मी!

Submitted by मुग्धमानसी on 7 March, 2014 - 02:16

भगवंताचे डोळे, त्यातले मी पाणी,
चित्तातला वन्ही, विझविते.

कानड्याचे पाय, त्यातली मी वीट,
तोलताहे नीट, तुझी श्रद्धा!

श्रीरंगाचे बाहू, त्यातली मी मिठी,
अद्वैताच्या गाठी, बांधते मी.

ओंकाराचा नाद, त्यातला मी श्वास,
त्याविण विश्वास, जन्म नाही!

उद्याची माऊली, ब्रम्ह तीचे दास,
उरी नऊ मास, जगविते.

थोडी चुलीपाशी, थोडी आकाशाशी,
बाकीची स्वतःशी, उरते मी.

नको पडू पाया, नको करू पुजा,
देव्हार्‍यास दुजा, देव शोध.

माझ्या थोरवीला, आभाळाची मिती,
देव्हार्‍याचे किती, क्षेत्रफळ?

आगीतली धग, पाण्याचा ओलावा,
अनुभव घ्यावा, तेंव्हा कळे!

तसे बाईपण, मातीत मुरते,
आकाशा भिडते, झाड तेंव्हा!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानसी, नि:शब्द करतेस तू! तू लिहिलेल्यापैकी आजवरची सर्वात आवडलेली रचना आहे ही. प्रचंड खोली आहे या कवितेला, तू आणखी कुठे प्रकाशित करत असतेस का? केवळ मायबोलीपुरते नाही तर आणखी जास्त रसिकांपर्यंत, मोठ्या व्यासपिठांपर्यंत पोचायला हवी ही.

मुग्धमानसी,

शरीरापलीकडचा कवी सापडू लागल्याची चिह्ने ठायीठायी दिसतात! बाकी, इतक्या सहजसुंदर रचनेस प्रशंसक विशेषणे लावणे अगदीच विजोड दिसेल! Happy

आ.न.,
-गा.पै.

>>>नको पडू पाया, नको करू पुजा,
देव्हार्‍यास दुजा, देव शोध.

माझ्या थोरवीला, आभाळाची मिती,
देव्हार्‍याचे किती, क्षेत्रफळ?<<

सुंदर ! क्या बात हैं !!
सई/साई म्हणतायत त्याप्रमाणे ही रचना मोठ्या व्यासपिठांपर्यंत पोचायला हवी !

सुंदरच. काही रचना केवळ पुन्हा पुन्हा अनुभवायच्या आणि त्यातून काय मिळते हे नव्याने उमजून घ्यायचे, त्यातील ही, नेहेमी लक्षात राहील.
<<
थोडी चुलीपाशी, थोडी आकाशाशी,
बाकीची स्वतःशी, उरते मी.

तसे बाईपण, मातीत मुरते,
आकाशा भिडते, झाड तेंव्हा! >>

अफाट.

Pages