मी नाही भरवत आता
कुठे कोण काय माझे; मी नाही ठरवत आता

भोगले होते तुझ्यासवे, ते सोहळे सुखाचे
तुजविण माझी कल्पना; मज नाही करवत आता

झुळूकही तुजविण सखे, मज भासते वादळासम
दुःखाच्या होत्या टेकड्या; झाल्या पर्वत आता

बहरलेल्या तुझ्या क्षणांनी, होतो कधी श्रीमंत
हसूही एक पैशाचे; मी नाही मिरवत आता

गोठल्या रात्री मिळायची, पत्रांतून ऊब तुझ्या
आठवांच्या वादळात मी; राहतो हरवत आता

शब्दखुणा: 

प्रेमाच्या मोहात..

Submitted by अभिषेक_ on 20 July, 2023 - 08:27

प्रेमाच्या मोहात ठेविले, हसू तुजकडे तारण होते
दुर्भाग्यास माझ्या तेव्हा, मीच केले पाचारण होते!

विलगू कैसा आठवांतूनी मी, दरवळ तुझिया क्षणांचा?
मोहरले होते तुझ्यासवे ते, क्षण का साधारण होते?

विस्मरणाची तुलाच कैसी, इतक्यात मिळाली मुभा अशी
काय ते आसवांचे सारे, सोहळे विनाकारण होते?

युग-युगांच्या घेऊन शपथा, स्वप्नांनी डोळे भरलेले
सांगना तू केलेस तेव्हा, रूप कोणते धारण होते?

भोगला होता आजन्म सखये, सुखाचाच बंदिवास मी
तूझे दिले दुखणेच माझ्या, स्वातंत्र्याचे कारण होते!

शब्दखुणा: 

प्रश्न होते सोपेच सारे..

Submitted by अभिषेक_ on 20 July, 2023 - 08:19

प्रश्न होते सोपेच सारे, उत्तराचेच त्यांना वावडे होते
उकाड्यास कसे मी ऊब समजलो, अंदाज माझे भाबडे होते

मतभेदाची न मजला भीती, जगाशीही पत्करेन रे वैर मी
माझ्याच विचारांशी नको एकांत, एव्हढेच माझे साकडे होते

अर्धे भरलेले पेलेही आता, हाय रिकामेच दिसती मजला
अथांग भरलेली मैफिल तरीही, लक्ष माझे दाराकडे होते

परतफेडीची येताच घटिका, रितीच भांडी दाखविली तयांनी
दुनियेस वाटताना कदाचित, रे चुकले माझेच मापडे होते

सोसले इतुके की आता, सुखाकडेही शंकेनेच पाहतो मी
आनंदाचे भरूनही भांडे, का जड भयाचेच पारडे होते?

शब्दखुणा: 

लोकशाहीचे रामायण

Submitted by निखिल मोडक on 20 July, 2023 - 07:41

लोकशाहीत, मतदार राजा असतो असे म्हणतात! त्याची संपत्ती काय तर त्याचे एक मत! मतदानाच्या दिवशी तो ती ही संपत्ती देऊन भिकारी होतो, एकाच आशेवर, की वचन पूर्तता होईल, राज्य सुखी होईल. पण..

वचन पूर्तता व्हावी म्हणुनी
राजा एक भिकारी होतो
एक मताचा मारून शिक्का,
राज्य दुज्याच्या नावे करतो

दुजा असे ना भरत तरीही
राम खुशीने वनी राहतो
करील अयोध्या सुखी आपुली
असली आशा लावून बसतो

इकडे रामा काटे वनीचे
मुळे कंद फल खाऊन जगतो
कधी शबरीची बोरे उष्टी
हसत मुखाने चाखून बघतो

"सिंहासन खाली करो कि जनता आती है!" - मराठी भावानुवाद

Submitted by मुग्धमानसी on 20 July, 2023 - 05:07

रामधारीसिंह दिनकर हिंदी साहित्यातले फार मोठे नाव आहे. त्यांच्या कविता स्वातंत्र्यलढ्याच्या आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्याही कठीण काळात तलवारीप्रमाणे तळपत होती. हल्ली त्यांची सुप्रसिद्ध कविता "सिंहासन खाली करो कि जनता आती है!" वारंवार आठवते. आणि असंही वाटतं रामधारीसिंहांनी कळकळीनं वर्णन केलेली ही ’जनता’ - नक्की कडेलोटाच्या कुठल्या टोकाला जाऊन पेटून उठते? किती राख होईपर्यंत थांबते? कुठवर ताणले जाऊ शकते तिला? आणि का?
आज रामधारीसिंह असते तर त्यांची लेखणी किती धाय मोकलून रडली असती?

असो. त्यांच्या या सुप्रसिद्ध कवितेचा मराठीत भवानुवाद करायचा छोटासा प्रयत्न -

शब्दखुणा: 

आता आकाश जांभळे

Submitted by निखिल मोडक on 19 July, 2023 - 14:17

आता आकाश जांभळे, दिस होतील सावळे
पानोपानी जीवनाचे, पुन्हा येतील उमाळे

आता साचतील तळी, पाणी झरेल ओहळी
शुभ्र कागदाची नाव त्यात सोडतील बाळे

चुडा सजेल हिरवा, ऋतू बहरेल नवा
नव्या काकणाचा नाद, साऱ्या देही सळसळे

काही झुरतील जीव, काही मिलना आतुर
आता उभरत्या वया, नव नवल डोहळे

©निखिल मोडक

शब्दखुणा: 

आता आकाश जांभळे

Submitted by निखिल मोडक on 19 July, 2023 - 14:17

आता आकाश जांभळे, दिस होतील सावळे
पानोपानी जीवनाचे, पुन्हा येतील उमाळे

आता साचतील तळी, पाणी झरेल ओहळी
शुभ्र कागदाची नाव त्यात सोडतील बाळे

चुडा सजेल हिरवा, ऋतू बहरेल नवा
नव्या काकणाचा नाद, साऱ्या देही सळसळे

काही झुरतील जीव, काही मिलना आतुर
आता उभरत्या वया, नव नवल डोहळे

©निखिल मोडक

शब्दखुणा: 

'Perhaps'- वेन यिदुओ (Wen Yiduo) या कवितेचा मराठी भावानुवाद -'बहूतेक…..'

Submitted by मुग्धमानसी on 18 July, 2023 - 06:07

वेन यिदुओ (Wen Yiduo) या चायनिज कवीच्या काही कविता मध्यंतरी वाचनात आल्या आणि फार आवडल्या. त्यातल्या एका ’Perhaps' नावाची गाजलेली कविता मनाला खूप स्पर्शून गेली. कातर करून गेली.
या कवितेचा मराठीत भावानुवाद करण्याचा प्रयत्न केलाय.....

'बहूतेक…..'.

बहूतेक फार फार रडून झालंय तुझं.
आणि आता डोळ्यांत पाणी येईना झालंय…

बहूतेक. बहूतेक जराशी झोप घेणं आवश्यक आहे तुझ्यासाठी.
तर मग आता या रातकिड्यांना आपण शांत व्हायला सांगू.
बेडकांना सांगू की तुमचा गलका गप्प करा.
वटवाघळांनो…, तुमची फडफड बंद करा!

शब्दखुणा: 

सारी खरी कहाणी

Submitted by द्वैत on 16 July, 2023 - 12:34

सारी खरी कहाणी सांगू नको कुणाला
अंधारल्या दिशा की परतून ये घराला

प्रत्येक मेघ नसतो आषाढ श्रावणाचा
अपुल्याच आसवांनी भिजवून घे स्वतःला

पानांस गंध येतो कोमेजल्या फुलाचा
कुठली व्यथा कळेना ठाऊक पुस्तकाला

सोडून झाड मागे कोठे उडून जावे
अद्याप ना उमगले कुठल्याच पाखराला

हेही असे निघाले तेही तसे निघाले
आता नवीन नाते लावू नको पणाला

वस्तीत सज्जनांच्या हिंडून पाहिले मी
गर्दी प्रचंड होती माणूस ना मिळाला

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन