उमलला मोगरा मंद

Submitted by पुरंदरे शशांक on 26 May, 2013 - 23:10

उमलला मोगरा मंद

उमलला मोगरा मंद, कसा बेधुंद
वेली पाचूच्या ....
वैशाखी काहिली दूर, करी कापूर,
शुभ्र ज्योतींचा ....

उष्म्याचा होत आघात, रोज आकांत
उसळला पुरता ....
हा भलताचि स्वच्छंद, परि नि:संग
रात्रीतून फुलता.......

माळिती कुणी या शिरी, धरिती का उरी
तनू शांतवायाला ....
ज्योत्स्नेचा सहचर खुळा, परि कोवळा
भुलवी जगताला ....

ऋतुराजाचा सांगाती, गुंगली मती
कितीदा या वानावे ....
घ्या भरुनि ओंजळीतुनी, गंध भरभरुनि
सुगंधी न्हाऊनी जावे.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहाहा!
आताच जिप्सीच्या फोटोंनी भिजले अन तू सुगंधीत केलस !
वा ! क्या बात है | आवडली. एकदम वेगळी शैली Happy

वाह !!
सहजता कुठेही जराशीही ढळली नाहीये भावना अन् शब्दांची लय तर जीवघेणी सुंदरय
अप्रतीम कविताय
सहज सुंदर नितांत सुंदर

धन्यवाद शशांकजी

@अवल : उत्तम प्रतिसाद

फ़ारच छान! Happy
मी चालीतच म्हटली पण ती चाल अजून कुठल्या गाण्याची होती तेच आठवत नाही,. Uhoh
शशांकजी जरा मला सांगा ना. Happy

शोभनाताई -

घडी घडी अरे मनमोहना, हसुनी गुणिजना,
देखता नको रे बोलु मशि ...... >>>> या गाण्यासारखी वाटली का चाल ???

"फटका" म्हणून जो एक काव्यप्रकार सुप्रसिद्ध कवि अनंत फंदी वापरत असत त्याचाच थोडासा वापर करायचा प्रयत्न केलाय इथे -
अनंत फंदींचा सुप्रसिद्ध फटका -
" हटातटाने पटा रंगवुनि जटा धरिशी का शिरी मठाचि उठाठेव का तरि "

सर्व मान्यवर रसिकांचे मनापासून आभार .....