मग तू अवघाचि सुखरुप होसी ....
वैशाखाचं कळाकळा तापणारं ऊन केव्हाच संपून गेलंय, इतकंच काय एखाद-दुसरा सुखद वळिव हि कोसळून बराच काळ लोटलाय .....ज्येष्ठातल्या मोठ्ठ्या पावसाचे शिंपण झाल्याने पेरण्याही जोर धरु लागल्यात ....
आता दिसताहेत ते आभाळभर तरंगणारे काळे, काळे ढग .... खाली जमिनीवर उमटलेली छानशी, नाजुक हिरवळ आणि जागोजाग जमा झालेली पाण्याची छोटी छोटी तळी....
चैत्रातली तांबूस्-पोपटी पालवी जाऊन चांगली हिरवीगाऽर होऊन झाडं झुलताहेत.... रानात फुललेला पळस्-पांगारा आता शेंगाही धरु लागलाय... गुलमोहोर मात्र अजूनही लालेलालच आहे - बहरलेला... कसं एक नवचैतन्य पसरलंय आसमंतात ....
थेंब थेंब
थेंब थेंब अलवार
घेती मातीत आकार
कणसात उमलोनी
मोती झाले दमदार
थेंब थेंब मेघातला
मातीविण तळमळे
नदी नाल्यात वाहता
जलसंजीवन झाले
थेंब थेंब नाजुकसा
पानांवरी झुलतसे
गंध होऊनी फुलात
वार्यालाही लावी पिसे
थेंब थेंब डोळ्यातला
मन डोही डुचमळे
वारा सोसाट्याचा येता
पापणीच्या कडा आले....
एक थेंब कृपेचा रे...
कृष्णमेघ गगनात
रुप तुझे नयनात
बरसवी अंतरात
तुझ्या कृपेचे अमृत
नांगरुनी रे भुईला
किती शिणलो थकलो
तण विखारी काढता
वारं वार खंतावलो
प्रेमबीज पेरियले
अशा बरड भूमीत
भाव शिंपूनिया ठेवी
रोप थोडे पल्लवीत
मेघ बरसवी आता
झडकरी देवराया
सुकुनिया जाई रोप
आटली का तुझी माया
नाही मागणे अफाट
नसे आस सागराची
तहान ती अति अल्प
एक थेंब चातकाची
एक थेंब कृपेचा रे
मजलागी धाड देवा
परिपूर्ण जीवनाचे
भाग्य लाभे वेड्या जीवा
एक वेडा निशिगंध
तुझ्या मनी फुललेला
एक वेडा निशिगंध
सार्या ऋतूत आगळा
सुवासतो धुंद फुंद
थेंब घेई पाकळ्यात
एक एक साठवून
कण कण ओलाव्याचे
येती मग उमाळून
शिशिराची थंडी त्यास
कधी बाधू ना शकते
नित्यनवी हिरवाई
पानापानात दिसते
ग्रीष्मातही हासतसे
शिर उंच उभवून
करीतसे मंद मंद
सुवासाची पखरण
असा निशिगंध नित्य
जावो बहरत सखी
यावा मनी फुलुनिया
जेव्हा जेव्हा मी निरखी
---------------
पावसाची मिठी
भरदिसा पडे
पावसाची मिठी
नाही रीती भाती
कशी म्हणू प्रिती
तुडवीतो राने
करी चोळामोळा
धावे सैरावैरा
कसा याचा चाळा
थेंब किती भारी
सरीवर सरी
करी शिरजोरी
लगटतो उरी
पावसाची मिठी
ओलावली दिठी
किती दिसा झाली
सजणाची भेटी
उणावे आवेग
पुरेपूर संग
उन्हात हसुनी
निहाळी नि:संग
लाजली धरणी
मुख घे झाकोनी
हासू झळकले
पदरा आडोनी ....
उमलला मोगरा मंद
उमलला मोगरा मंद, कसा बेधुंद
वेली पाचूच्या ....
वैशाखी काहिली दूर, करी कापूर,
शुभ्र ज्योतींचा ....
उष्म्याचा होत आघात, रोज आकांत
उसळला पुरता ....
हा भलताचि स्वच्छंद, परि नि:संग
रात्रीतून फुलता.......
माळिती कुणी या शिरी, धरिती का उरी
तनू शांतवायाला ....
ज्योत्स्नेचा सहचर खुळा, परि कोवळा
भुलवी जगताला ....
ऋतुराजाचा सांगाती, गुंगली मती
कितीदा या वानावे ....
घ्या भरुनि ओंजळीतुनी, गंध भरभरुनि
सुगंधी न्हाऊनी जावे.....
आस नवचैतन्याची ...
घुसमट तगमग शब्दही झाले नको नकोसे
आकाश मोकळे अता निरखू दे जराजरासे
येऊ दे जरा तो झुळझुळणारा रेशीमवारा
श्वासात भरु दे रानसुंगध हा घमघमणारा
शीळ कुणा पक्ष्याची येवो अर्ध जरिही
तुटलेली ही तार जुळावी सहज मनींची
मनपक्षी वेडा विहरत जावो दिगंतरासी
कंठात घेऊनी गाणी नवनवचैतन्याची .....
एक थेंबुटा...
एक थेंबुटा उनाड
आभाळात हरवला
पहाटेला पानांवर
दंवरुप झळकला
एक थेंबुटा निवांत
झर्याकाठी पहुडला
चोच रान-पाखराची
वेडा करीतसे ओला
एक थेंबुटा गगनी
ढगामधेच दडला
दंगा करुनिया फार
धरेवर विसावला
एक थेंबुटा बिचारा
पापण्यात उमटला
हाक घालूनी मेघांना
उगामुगाच आटला
एक थेंबुटा थेंबुटा
धरतीला लेई लेणं
जाई स्वतः हरपून
देई दुसर्याला जिणं
दृष्टी
त्यांची होते कशी वारी
माझी नित्य फिराफिरी
त्यांना होतो तो सोहळा
इथे गोंधळ सावळा
निसर्गचि त्यांना सखा
झालो मी का त्या पारखा
सूरताल त्यांना साथी
मला गोंगाट का होती
काय करावे कर्मासी
जशी दृष्टी तशी सृष्टी ...