दत्तात्रेय

श्री दत्त सोनार

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 20 June, 2020 - 11:33

*****
श्रीदत्त सोनार
मज दे आकार
फुंक हळूवार
मारूनिया॥

जाळ वळवून
तपे तापवून
किंचित ठोकून
आणे गुणी॥

वितळवी मुशी
दे दोष जाळून
सद्गुण घालून
किंचितसे ॥

करी घडवणं
देऊन आकार
नाम अलंकार
अनाम्याला ॥

नीट घडवितो
परी कर्मागत
जगण्या प्रारब्ध
वाट्याचे ते ॥

पापाचा तो पैसा

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 31 July, 2019 - 11:21

पापाचा तो पैसा
****************

पापाचा तो पैसा
असे रे कोळसा
आत्म्याचा आरसा
काजळता

देतो जगण्याला
सारे विश्वंभर
तया कृपेवर
आस्था न का?

मनाची या हाव
नाही सरणार
आग मागणार
तेल सदा

एक एक पैसा
होय पाप ओझे
दार नरकाचे
रुंदावते

जळू दे रे हात
माझे अवधूता
चुकून लागता
तया कधी

विक्रांता भाकर
देई एक वेळ
नावे ओठांवर
आणि तुझे

दत्त वसंत

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 26 June, 2019 - 12:34

दत्त वसंत
********
माझ्या मनी पालवला
दत्त सुखाचा वसंत
गेल्या भरूनिया दिशा
अवघा आनंदी आनंद॥
चैत्र पालवी सुरेख
गंध सुमनांचा मळा
स्वर नामाचा विलसे
फुले कोकिळेचा गळा ॥
वारा उत्तरेचा मंद
येई सांजेला घेऊन
गंध चंदनाचा काही
नेई राउळी ओढून ॥
देही उत्सव नटूनी
मनी ऋतुराज येई
धुंद मोहर जाणिवी
सुख उघडून जाई॥
भाग्य आले माझ्या दारी
तन मनाचे तोरण
होई विक्रांत हिंदोळा
सुखा थिटे त्रिभुवन ॥
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

ओवळा

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 31 May, 2019 - 12:24

ओवळा
******
सोवळ्या वस्त्रास चाले
ओवळा तो ऐसा पैसा
विटाळतो माणसाला
माणसाचा स्पर्श कैसा

जात माणसांची मोठी
देवाहून असते का ?
घाबरून तुझी माझी
देव पूजा चालते का ?

जातीपातीचे हे गट
कळपाचे का रक्षक
तेच अन्न खातो ना रे
संत भक्त नि भिक्षुक

त्याच संवेदना आत
तिच आस जाणण्याची
तीच कळ अंतरात
तुकोबा नि चोखोबाची

दत्ता दे रे मती काही
रीतभात बदलाची
सर्व कर्मकांड वर्ण
गुढी उभार आस्थेची

इडा पीडा सारी

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 29 May, 2019 - 10:38

इडा पीडा सारी टळो
दत्त प्रेम उरी झरो
मध्यमेचे महासुख
चेतनेत माझ्या उरो ॥

उलथून स्वर्ग सारा
गंगा धरे अवतरो
प्राशितांना पुण्य परा
मला मीही नच स्मरो ॥

डिंडिंमता अनुहत
हृदयात असा भरो
कणकण पारा होत
वारा आर पार सरो ॥

पेटलेल्या वन्हीला त्या
घोट सागराचा पुरो
स्वप्न सत्य मांडणारे
वस्त्र अंतरीचे विरो ॥

दत्त स्वप्न विक्रांतचे
दत्ता मध्ये पूर्ण मुरो
भासमान अस्तित्व नि
नाम रूप सारे हरो ॥

तुझ्यावाचून

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 27 May, 2019 - 09:43

तुझ्यावाचून
*******:
सरला दिन तुझ्या वाचून
व्यर्थ जगलो जन्मा येऊन ॥

भांडी घासली या जगताची
कचरा पाणी गेले वाहून ॥

तेच हिशोब पुन्हा मांडले
त्याच खर्चात मन सांडून ॥

कळते मजला माझ्यावाचून
जग चालते युगे होऊन ॥

तरीही चाले उठाठेव ही
चक्र कुठले पायी बांधून ॥

नकोस जावू असे सोडून
दत्ता भगवे स्वप्न मोडून ॥

माळावरती पडली काडी
तुझ्या धुनीत जावी जळून ॥

जळता देह या जन्मातून
तुझाच दत्ता जावो होऊन ॥

आस लागली विक्रांतला या
आतूर काया जावी मिटून ॥

दत्ता नको असे

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 24 May, 2019 - 10:53

दत्ता नको असे
*************
दत्ताला नोटांची
नको असे थप्पी
मोजतो तो जपी
तद्रूपता ॥

दत्ता नच दावू
नाणी खुळखुळ
विश्वाला समूळ
कारक जो

दत्ता न पापात
कधी दे आधार
शिक्षेला सादर
होय तिथे

दत्त नच देत
दुर्जनास बळ
धावतो केवळ
भक्तासाठी ॥

दत्त ना लोभी
सोन्याचा कधीही
विरक्त विदेही
सर्वकाळ ॥

दत्ता नच हवी
दानाची ती पेटी
आपुल्या आवडी
भक्त ठेवी

दत्त नच काळ्या
पैशात तो भागी
भक्ति प्रेम मागी
सदोदित ॥

दत्ता दत्ता मीत हो रे

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 21 May, 2019 - 13:25

दत्ता दत्ता मीत हो रे
तुझी फक्त प्रीत दे रे
तव गुण गाण्यासाठी
तूच तुझे गीत दे रे

दत्ता दत्ता थेट ये रे
कडकडून भेट दे रे
तन मन हरो माझे
असे काही वेड दे रे

दत्ता दत्ता माझा हो रे
देह तुझ्या काजा घे रे
मी पणे जडावला हा
असह्यसा बोजा ने रे

भजतांना तुज दत्ता
भजणेही सरू दे रे
सारे जिणे माझे तुझ्या
पदी लीन होवू दे रे

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

विषय: 

दत्त चित्ताचा अंकुर

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 15 May, 2019 - 11:39

दत्त चित्ताचा अंकुर
************

आला मायेला भेदून
दत्त चित्ताचा अंकुर
खोल जीवात दडली
आस प्रकाश आतूर ॥

मोक्ष वसंता चाहुल
दत्त मनाचा मोहर
भक्ती रसात ओघळे
गंध मदिर सुंदर ॥

दत्त जाणिवेचे फुल
येई हळू उमलून
माझे पणात आलेला
मज मी पणा कळून ॥

नाम गंधात भिजली
दत्त वायूची लहर
माझ्या चित्तात वसली
प्रभू प्रेमाचीच कोर ॥

तृष्णा तापल्या जीवास
दत्त मृगाचा पाऊस
तया एकरूप होता
सरे जीवनाची हौस ॥

Pages

Subscribe to RSS - दत्तात्रेय