राम कृष्ण नामीं उन्मनी साधली

Submitted by दत्तात्रय साळुंके on 29 June, 2023 - 00:21

आली कुठून ती कानी
टाळ मृदंगाची धून
नाद विठ्ठल विठ्ठल
उठे रोम रोमातून

दिंड्या पंढरीच्या वाटेला लागल्या आणि टाळ मृदंग निनादले. रोमारोमात विठ्ठल भिनला.अंतरग विठूमय झालं. त्या व्यतिरिक्त सारं निर्थक वाटू लागलं.
खिल्लारी पांढरी शुभ्र बैलजोडी सजवलेले रथ ओढताहेत, त्यात गोंड्यांनी सजवलेली पालखी, तीत संत पादुका, भाविकांची दर्शनासाठीची मांदियाळी, रथाच्या मागेपुढे दिंड्या, मृदंग, टाळासोबत विठूचा गजर. तो गजर करणारा वारकरी, त्यांचं ते माऊलीचं सुंदर रुपडं. सफेद टोपी, सदरा, धोतर हा पुरुषांचा पेहराव. कपाळी अष्टगंध टिळा, अबीर, गळ्यात तुळशी माळा. सगळीकडं विठ्ठल भारलाय. खेडूत स्री वारकरी न‌ऊ वारी साडीत, डोईवर तुळशीचं छोटूसं वृंदावन अन त्यात तुळसाई. फुगड्या घालत, फेर धरत, हरीनामाचा गजर करत वारी पुढे सरकतेय. वातावरणात पांडुरंग भरलाय.
वारीची एखादी अल्पावधीची क्लिप आपणही घरबसल्या दुरदर्शनवर पाहिली तरी आपण वारकरी होत वारी बरोबर धाऊ लागतो.
अखंड जया तुझी प्रीती
मज दे तयांची संगती

अशीच आळवणी आपण आणि वारकरी करतो.
या संताची तुझ्यावर अखंड प्रीती आहे. अभंगवाणीच्या रूपाने ते आजही जीवंत आहेत. या संतांच बोट धरूनच मी ही तुझ्या भेटीला निघालोय‌. असाच भाव वारक-यांच्या मनात दाटतो.
पेरण्या होवो अथवा न होवो, घरात अडचण आहे, पैसे नाहीत तरी महाराष्ट्रातला बहुतांश शेतकरी वारी करतोच. संसारी अडचणी वारीआड येत नाहीत. वारी आली की तो कासावीस होतो. आकाशात पावसाळी ढग नसले तरी मनात पारमार्थिक पाऊस दाटून येतो आणि वारकरी चिंब होतात.
जन्मात एकतरी वारी अनुभवावी असं म्हणतात. हे अनुभवनं खरचं खूप विलक्षण असतं. सगळं ठरलेल्या वेळेत करायचं. सकाळी ६ वाजता पालखी प्रस्थान करते तत्पूर्वी स्नान आटोपायचं. तेही थंड पाण्याने. कुठलं बाथरूम, कुठला साबण, टावेल . वाटेतच कोण चहा देतं, कोण नाष्टा देतं . कोण देईल ते खायचं. आकाश पांघरायचं. हाच दिनक्रम १५ ते २० दिवस. परतीच्या वारीला कमी दिवस लागतात. दिवसरात्र त्याचं नामसंकीर्तन. संसारी चिंताना स्थानच नाही.
कधी तळपतं ऊन झेलत ४०-४२ अंश तापमानात चालायचं. कधी नुसतंच डहूळलेल्या पावसाळी आभाळाच्या सावलीला चालायचं. कधी पावसाच्या धारात चिंब होत चालायचं. अंगावर गार वारं झेलायचं. पण सर्वकाळ मुखानं नामघोष चालूच ठेवायचा. चेह-यावर चिरंतन सुख ओसंडत असत़. डोळा पंढरीच दिसत असते.
डोळ्यात फक्त आणि फक्त तोच सावळा…पाडूंरगाव्यतिरिक्त संगळं रंगहीन वाटतं. अन वयाचं भान विसरून पावलं बेभान धावतात पंढरीच्या वाटेवर. एक ८०-८५ वर्षाचा वारकरी पालखी सोहळ्या सोबत तरुणाईला लाजवेल अशा उत्साहात सामिल होतो.
हल्ली हळूहळू वारी बदलतेय. वारीत डॉक्टर , इंजिनिअर, आयटी इंजिनियर अशी शहरी मंडळी दिसू लागली. मोबाईलवर घरी संपर्क होऊ लागले. पूर्वी बहुतेक ठिकाणी वारीसाठी घराघरातून मागून आणलेल्या बेसन भाकरीची जागा वरणभात , भाजी,चपाती, खीरीनं घेतली. नाष्ट्यामध्ये शिरा, खिचडी, पोहे आले. वारीची सेवा म्हणून हे पदार्थ लोक देऊ लागले.
वारी बरोबर पालं, पाणी, स्वयंपाकाचं साहित्य वाहणारे ट्रक आले.
सगळे सगेसोयरे, संसार मागं सांडूंन वारकरी वारीची वाट धरतात तेव्हा मनात वैराग्य जागत असावं असंच वाटतं.
लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरिवीण ॥२॥ नाम मंत्र जप कोटी जा‌ईल पाप । रामकृष्णीं संकल्प धरुनि राहें ॥३॥
हा एकच संकल्प असेल तर कशाला संसार आठवेल. निदान वारी काळात तरी संसार लटका व्यवहारच वाटतो. त्याच नाव नाही घेतलं तर जन्म मरण वाया येरझार वाटते.
खरचं सगळी वारी झपाटलेली असते पंढरीच्या भूतान …
पंढरीचें भूत मोठें । आल्या गेल्या झडपी वाटे ॥१॥
वारीला जायची इच्छा मनात दाटलीय पण संसारी बंध भक्कम आहेत त्यामुळे मनात येतं, नाही या वर्षी जमत तर वारी बरोबर चारदोन मैल तरी चालू. पूर्ण वारी न करणारे ही काही अंतर वारी सोबत चालतात आणि वारी अनुभवतात. हल्ली परदेशी लोकही वारीला येतात. इंग्लंड, अमेरिकेत दिंड्या निघतात.
दोघेही प्रेमी दोन्हीकडे भेटीसाठी आतू्र झालेले असतात. तोही रखमा राणीला सांगतो बघ आता तू फक्त माझ्या बाजूला गप्प उभी रहा. आता मला तुझ्याशी बोलायला फुरसत नाही. सगळा वेळ संताची खुशाली विचारण्यात जाईल.
दोंघांची अधिरता पराकोटीची. त्याला यांच्या भेटीची आणि यांना त्यांच्या भेटीची.
होयें वारकरी । पांहे पांहे रे पंढरी ॥१॥
काय करावीं साधनें । फळ अवघें चि तेणें ॥धृ.॥
अभिमान नुरे । कोड अवघें चि पुरे ॥२॥
तुका म्हणे डोळां । विठो बैसला सांवळा ॥३॥

अशी उन्मनी अवस्था. हिची प्रचिती वारकरी क्षणोक्षणी घेत असतो. पाऊस पडून एका मैदानात चिखल झालाय. पावलं चिखलात माखूंन गेलीत. अशा चिखलात रिंगण करून बसकन मारतात. पाय पसरतात, ज्ञानोबा माऊली, तुकाराम म्हणत हाताने टाळ उंचावत पाठीवर आडवं होतात. पुन्हा उठतात. मृदंग घुमतोय तसतसं ही उन्मनी अवस्था घनदाट होतेय. सगळे कपडे चिखलात माखतात पण ज्याला हरीनामानं माखलयं त्याला चिखल म्हणजे हरीनामाचा मळवट वाटतो.
राम कृष्ण नामीं उन्मनी साधली । तयासी लाधली सकळ सिद्धि ।।
हा सगळा छंद कशासाठी तर माहेर गाठण्यासाठी.
जाईन गे माये तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥ सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन ।
क्षेम मी देईन पांडुरंगी

सासरच्या सासूरवासाला कंटाळलेली सासूरवाशीण माहेरवाशीण होतेय. आपल्या आईला भेटतेय. क्षेमकुशल देतेय.
त्याला भेटेपर्यंत एकच ध्यास. देहभान विरतं त्या सगुनाचे ठायी.
ही वारी आत्मशुध्दीची जशी तशीच आत्मरूपात विलयाची. आत्मा, परमात्मा मिलनाची. द्वैत मिटायची. एकदा सगळीकडं तोच दिसू लागल्यावर कुठे उरतं वैयक्तिक वेगळं अस्तित्व. हो पण परमार्थ साधता साधता एक बायप्रोडक्ट आपसूक मिळतं वारीत .
वैचारिक देवाणघेवाण होते. मनाच्या कक्षा रुंदावतात. मनाचा कोतेपणा गळून पडतो.
येवढ्या लोकांच नियोबध्द, शिस्तबध्द चालण अवाक करतं. तो जगंनियंताच नियोजन करतो. त्याचं नाव घेतल्यावर वैरभाव, दांडगटपणा, खोटेपणा सारं विरतं. मनातल्या क्षुद्र भावना आपोआप लय पावतात. या भव्य, विलोभनीय, अनुपम्य, पारमार्थिक सोहळ्यात सहज सर्वाठायी विठाई दिसते. मग इहलोकीचं नाव जसं सहज गळत ( सगळेच माऊली) तसा द्वेष, राग, मत्सरही गळतो. उरतं फक्त अखंड, अमाप प्रेम. लहानाच्या पाया पडताना मोठेपणा गळून पडतो. एकदा लहानाला माऊली मानलं की कसलं मोठेपण. वारीत अलौकिक आनंद मिळतो.आपली अवस्था अशी होते…..
आनंदाचे डोही आनंदतरंग ।
आनंद चि अंग आनंदाचे ॥
काय सांगो जालें कांहीचियाबाही ।
पुढें चाली नाहीं आवडीनें ॥

असं काहीतरी होतं की संसार गोठतो. पुढं सरकतो फक्त परमार्थ.
हा वारीचा योग कधी येतो….
जन्मोजन्मी आम्ही बहू पुण्य केले
तेव्हा या विठ्ठले कृपा केली

त्याचं बोलावणं अदृश्य असतं. लेकीला आणायला मु-हाळी येत नाही.लेकच माहेराच्या वाटेंने धावू लागते. एवढी सामर्थ्य त्याच्या या कृपेत आहे.
एकदा त्याला डोळा भरून साठवलं की परतं पुढच्या वारी पर्यंत ते पुरवायचं आणि पुन्हा संसारी सुखदुःख त्याचा प्रसाद मानून भोगायचं. तो तर नेहमी बरोबर असतो अर्जुना बरोबर होता तसा निशस्त्र हितगुज करायला. लढाई आपली आपण लढायची. तो योगीराज आहे त्यामुळे त्याला संसारी काही मागायचं नसतं. वारकरीही फक्त आणि फक्त त्याला डोळा भरून पाहतात. हातात वैराग्य पताका घेतात. इच्छा आकांशांचा वारु मर्यादेच्या रिंगणात ठेवतात. पांडुरंग कधीकाळी मर्यादा पुरुषोत्तम रामही होता. संसारात राहून मर्यादा, विरक्ती कशी अनुभवावी याचा आदर्श म्हणजे प्रभू राम. त्याच्या नामघोषाची टाळ, वीणा हृदयात नित्य झंकारावी.
रामकृष्ण हरी…..
© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जन्मोजन्मी आम्ही बहू पुण्य केले
तेव्हा या विठ्ठले कृपा केली
ही वारी जे अनुभवतात ते खरोखरच सुदैवी.
तुमचे वाचूनच माझे पोट भरले,

केशवकूल
अनिंद्य
मनीमोहोर
साद
हीरा
अनन्त यात्री
सामो
निर्मल

अनेकानेक धन्यवाद...

प्राचीन
sanjana25
स्वाती2

मनापासून आभार...

शर्वरी
चंबू

अनेकानेक धन्यवाद..