"बाई गेली"

Submitted by अमेय२८०८०७ on 24 April, 2013 - 14:21

बाई गावापुढं गेली,
बांबू-काठीची कमान.
खाल्ला नाही धड घास,
चूल रांधताना जिनं,
तिच्या तोंडामधे सोनं.

बाई अहेवपणीची,
लाल माखलेली टाळू.
अंगी नेसलं जुनेरं,
जिणं जगताना जिनं,
तिला मरताना शालू.

बाई लाकडावरती,
तूप-तेल ओघळलं.
एका गजर्‍याची नाही,
आस माळलेली जिनं,
तिच्या अंगभर फुलं.

बाई चंदनाची हवा,
जाळ भणाणून फार.
माप ओलांडलं नाही,
दारावेशीतलं जिनं,
पापापुण्याच्या ती पार.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्त्रीच्या आयुष्यातील विसंगतीनं भरलेलं वास्तव अधोरेखित करणारी कविता. थेट पोहोचली.>>>> 1111

अमेय
कालपासून पुन्हा पुन्हा वाचली.

अंगी नेसलं जुनेरं,
जिणं जगताना जिनं,
तिला मरताना शालू.

या अशा ओळींनी सुन्न झालो.

छान आशय, सहज शब्द, प्रभावी कविता.
ग्रामीण विभागातील, दारिद्र्याने आणि रूढींनी गांजलेल्या स्त्रीच्या जीवनातील विसंगती छानच मांडलेय.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
"जियत बाप से दंगम दंगा
मरे हाड पहुँचाए गंगा"
अशी काहीतरी हिन्दी म्हण पूर्वी ऐकली होती. त्याची आठवण झाली.

सुंदर!!!!

बाई गावापुढं गेली,
बांबू-काठीची कमान.
खाल्ला नाही धड घास,
चूल रांधताना जिनं,
तिच्या तोंडामधे सोनं.

बाईची सत्य परिस्थिती.. बाइचि तिरडि सजली, जिन आयुश्यभर जेवन बनवल, पन कधी पुर्ण जेवन मिळाल नाहि. बर्‍याच वेळा ति अर्ध पोटि झोपलि असेल बिचारी पन आयुष्यच्या शेवटि तिरडिवर झोपल्यावर तिच्या तोंडात सोन ठेवलय..

बाई अहेवपणीची,
लाल माखलेली टाळू.
अंगी नेसलं जुनेरं,
जिणं जगताना जिनं,
तिला मरताना शालू.

आयुश्यभर तिन अवहेलना सोसल्या.. पन तिरडिवरचा तीचा टाळु कुंकवाने लाल भरलाय.. ति मरताना पन सौभाग्यवति होति. जिन आयुष्यभर जुन नेसल पन तिला तिरडिवर आता शालु लाभला आहे.

बाई लाकडावरती,
ओघळलं तूप-तेल.
एका गजऱ्याची नाही,
आस माळलेली जिनं,
तिच्या अंगभर फुलं.

तिला तिरडिच्या लाकडांवर ठेवलय, तिरडिवर तुप तेल टाकल जातय जिन आयुष्यभर एका गजर्‍याचि आशा नाहि केलि पन आता तिच्या अंगभर फुल पसरलि आहेत.

बाई चंदनाची हवा,
जाळ भणाणून फार.
माप ओलांडलं नाही,
दारावेशीतलं जिनं,
पाप-पुण्याच्या ती पार.

जाळ दिलेला आहे, चंदनाचि लाकड पन आहेत जिन अयुष्यात दारातल माप ओंलाडला नाहि घरात येताना ति आता पाप पुन्याच्या पार पलिकडे निघुन गेलि आहे..

सुंदर..

(चु.भु.द्या. काहि चुकल असल्यास माफी असावि)

Ameya,

NO WORDS MAN ! ! ! ! ABSOLUTELY NO WORDS TO COMMENT ON THIS EXTRAORDINARY CREATION OF YOURS,

THANKS A TONS BUDY ! ! ! ! SAVED THIS CREATION IN MY PERSONAL COLLECTION............

Pages