आता तरी...

Submitted by मुग्धमानसी on 17 June, 2014 - 08:14

आता तरी आभाळाने
जरा खाली सरकावे
माझ्या तापल्या भुईत
थोडे गारवे पेरावे

आता तरी सुर्यानं या
जरा कमी तेजाळावं
माझं पोळतं मीपण
मला कुठेशी सोसावं?

सैलावली वाट सारी
जरातरी ताठ व्हावी
मागे सोडल्या खुणांत
’त्या’ची सय घेता यावी...

वार्‍यानंही जाता-येता
ओले काही आणू नये
त्याचे-माझे शहार्‍याचे
नाते खोल खणू नये!

झुले उंच आकाशात
जावे अन परतावे
असे... इतके सहज..
मीही त्याला आठवावे!

त्याला कळेना काहिही!
फुला तुलाच कळावे...
काही वसंत, बहर...
तूच त्याला कळवावे!

असे सारे एकदाच
खास जमुनिया यावे
तेंव्हा कुठे थोडे थोडे
नाते नव्याने कळावे!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वार्‍यानंही जाता-येता
ओले काही आणू नये
त्याचे-माझे शहार्‍याचे
नाते खोल खणू नये!

>>>
ह्याच ओळी मलाही आवडल्या.... मुग्धमानसी जियो! Happy

वार्‍यानंही जाता-येता
ओले काही आणू नये
त्याचे-माझे शहार्‍याचे
नाते खोल खणू नये!

>>>
वाह!

सगळीच कविता आवडली. काय काय कोट करणार? Happy
जियो!

Happy