काव्यलेखन

मरणही म्हणाले किती भोगशी तू? सजा भोगण्याचा कडेलोट झाला!

Submitted by कर्दनकाळ on 25 April, 2013 - 15:43

मरणही म्हणाले किती भोगशी तू? सजा भोगण्याचा कडेलोट झाला!
तुला आज मी मुक्त करणार आहे, तुझ्या सोसण्याचा कडेलोट झाला!!

कितीदा अशी राख झालो कळेना,कितीदा फिरोनी उभाच्या उभा मी!
विजांशी कुणी एवढे खेळते का? विजा झेलण्याचा कडेलोट झाला!!

जगाचाच आजन्म संसार केला, न पत्नी, न मुलगा, न मुलगी बघितले!
सडाच्या सडा राहिलो शेवटी मी, सडा राहण्याचा कडेलोट झाला!

जगावेगळा सोस त्याला फुलांचा, घराचा जणू जाहलेला बगीचा!
घरी कोपराही न उरला रहाया, फुले वेचण्याचा कडेलोट झाला!!

दिले सोडुनी दर्पणी पाहणे मी, मलाही न मी ओळखायास येतो!
चरे पाडले केवढे या जगाने, चरे पाडण्याचा कडेलोट झाला!!

शेकडो रुग्ण तपासतांना ..

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 25 April, 2013 - 08:51

शेकडो रुग्ण तपासतांना
रोगांच्या साथीत
वेढलेले असतांना
नातेवाईकांच्या झुंडी
अंगावर झेलतांना
गुंड पुंडांना तोंड देतांना
एकच असते भिस्त
एकच असतो आधार
एक तारखेपर्यंत
बेंकेत पडेल पगार .

तसे काम छान आहे
मित्र मंडळीत मान आहे
घातल्यावर अॅप्रन वाटे
देवाचेच वरदान आहे .

पण जेव्हा पडते कानावर
न केलेल्या चुकीमुळे
मृत्यूच्या खेळामुळे
सस्पेन्शन आले मित्रावर
काळे फासले गेले तोंडावर
अॅप्रनमधील हवा निघून जाते
तोफेच्या तोंडी आहोत
असेच अन वाटू लागते
घरी जाणारा प्रत्येक पेशंट
घरी गेल्यावर ..
मरेन असे वाटू लागते
आपल्या ड्युटीत जर
काही असेच झाले तर

होत्याचा नव्हता झालो

Submitted by बेफ़िकीर on 25 April, 2013 - 06:49

फिरलेत मनाचे वासे... होत्याचा नव्हता झालो
मी केले प्रेम जरासे... होत्याचा नव्हता झालो

जे माझे होते त्यांनी... तेथे पोचवले जेथे
नव्हत्यांनी दिले दिलासे... होत्याचा नव्हता झालो

गेलीस विसरुनी पुरती... तू देवघेव श्वासांची
मी विरलो देत उसासे... होत्याचा नव्हता झालो

होतो तेथे का नव्हतो... नव्हतो तेथे का होतो
देऊन स्वतःस खुलासे... होत्याचा नव्हता झालो

नव्हत्याचे होता यावे... हे दान पाहिजे होते
पण पडले उलटे फासे... होत्याचा नव्हता झालो

क्षण अन् क्षण मोजत मोजत... काही दशकांनी मेलो
मी इतक्या महत्प्रयासे... होत्याचा नव्हता झालो

मी रडतो कारण की मी... नव्हतो तो झालो आहे

" एक कविता माझी "

Submitted by अनुराधा म्हापणकर on 25 April, 2013 - 06:20

एक कविता माझी
माझ्या आकाशी उडणारी

एक कविता माझी
तुला मला जोडणारी

एक कविता माझी
तुझ्याशी मला तोडणारी

एक कविता माझी
माझी मलाच भिडणारी

एक कविता माझी
माझ्यावर उगाच चिडणारी

एक कविता माझी
किरकिरी, उगाच रडणारी

एक कविता माझी
वहीच्या पानावर फडफडणारी

एक कविता माझी
इवल्याशा चिटो-यावर तडफडणारी

कविता कविता कविता.. !
प्रत्येक कपट्यात मला सापडणारी

मीच होते, माझ्या कवितांना
वाहत्या पाण्यात नेऊन सोडणारी

शब्दखुणा: 

पुन्हा हात हाती धरू एकदा...

Submitted by हर्षल_चव्हाण on 25 April, 2013 - 06:16

पुन्हा हात हाती धरू एकदा,
'कुणी' जिंकण्यासी, हरू एकदा...

जरी वय न झाले, मनाचे तरी,
कसे छेडले तू, स्मरू एकदा...

तुझा उंबरा लांघला रे सख्या;
पुन्हा माप ते चल भरू एकदा...

कधी सोडला हात धुंदीमधे,
जरा दु:ख त्याचे करू एकदा...

जगत राहिलो एकमेकांमुळे,
अता त्याचसाठी मरू एकदा...
==================
हर्षल (२५/४/२०१३ - दु. २.००)

ब्लॉगवर पूर्वप्रकाशीत

शब्दखुणा: 

॥ खळीकंस ॥

Submitted by विनायक उजळंबे on 25 April, 2013 - 04:59

तुझ्या प्राक्तनाच्या व्यथा मम ललाटी, जखम लाल त्याची तुझ्या गौर भाळी
व्यथांचेच सारे महाभारताहे! कवी का फुकाचा कुणी व्यास होतो ?

जरी वेदनेच्या पखाली वहातो ..तुझ्या आठवांच्या महाली रहातो ,
कशाला कुणाचा मला लोभ व्हावा ,मनातून जेव्हा तुझा वास होतो .॥

तुझ्या स्पर्शमात्रे गुलाबास काटा , खुळी रातराणी तुझा गंध मागे ,
खळीकंस होण्या तुझे केस येता ,अचानक जणू चंद्र खग्रास होतो ॥

फुलोनी पहाटेस प्राजक्त येता ,मला जास्त होते धरेचेच देणे ,
पसरता सडा केशरी जाणिवांचा ,व्यथांना धरेचा सहवास होतो . .

सुगंधी कळ्यांना तुझे वेड लागे ,जुन्या काष्ठवृक्षा नवी पालवी ये ..

शब्दखुणा: 

नाटकी बोलतात साले!

Submitted by अभय आर्वीकर on 25 April, 2013 - 02:05

नाटकी बोलतात साले!

कोणीतरी यांची आता, पडजीभ उपटली पाहिजे
नाटकी बोलतात साले, की गरिबी हटली पाहिजे

भुकेचा प्रश्न सुटणारा नाही, तुझ्या भाषणाने, पण;
तू वाचाळ नाहीस अशी, खात्री तर पटली पाहिजे!

राजसत्ताच कोपली बघ, तुझ्या श्रमाच्या कमाईवर
तुझी शक्ती मनगटात तू, पूर्ण एकवटली पाहिजे

रावणांच्या राज्यात पुन्हा, सीता एकाकी पडलीय
भूमीच्या मुक्तीसाठी, तुझी काया झटली पाहिजे

देच तुतारी फुंकून तू, इथेच, याच स्थळी, अशी की;
क्रिया येथे आणि प्रतिक्रिया, दिल्लीत उमटली पाहिजे

मामला तीन पद भूमीचा, तुझ्या सिंगावर घेच तू
त्या बटू वामनाची सत्ता, "अभय" पालटली पाहिजे

Just for Sale...फक्त विकण्यासाठी ….

Submitted by स्वप्ननिल on 25 April, 2013 - 01:13

जगाचा लागलाय "सेल" ,साला करूया सगळ बाय,
तुम्ही भाजी कसली विकताय राव ,त्याने विकायला काढलीय माय.

तो भैय्या विकायचा पण अन तो मद्रशाचा डोसा,
या मल्टी -नेशनल मॉल मध्ये चायनीज कृमि नवर पोट पोसा ,
पाश्यराईजड दुधावरती कधी निघत नसते साय ……
तुम्ही भाजी कसली विकताय राव ,त्याने विकायला काढलीय माय.

पिझ्झा -बर्गर सोबत विकत केलेस्टोल चे दुखणे ,
सारखं छातीत दुखतंय ना ? "Fat Free" मग वर जगणे

विका आणि विकत घ्या ,मंत्र ग्लोबल जगण्याचा ,
सत्व सारी सोडून टाईम दुकान मांडण्याचा,

विकून सारं संपल कि विकल जाईल स्वतःला
"Exchange" मध्ये देवून आत्मा ,समाधान मिळेल हाताला ?

"बाई गेली"

Submitted by अमेय२८०८०७ on 24 April, 2013 - 14:21

बाई गावापुढं गेली,
बांबू-काठीची कमान.
खाल्ला नाही धड घास,
चूल रांधताना जिनं,
तिच्या तोंडामधे सोनं.

बाई अहेवपणीची,
लाल माखलेली टाळू.
अंगी नेसलं जुनेरं,
जिणं जगताना जिनं,
तिला मरताना शालू.

बाई लाकडावरती,
तूप-तेल ओघळलं.
एका गजर्‍याची नाही,
आस माळलेली जिनं,
तिच्या अंगभर फुलं.

बाई चंदनाची हवा,
जाळ भणाणून फार.
माप ओलांडलं नाही,
दारावेशीतलं जिनं,
पापापुण्याच्या ती पार.

पहाट

Submitted by Sushant Chougule on 24 April, 2013 - 12:38

अलगद अलगद, हलकेच नाजूक,
नवकुसुमांची घेऊन सोबत,
ओढली धरेने, सोनेरी किरणांची झालर!

जरी होता त्रिमितीत काळोख,
स्पर्शता रविकिरणांनी पूर्व क्षितीज,
गुंजले पक्षांचे कुजन,
दुभंगलेल्या आसमंतात!

मावळत्या चांदण्यांना देता निरोप,
कुणाचे बरे ओघळले अश्रूंचे चार थेंब,
विसावले ते दवबिंदू होऊन,
हिरव्या गर्द गवती पात्यांवर!

जरी आहे ठाऊक,
मावळणार हा दिनकर,
रोजचाच आहे उगवत्या मावळत्या सावल्यांचा खेळ,
सृष्टीचा तर एकच नियम,
नवचैतन्याला करणे सलाम!
नवचैतन्याला करणे सलाम!

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन