दत्त

गिरनार

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 21 June, 2019 - 09:37

g5.jpgजीवा घालणारी साद
दाट धुक्यातील वाट
दीप दूरवर मंद
याद साठलेली आत

पान पान ओेले चिंब
चिंब भिजलेले मन
चहू बाजूने गगन
दत्त विराट होऊन

पाय अनवाणी वेडे
होते अधीर धावत
खडे टोचणारे काही
नाव ओठात आणत

झालो पवित्र पावन
तूच श्वासात देहात
शिर भिजलेले ओले
तुझा डोईवर हात

कण कण सुखावला
दत्त चैतन्यी सजला
आलो कुठून कुठला
सारा विसर पडला

शब्दखुणा: 

देई रे कोपरा

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 20 June, 2019 - 09:38

देई रे कोपरा
**********
प्रत्येक पायरी
असे प्रभू दत्त
शिखर न अंत
चालण्याचा ॥

प्रत्येक श्वासात
कृपेचा प्रपात
तुझिया ऋणात
जगतो मी ॥

असा घडो यज्ञ
प्रभू जगण्याचा
घडो सर्वस्वाचा
स्वाहाकार ॥

सरू दे संकट
सरत्या क्षणांचे
रित्या या काळाचे
अंतहीन ॥

देई रे कोपरा
तुझ्या कपाटात
मज स्वरूपात
ठेवी दत्ता ॥

शोधतो विक्रांत
कडी कपारीत
यावे अवचित
दिगंबरा ॥

शब्दखुणा: 

शिणलो रे

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 8 June, 2019 - 14:54

************
दत्ता शिणलो रे शिणलो
तुझिया पदी मी आलो ॥
आता सरली रे ताकद
करी करुणा हे भगवंत ॥
जीव हा जगी होरपळे
करी तू वर्षा कृपाळे ॥
तुज वाचून रे मजला
कुणी नाही रे दयाळा ॥
जन्म गेला रे वाया
व्यर्थ शिणली ही काया॥
करू नको रे अव्हेर
कृपा करी दासावर ॥
विक्रांत भवात बुडता
बोल लागेल तुज दत्ता ॥
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
००००००

शब्दखुणा: 

दिगंबरी मन

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 5 June, 2019 - 09:24

दिगंबरी मन
ठेविले वाढून
मी पण काढून
बाईयांनो ॥

घडले भजन
नाही वा कीर्तन
दिला पेटवून
प्राण फक्त॥

जप तप नच
घडले यजन
व्याकूळ होवून
शब्द दिले ॥

जरी जगतोय
संसारी वाहून
अंतरी स्मरून
सदा तया ॥

काळवेळ काही
ठाव मला नाही
येता याद देई
गळा मिठी ॥

सखा गिरणारी
भरला अंतरी
जगणे उधारी
आता मला ॥

॥ गुरुदेव दत्त ॥
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शब्दखुणा: 

द्वैताची पेरणी

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 3 June, 2019 - 09:36

द्वैताची पेरणी

****:
येतात विचार
जातात विचार
घेऊन आकार
जगताचा ॥

नाती गोती सारी
रंगवी रंगारी
अस्तित्व कुसरी
येवुनिया ॥

आत बाहेरील
जग ना वेगळे
असे एक सरे
क्षण रूप ॥

पदार्थ वाऱ्याचा
गोळा वा पाण्याचा
हाती का यायचा
कधी कोणा ॥

पाहता पाहता
बुडालो शून्यात
कुणी ना कुणात
राहियेले ॥

विक्रांत पाहता
डोळियांचा डोळा
आतलिया खेळा
ओसाडलो॥

दत्ताचिये वाणी
उतरली मनी
द्वैताची पेरणी
करपली ॥

पहा रे जगता

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 2 June, 2019 - 10:37

पहा रे जगता
**********

माझ्या जाणिवेला
फुटले धुमारे
जग पाहणारे
यथावत ॥

होवूनी निवांत
सुटूनिया कष्ट
पाहण्याचे फक्त
भान उरे ॥

अवघाची खेळ
चालला केवळ
वाफेचे ते बळ
आधणाला ॥

दुनिया चालते
मनही धावते
काय अन कुठे
ठाव नाही ॥

माय मदालसा
सांगते विक्रांता
पाहा रे जगता
निरखून ॥

अवधूत कृपे
जाणियले वर्म
मरू गेले कर्म
उगवते ॥

शब्दखुणा: 

दत्ताने दाविले

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 1 June, 2019 - 11:27

************
मनाचा किनारा
चिवट चिकट
सोडता सोडत
नाही कधी ॥

रंगांचे विभ्रम
दाखवी अनेक
घडती कित्येक
भास नवे ॥

भय दलदल
कधी दाखवून
घेतसे ओढून
स्वतः कडे ॥

कधी अधिकार
कवण्या पदाचा
संतांच्या मठाचा
महाथोर ॥

कधी अनुभूती
ध्यानी ज्या येती
त्याची संगती
बांधुनिया ॥

रंग रूप रस
अवघे इमले
मनाने बांधले
असे जगी ॥

दत्ताने दाविले
म्हणूनी कळले
विक्रांता घडले
पाहणे ही ॥

ओवळा

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 31 May, 2019 - 12:24

ओवळा
******
सोवळ्या वस्त्रास चाले
ओवळा तो ऐसा पैसा
विटाळतो माणसाला
माणसाचा स्पर्श कैसा

जात माणसांची मोठी
देवाहून असते का ?
घाबरून तुझी माझी
देव पूजा चालते का ?

जातीपातीचे हे गट
कळपाचे का रक्षक
तेच अन्न खातो ना रे
संत भक्त नि भिक्षुक

त्याच संवेदना आत
तिच आस जाणण्याची
तीच कळ अंतरात
तुकोबा नि चोखोबाची

दत्ता दे रे मती काही
रीतभात बदलाची
सर्व कर्मकांड वर्ण
गुढी उभार आस्थेची

इडा पीडा सारी

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 29 May, 2019 - 10:38

इडा पीडा सारी टळो
दत्त प्रेम उरी झरो
मध्यमेचे महासुख
चेतनेत माझ्या उरो ॥

उलथून स्वर्ग सारा
गंगा धरे अवतरो
प्राशितांना पुण्य परा
मला मीही नच स्मरो ॥

डिंडिंमता अनुहत
हृदयात असा भरो
कणकण पारा होत
वारा आर पार सरो ॥

पेटलेल्या वन्हीला त्या
घोट सागराचा पुरो
स्वप्न सत्य मांडणारे
वस्त्र अंतरीचे विरो ॥

दत्त स्वप्न विक्रांतचे
दत्ता मध्ये पूर्ण मुरो
भासमान अस्तित्व नि
नाम रूप सारे हरो ॥

Pages

Subscribe to RSS - दत्त