मी थांबले... समजू नको!

Submitted by मुग्धमानसी on 6 May, 2014 - 03:57

तू मला व्यापू नको
जा निघ इथून थांबू नको
मी पहूडले आहे जरा
मी थांबले... समजू नको!

तापली होती उन्हे
दिसली जराशी सावली
माझी उपाशी भूक मग
तेथे जराच विसावली

सैलावली स्वप्ने जरा
आशा जरा रेंगाळल्या
या पावलांतून बोचर्‍या
भेगा जरा सुस्तावल्या

मी नेत्र माझे झाकले
छातीत भरला मारवा
पुढल्या उन्हासाठीच मी
वेचित आहे गारवा...

हे झोपणे समजून तू
माझ्याकडे फिरकू नको
मी पहूडले आहे जरा
मी थांबले... समजू नको!

गाठून एकांती मला
गात्रांत माझ्या झिरपुनी
नकळत असा ’चढतोस’ तू
ओळख तुझ्याशी ही जुनी

रक्तातूनी हृदयाकडे
अन् मग विचारांतून तू...
माझ्याच आतून खेचूनी
नेतोस मजला दूर तू...

पुन्हा मला मी शोधणे...
सगळ्या दिशांतून वेचणे...
जोडून फुटके कवडसे
आकार अवघड सांधणे...

सांधले तरिही तिथे
दिसतात ओले कुरूप व्रण
त्या पोकळीतुन मग सतत
झिरपत रहाते क्षुद्रपण

हरवते काहीतरी
ना गवसण्यासाठी कधी
उरते पुन्हा भेगाळलेली मी...
उन्हाखाली उभी!

पुन्हा नको हा खेळ जा...
पुन्हा असे तुटणे नको!
पुन्हा नको दर्शन तुझे
पुन्हा तुझी संगत नको!

आहे पहार्‍याला उभे
चैतन्य माझ्या आतले!
हे सावलीला पहुडले
आहे धुके रंध्रांतले!

मी पहूडले आहे जरा
मी थांबले... समजू नको!
घनघोर नैराश्या मला
आता कधी भेटू नको!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खास..

सांधले तरिही तिथे
दिसतात ओले कुरूप व्रण
त्या पोकळीतुन मग सतत
झिरपत रहाते क्षुद्रपण

हरवते काहीतरी
ना गवसण्यासाठी कधी
उरते पुन्हा भेगाळलेली मी...
उन्हाखाली उभी!

पुन्हा नको हा खेळ जा...
पुन्हा असे तुटणे नको!
पुन्हा नको दर्शन तुझे
पुन्हा तुझी संगत नको!<<< वा वा

आवडली कविता.

आहा मानसी, फार आवडली कविता... त्यातही,

>>>मी नेत्र माझे झाकले
छातीत भरला मारवा
पुढल्या उन्हासाठीच मी
वेचित आहे गारवा...>>>

>>>आहे पहार्‍याला उभे
चैतन्य माझ्या आतले!
हे सावलीला पहुडले
आहे धुके रंध्रांतले!

मी पहूडले आहे जरा
मी थांबले... समजू नको!
घनघोर नैराश्या मला
आता कधी भेटू नको!>>> ह्या ओळी सर्वात जास्त आवडल्या Happy

मी पहूडले आहे जरा
मी थांबले... समजू नको!
घनघोर नैराश्या मला
आता कधी भेटू नको! >>>> ज्जे बात ..... Happy

अप्रतिम काव्य ....

आवडली !

पुन्हा नको हा खेळ जा...
पुन्हा असे तुटणे नको!
पुन्हा नको दर्शन तुझे
पुन्हा तुझी संगत नको! >>>>>+११११११११११११११

Happy