मानस कविता

चुकूनसुद्धा...

Submitted by मुग्धमानसी on 14 May, 2013 - 01:55

चुकूनसुद्धा माझा विषय निघू देऊ नकोस
मनात माझ्या क्षणांनाही जगू देऊ नकोस...

हसून सगळं टाळत जा
क्वचित काही बोलत जा
बोलतानाही शब्दांमध्ये
उगाच हसू घोळत जा
दोन शब्दांत जीवघेणं अंतर पडू देऊ नकोस..

देवापुढे दिवा लाव
हात जोड, डोळे मिट
पसरलेलं सगळं मन
पुन्हा लावून ठेव नीट
पण आठवांच्या उतरंडीला धक्का लागू देऊ नकोस...

पानांमागे विसावलेला
चंद्र हळूच बघताना
गार झुळूक हलकेच तुझ्या
अंथरुणात शिरताना
कवटाळलेल्या स्वप्नांत डोळे भिजू देऊ नकोस...

शब्दखुणा: 

तुझ्याविना सख्या मला...

Submitted by मुग्धमानसी on 7 May, 2013 - 03:45

तुझ्यापासून दूर नेणारा राजमार्ग नको होता
तुझ्याविना सख्या मला चंद्रसुद्धा नको होता

सूर सारे, ताल सारे, शब्द सारे सांडले
ओतताना जीव माझा गीत वेडे माखले
ऐकता करवादले ते - हा उसासा नको होता...
तुझ्याविना सख्या मला चंद्रसुद्धा नको होता!

वाट अश्रुंची कुणी अडवायला आलेच नाही
अन् मलाही का कधी बोलावता आलेच नाही
कोरड्या भेटीस अपुल्या शाप ओला नको होता
तुझ्याविना सख्या मला चंद्रसुद्धा नको होता!

तू उन्हाशी खेळताना आग सारी झेलली
मी तुझ्या पायांत चांदणरात माझी ओतली
पण तू आगीचा खुळा तुज गारवा तो नको होता
तुझ्याविना सख्या मला चंद्रसुद्धा नको होता!

शब्दखुणा: 

बाकी काही नाही!

Submitted by मुग्धमानसी on 23 April, 2013 - 02:38

जरा बरं वाटत नाही... बाकी काही नाही
मनातलं आभाळ फाटत नाही... बाकी काही नाही!

भर सभेत एकटं सोडून मला... मी निघून गेले
स्वतःत मन रमत नाही... बाकी काही नाही!

एका उत्तरापायी प्रश्न सारेच दारी खोळंबले
हल्ली काहिच पटत नाही... बाकी काही नाही!

दोन पावलं चालून फक्त मिटेल सगळं अंतर पण
दिशा तुझी सापडत नाही... बाकी काही नाही!

तुझं येणं-जाणं, असणं-नसणं सगळं चालायचंच
मलाच भेटणं जमत नाही... बाकी काही नाही!

इथे उगवले, सकाळ झाले, आता दुपार आहे तरी
मावळतेपण सुटत नाही... बाकी काही नाही!

शब्दखुणा: 

आजकाल त्यांना माझं काहीच कळत नाही म्हणे....

Submitted by मुग्धमानसी on 5 April, 2013 - 07:17

आजकाल त्यांना माझं काहीच कळत नाही म्हणे,
माझं वागणं बोलणं काहीच समजत नाही म्हणे...

येतात बसतात बोलतात जातात, पुन्हा वळून बघतात
उंबर्‍यावरती मी कधीच दिसत नाही म्हणे...

हजार शब्द सल्ल्यांचे अन् हजार समजुतीचे
ओतत राहतात ते, तरी मी भरत नाही म्हणे...

शून्य डोळे, शून्य मी अन् शून्य असते माझी वस्ती
आकडेमोड ही जगण्याची पण टळत नाही म्हणे...

नक्की कुठेशी कोंडलेलं अन् गुदमरलेलं वादळ असेल
सहज कधी पाऊस असा कोसळत नाही म्हणे...

तुझेच हसणे, असणे-नसणे, स्वतःत हरवून बसणे,
दुःख अताशा तुझ्या स्मृतींना बधत नाही म्हणे...

वाट चुकून सगळीच गावे पसार झालीत बहूदा

शब्दखुणा: 

...येणे झाले!

Submitted by मुग्धमानसी on 2 April, 2013 - 01:47

कधी अलवार पायांनी असे स्वप्नात येणे झाले
कधी बिजलीप्रमाणे तळपुनी निमिषात येणे झाले
जशी यावी फिरूनी ओठी नवथर ओळ गाण्याची
तसे माझे कितीदा फिरूनी या जगण्यात येणे झाले!

प्रवासी मीच होते, वाट मी अन् मीच मंझिल
सभोती किर्र तम मी, मीच हातातील कंदिल
तरिही या ’मी’पणाला वेचताना सांडलेल्या
क्षणांचे नकळता डोळ्यांतल्या पाण्यात येणे झाले!

दुरूनी ते शब्द आले भेटण्या... नवखेच होते
जरी मी आपले म्हटले तरी परकेच होते
सूरांना धाडले बोलावणे, डिवचले वेदनेला...
जरा तेंव्हा कुठे त्यांचे असे गाण्यात येणे झाले!

अताशा मी मलाही सोडलेले या प्रवाही
प्रवाहाला तसाही कोणता आकार नाही

शब्दखुणा: 

तुला पाठमोरे पाहून वाटले रे...

Submitted by मुग्धमानसी on 15 March, 2013 - 03:35

तुला पाठमोरे पाहून वाटले रे
मी एकटी सभोती धुके दाटले रे

तु दे ना मला रुंद छाती तुझी
किती हुंदके या उरी साठले रे

रुसूनी तुझा गारवा दूर गेला
नी घरकुल उन्हाने इथे थाटले रे

माया नसू दे असू दे निखारे
कळू दे मला जे तुला वाटले रे

किती शब्द अडकून बसले गळ्याशी
किती दाट आभाळ हे दाटले रे

दिसेना मला भाबडा चंद्र माझा
कसे चांदणे कोवळे फाटले रे?

कसे कोरडे जाहले सप्त सागर
कशी मी तुझ्या आतुनी आटले रे?

शब्दखुणा: 

चल पुन्हा....

Submitted by मुग्धमानसी on 7 March, 2013 - 02:20

एकदा तूही गिरव पाढे चुकांचे
माझे चुकणेही मला समजव जरासे
एकदा मजला असे समजावताना
तु तुझ्याही वागण्याचे कर खुलासे

एकदा हातात माझा हात घे तू
येऊदे डोळ्यांतही पाणी जरासे
झेलताना थेंब तळहातांवरी तो
उमलुदे ओठांवरी ते स्निग्ध हासे

चल पुन्हा गाठू नदिचा काठ दोघे
त्या तरंगांना पुन्हा भेटू जरासे
बांधले होते जिथे भवितव्य सारे
फेकुया पुन्हा नवे तेथेच फासे

एकदा माझ्याकडे तू बघ असे की
हरपुनी जातील जखमांचे उसासे
पेर तू स्वप्ने नवी भेगांमधूनी
बहरुनी येतील माझे रिक्त वासे

वाहले कित्ती पुलाखालून पाणी
वाहते होऊ तुही-मीही जरासे
कोण चुकले? काय चुकले?- शोधताना..

शब्दखुणा: 

आठवत नाही...

Submitted by मुग्धमानसी on 1 March, 2013 - 00:27

कुठे मी भेटले होते तुला ते आठवत नाही
’तशा’ स्मरणांस कोठे ठेवले ते आठवत नाही...

तुझ्या डोळ्यांत पाहून लाजलेला चंद्र माझा
घरावर टांगलेला कोणी खुडला आठवत नाही...

कधी तळहात माझे मेहेंदीचे तू चुंबिले होते
कधी ते रंगले त्यानंतरी ते आठवत नाही...

तुझा तो प्रश्न हळवासा अजुनही आठवे मज
कसे माझेच उत्तर हाय, मजला आठवत नाही...

मला उमलायचे होते, तुला बहरायचे होते
अचानक काय चुकले ते मलाही आठवत नाही...

तुझ्या स्वप्नांस माझ्या अश्रुंनी पोसायचे होते
कशी स्वप्नेच या अश्रुंत बुडली आठवत नाही...

शब्दखुणा: 

मान्यच आहे मला समजणे दुरापास्त आहे...

Submitted by मुग्धमानसी on 27 February, 2013 - 00:05

मान्यच आहे मला समजणे दुरापास्त आहे
आता तुझ्याच अकलेवर सगळी भिस्त आहे!

कठीण केवढी तुझी गणिते
मी बापुडी गिरवीते कित्ते
विश्वाचे तुज प्राप्त ज्ञान अन्
मलाच मी शोधण्यात व्यस्त आहे!

तुझे बोलणे किती शहाणे
माझे अल्लड वेडे गाणे
मम शब्दांसही नाही तितकी
तव विस्मरणांसही शिस्त आहे!

इथे तिथे भटकूनी थकले
कडे कपारी शोधून आले
बाजारी तुज भेटुन कळले
ज्ञान खरे एवढे स्वस्त आहे!

अथांग आकाश आणि धरती
अशी अंतरे कोण पार करती?
कुठेतरी क्षितिजावर भेटू
अशी अपेक्षा जरा रास्त आहे!

तुझे बहरणे घमघमणारे
तुला ऋतूंचा तोटा नाही
असेन फुल मी बिनवासाचे
परंतू अगदिच काटा नाही
असल्या चिंता तुला सोपवून

शब्दखुणा: 

श्रीराम!

Submitted by मुग्धमानसी on 25 February, 2013 - 06:17

तुझ्या मधाळ शब्दांनी नाही फसत श्रीराम
आजकाल आसवांनी नाही भिजत श्रीराम!

भरलेली झोळी पुन्हा पुन्हा पसरावी किती..
अशा भिकेला रे भिक नाही घालत श्रीराम!

भेट सगळ्यांची घ्यावी कुणा टाळण्याच्या पूर्वी
भेटायाला येण्याआधी नाही सांगत श्रीराम!

ताट नैवेद्य सजला तूप पुरणाची पोळी
भूक त्याची अनंताची नाही भागत श्रीराम!

करी कल्लोळ टाळांचा त्यांना ठाउकच नाही...
हल्ली तिथे गाभार्‍यात नाही वसत श्रीराम!

तुझ्या पुजा-भजनात सारे असे गढलेले
तुझे नाम उच्चारणे नाही जमत श्रीराम!

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मानस कविता