
हा मोह तुझा का होतो,
जरी दूर दूर मी राहतो।
नकळतच मी गुरफटतो,
प्रयत्नांनीही न मग सुटतो॥
मी दिवस तळपत्या उन्हाचा,
तू शांत तरल रात्र चंद्राची।
न कुठेही मेळ दोघांचा,
तरी भेट आपली सांजेची॥
कोणत्या धाग्यांनी बांधलं,
नातं कसं विणलं, कळतच नाही।
दूर अंतराच्या पल्याडही,
ही ओढ कमी होत नाही॥
शब्द न सापडले तरीही,
मन काहीतरी बोलतं।
तू नसतानाही नकळत,
हृदय तुझ्याशीच जुळतं॥
हे स्वप्नाळू मन बेपरवाह,
जाणे कोणत्या गगनात उडतं।
शुभ्र मेघांना घेऊन कवेत,
कोणत्या आकाशी दडतं॥
मी शोधतो माझ्या मनास,
ते गुंतले संपूर्ण तुझ्यात।
समजवता ऐकत नाही,
विरघळले हे मन तुझ्यात॥
पापण्या डोळ्यांच्या मिटता,
चेहरा तुझाच स्पष्ट दिसतो।
उघडताच डोळे मी पुन्हा,
वार्यात पुन्हा विरून जातो॥
मन माझे हेलावून जाते,
चेहरा ही रडवेला होतो।
दिसताच तू मज समोर,
चेहरा आनंदाने फुलतो॥
हा मोह दिवाणा असला,
का माझ्या मनात बसला।
जणू मंद सुगंध रातराणीचा,
श्वासांत माझ्या दरवळला॥
मंगळवार, ३१/३/२६ , ११:११ PM
अजय सरदेसाई -मेघ
मस्त जमली आहे. आवडलीच.
मस्त जमली आहे.
आवडलीच.
तडतडीत शब्द खटकला
तडतडीत शब्द खटकला
बाकी छान आहे.
आवडली
आवडली
@केशवकुल, स्वानंदी१, हरचंद
@केशवकुल, स्वानंदी१, हरचंद पालव
खुप खुप धन्यवाद
तडतडीत च्या जागी 'तळपत्या'
तडतडीत च्या जागी 'तळपत्या' चालेल.
@धनश्री, ठॅंक्यू , छान सजेशन
@धनश्री, ठॅंक्यू , छान सजेशन _/\_