दत्त

स्वीकारले जीणे

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 12 August, 2019 - 13:30

स्वीकारले जीणे
आहे तैसे दत्ता
जगता जगता
जाय पुढे

दुःखाचे ओझे न
सुखाची काळजी
रित जगण्याची
जाणियली

केवढा हा पसारा
सांभाळसी प्रभू
माझी मात सांगू
काय तुला

घडावे स्मरण
तुझे प्रेम भरी
तेणे उपकारी
सुखीया मी

आणिक ती काही
वांछा मनी नाही
सारे तुझ्या पायी
वाहीयले

शब्दखुणा: 

हे प्रियतम आत्मन

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 29 July, 2019 - 10:31

**************
म्हटले तर मी
दिवस मोजतो आहे
म्हटले तर मी
दिवस विसरतो आहे
मोजामोजीत ठेवाठेवीत
तुजला परि शोधतो आहे
तुझे अंधार पांघरून निजणे
तुझे दिशा होवुन जगणे
सारेच विभ्रम सौंदर्यांचे
अन् त्यात माझे खुळावून जाणे
हे सारे जरी असे नित्याचे

कधी परि माझ्यात उलगडते
स्वप्न तुझे शुभ्र चांदण्यांचे
गर्द वनराईवर पडलेले
शांत स्निग्ध मनोज्ञ एकांतातले
तू असतोस कातळात गोठून
हळूवार हवेत पसरून
मोकळ्या माळावर गाणे होवून

शब्दखुणा: 

मनाचा बाजार

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 9 July, 2019 - 11:15

मनाचा सुमार
चालला बाजार
नच अंतपार
याला दत्ता ॥

हवेपणाला या
अंतर पडेना
स्वप्नांची सरेना
मोजदाद ॥

एक मिळताच
चिकटे दुजाला
मोहाच्या झाडाला
लाख फुले ॥

का रे तडफड
व्यर्थ धडपड
जरी डोईजड
उतरेना ॥

मोहात धावते
पापाला बुजते
अडते रडते
रात्रंदिन ॥

विक्रांत मनाला
वाहितो तुजला
स्वीकारा दयाळा
दत्तात्रेया॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in

००००

शब्दखुणा: 

परानुभूती

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 4 July, 2019 - 13:13

परानुभूती
*******

अधाशी मनाला
उन्मनी वाटली
नशा काही केली
दुसऱ्याची

परी काही केल्या
जाईना तो तोल
सरेना नि बोल
अडकला

फुकटची नशा
चढत नसावी
इथली असावी
रित काही

आणि खिसा खाली
नाहीं छण छण
कलाल कुठून
काय देई

जावे खाल मानी
इथून निघून
तोंड लपवून
ऐसे होते

झिंगल्याचा भास
हरवून जाता
तुज दारी दत्ता
पुन्हा आलो

सतरावीचे स्तन्य
देई मज दत्ता
तुर्येच्या अमृता
पान करी

शब्दखुणा: 

नेई मज दत्ता

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 3 July, 2019 - 12:00

नेई मज दत्ता
****************
नेई मज दत्ता
पुन्हा चांदण्यात
पुन्हा पावलात
स्वर्ग नांदो ॥

पुन्हा माथ्यावरी
झळाळो तो चंद्र
ओघळावा सांद्र
तुही मनी॥

तीच लवलव
हिरव्या पानात
चंदरी रसात
दिसू दे रे ॥

कभिन्न कातळी
हरूनियां भान
माझे हे मी पण
जाऊ दे रे ॥

दरीतला वारा
येऊ दे भरारा
मनाचा पिसारा
फुलू दे रे ॥

साद कानांवर
जय गिरनार
पुन्हा एकवार
पडू दे रे ॥

लोभस ती मूर्ती
दिसू दे चरण
डोळ्यात भरून
पाहू दे रे ॥

शब्दखुणा: 

करुणा बहाळी

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 27 June, 2019 - 09:36

करुणा बहाळी
***********

मज देऊनिया शब्द
कृपा दत्तराये केली
प्रीत दाटली मनात
पदी वाहता ती आली

बाप कृपाळु कैवारी
मज धरूनिया हाती
मार्ग सुकर करून
आडरानातून काढी

शब्द पिकल्या मनाचा
मज करूनिया माळी
करी कौतुक जगात
असा करुणा बहाळी

त्यांच्या प्रेमात गुंतलो
मज हरवून गेलो
प्राप्त भोगतो संसारी
नच इथला उरलो

ऐसा कैवल्याचा रंग
मज खुणावू लागला
यत्न अवघा सरला
शब्द सोहळा उरला

शब्दखुणा: 

दत्त वसंत

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 26 June, 2019 - 12:34

दत्त वसंत
********
माझ्या मनी पालवला
दत्त सुखाचा वसंत
गेल्या भरूनिया दिशा
अवघा आनंदी आनंद॥
चैत्र पालवी सुरेख
गंध सुमनांचा मळा
स्वर नामाचा विलसे
फुले कोकिळेचा गळा ॥
वारा उत्तरेचा मंद
येई सांजेला घेऊन
गंध चंदनाचा काही
नेई राउळी ओढून ॥
देही उत्सव नटूनी
मनी ऋतुराज येई
धुंद मोहर जाणिवी
सुख उघडून जाई॥
भाग्य आले माझ्या दारी
तन मनाचे तोरण
होई विक्रांत हिंदोळा
सुखा थिटे त्रिभुवन ॥
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

बाप कृपाळुवा दत्त

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 24 June, 2019 - 11:30

बाप कृपाळुवा दत्त
********
दिशा गेलेल्या गिळून
जग गेलेले संपून
तुझे अस्तित्व उरले
तन मनाला वेढून

थेंब पाण्यात सांडला
थेंब वाहता जाहला
थेंब थेंबाचा सागर
थेंब म्हणावे कुणाला

वाट धुकट धुसर
नभ ओघळे झांजर
उब पदरी बाळाला
तैसे सुखावे अंतर

सारे दुःखाचे उखाणे
गेले सुखात मुरून
नाव दत्ताचे ओठात
लाज जगाची सोडून

बाप कृपाळुवा दत्त
सवे नाथांचा संघात
झाला भाग्याचा विक्रांत
तया पायी होतो रत

शब्दखुणा: 

सुखावलो दत्ता

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 22 June, 2019 - 10:42

सुखावलो दत्ता
************

सुखावलो दत्ता
तुजला पाहता
जाहलो वाहता
कोंडलेला

मोहाचा पिंपळ
धुनीत जळला
जन्माचा सरला
एक गुंता

आता विभूतीचे
कौतुक मनाला
लाविले भाळाला
विनोदाने

गाता दत्त दत्त
सरले ते भय
सुखाचे उपाय
कळू आले

नेई मज बापा
हव्या तैश्या वाटा
दत्ता अवधूता
झालो तुझा

विक्रांत भाग्याचा
चाकर दत्ताचा
चुकार सेवेचा
प्रिय झाला

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - दत्त