मरणही म्हणाले किती भोगशी तू? सजा भोगण्याचा कडेलोट झाला!

Submitted by कर्दनकाळ on 25 April, 2013 - 15:43

मरणही म्हणाले किती भोगशी तू? सजा भोगण्याचा कडेलोट झाला!
तुला आज मी मुक्त करणार आहे, तुझ्या सोसण्याचा कडेलोट झाला!!

कितीदा अशी राख झालो कळेना,कितीदा फिरोनी उभाच्या उभा मी!
विजांशी कुणी एवढे खेळते का? विजा झेलण्याचा कडेलोट झाला!!

जगाचाच आजन्म संसार केला, न पत्नी, न मुलगा, न मुलगी बघितले!
सडाच्या सडा राहिलो शेवटी मी, सडा राहण्याचा कडेलोट झाला!

जगावेगळा सोस त्याला फुलांचा, घराचा जणू जाहलेला बगीचा!
घरी कोपराही न उरला रहाया, फुले वेचण्याचा कडेलोट झाला!!

दिले सोडुनी दर्पणी पाहणे मी, मलाही न मी ओळखायास येतो!
चरे पाडले केवढे या जगाने, चरे पाडण्याचा कडेलोट झाला!!

तुझे हासणे, लाजणे जीवघेणे! तुझे पाहणेही नशा आणणारे!
खळ्या हास-या पाहुनी वाटते की, तुझ्या हासण्याचा कडेलोट झाला!!

न हे पायही राहिले सोबतीला, तरी चालतो वाट अद्यापही मी.....
कधी गाव येणार माहीत नाही, पहा चालण्याचा कडेलोट झाला!

अहोरात्र गझलेत तू डुंबलेला! अहोरात्र गझलेत तू धुंदलेला!
न खाण्यापिण्याची तुला शुद्ध वेड्या, तुझ्या झिंगण्याचा कडेलोट झाला!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा ! कडेलोट हा रदीफ घेऊन कमाळ केलीत. छान आहे गझल.
देवमोहर - गझल विभागात क्लिक केलं तेव्हां दिसली गझल.

या गझलेत कडेलोट हा शब्द अतिरेक होणे, परिसिमा गाठणे अशा अर्थाने वापरला गेला आहे असे वाटते.

माझ्या माहितीप्रमाणे कडेलोटचा मुळ अर्थ तसा नाहीये.

असो. Happy

<<जगावेगळा सोस त्याला फुलांचा, घराचा जणू जाहलेला बगीचा!
घरी कोपराही न उरला रहाया, फुले वेचण्याचा कडेलोट झाला!!>>

दुआ बहार की माँगी तो इतने फूल खिले
कहीं जगह न रही मेरे आशियाने को.....कँवर जलालवी

<<<कडेलोट झाला हा वाक्प्रचार वापरला आहे! शब्दांना ध्वन्यार्थही असतात मुटे गुरुजी! >>>
एखादा वाक्प्रचार सांगाल काय? म्हणजे मला समजून घेता येईल. Happy

कडेलोट झाला म्हणजे हद्द झाली,शिकस्त झाली, शर्थ झाली, टोक गाठले, परिसीमा झाली, कळस झाला, शिखर गाठले, सीमा गाठली, लक्ष्मणरेषा ओलांडली , कहर झाला, इत्यादी अर्थांच्या छटा इथे कडेलोट झाला या रदीफात आहेत!

कडेलोटाची शिक्षा शिवाजी महाराजांच्या काळात अतीगंभीर गुन्ह्यांसाठी दिली जायची! शिवनेरीवर कडेलोट
point आहे, जिथून गंभीर गुन्हे करणा-या अपराध्याला ढकलून दिले जायचे म्हणजेच कडेलोटाची शिक्षा दिली जायची! हा झाला कडेलोट याचा शाब्दिक अर्थ!
बोलताना कडेलोट झाला असा वाक्प्रचार रूढ झाला, ज्याचे अर्थ वर दिल्याप्रमाणे!

टीप:आमचा जन्म शिवनेरीच्या पायथ्याशी, जुन्नरमधे ११-०९-१९५४ रोजी झाला! शिवनेरीवरवर लहानपणापासून आम्ही बागडत आलो आहोत! आमचे आजोळ जुन्नरचेच!(मोडक...आजोबांचे आडनाव)
*************इति कर्दनकाळ

मी प्रचलित एखादा वाक्प्रचार मागीतला. बदल्यात तुम्ही अर्थाच्या छटा सांगताय राव. ज्यातून मला काहीच समजून घेता येत नाहीये. Happy

वरील अर्थांच्या छटा ज्या शब्दांत अभिव्यक्त केल्या आहेत ते बोलीभाषेतील रूढ/प्रचलीत वाक्प्रचारच आहेत!

सतीशजी:
मोल्सवर्थ मध्ये पुढील अर्थ दिले आहेतः

कडेलोट [ kaḍēlōṭa ] m f (कडा & लोटणें) Precipitation from a precipice (of a criminal, or of one's self in propitiation of a god &c.) 2 fig. A rapid and great degradation. 3 Treating with extreme disdain or contempt: also turning out (of an office or a post). 4 Pursuing some extreme effort or measure. 5 Superlative quantity or the intensest quality (of rain, crops, riches, or of any action).

कडेलोट [ kaḍēlōṭa ] a (See the noun.) Of the very lowest grade, significance, or estimation--a person, matter, thing.

कदाचित मुटेंचा प्रश्न असावा की कडेलोट करणे हा वाक्यप्रचार लिखित स्वरूपात कुठे आहे का?
शब्दकोश, पुस्तक, वा कविता असा एखादा संदर्भ दिलात तर बरे होईल.

धन्यवाद.

कितीदा अशी राख
झालो कळेना,कितीदा फिरोनी उभाच्या उभा मी!
विजांशी कुणी एवढे खेळते का?
विजा झेलण्याचा कडेलोट झाला!!

हा आवडला.

कडेलोट....कड+लोटणे ............कड म्हणजे काठ, शेवट....लोटणे म्हणजे ढकलून देणे
कड्यावरून घेतलेली उडी, कड्यावरून लोटून देण्याची शिक्षा, परमावधी, अतिरेक, कमाल होणे,
लाक्षणीक अर्थ: अध:पात, अतिशय तुच्छतेने वागवणे, शेवट करणे,
खालच्या प्रतीचा मनुष्य, वस्तू

संदर्भ: अभिनव मराठी-मराठी शब्दकोश, खंड २रा पान क्रमांक १४ शेवटून दुसरा शब्द
.............द.ह.अग्निहोत्री

धन्यवाद!
रदीफाची फरपट थांबवून आशय अभिव्यक्त करणारे शेर द्यावेत! स्वागतच आहे!
पाहू या बिनफरपटलेल्या रदीफांचे शेर असतात तरी कसे ते!

अहो प्राध्यापक साहेब, ही रदीफ जर त्या आशयाला फिट बसतच नाही आहे तर तिची फरफट कशी काय थांबवता येईल?

आता बघा:

>>>तुझे हासणे, लाजणे जीवघेणे! तुझे पाहणेही नशा आणणारे!
खळ्या हास-या पाहुनी वाटते की, तुझ्या हासण्याचा कडेलोट झाला!!<<<

आता तुम्हीच दिलेले अर्थ लावून पाहू.

हासण्याचा कडेलोट झाला =

हासण्याचा अतिरेक झाला - शेराशी सुसंगत अर्थ नाही
हासण्याची परमावधी झाली - शेराशी सुसंगत अर्थ नाही
हासण्याची कमाल झाली - शेराशी सुसंगत अर्थ नाही

लाक्षणिक अर्थः

अधःपात झाला - विसंगत
तुच्छतेने वागवले - विसंगत
शेवट केला - विसंगत
खालच्या प्रतीचा मनुष्य झाला - विसंगत

हे सर्व अर्थ तुमच्या (अग्निहोत्रीवाल्या) ११.५८ च्या प्रतिसादातून घेतलेले आहेत.

आता १०.४९ च्या प्रतिसादात तुम्ही हे अर्थ दिलेले आहेतः

>>>कडेलोट झाला म्हणजे हद्द झाली,शिकस्त झाली, शर्थ झाली, टोक गाठले, परिसीमा झाली, कळस झाला, शिखर गाठले, सीमा गाठली, लक्ष्मणरेषा ओलांडली , कहर झाला, इत्यादी अर्थांच्या छटा इथे कडेलोट झाला या रदीफात आहेत!<<<

यातलाही कोणताच अर्थ 'हासण्याचा कडेलोट झाला' मध्ये फिट्ट बसत नाही.

आता जर तुम्ही म्हणालात की हीच रदीफ याच जमीनीत फिट्ट बसवून दाखवा तर कसे काय करणार? मुळात ती रदीफ बसतच नाही ना अर्थानुरुप? एखाद्या नवयुवतीची वस्त्रे एखाद्या पांडबाला घालून दाखवा म्हणण्यात काय तथ्य आहे?

सहसा `हद्द झली' अथवा कहर झाला असा शब्दप्रयोग केला जातो. जरी एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाल्यावर त्याला कडेलोट होणे असा शब्दप्रयोग असेल ( मी तरी ऐकलेला नाही) तरीही

सडा राहण्याचा कडेलोट झाला, फुले वेचण्याचा कडेलोट झाला, चरे पाडण्याचा कडेलोट झाला, हासण्याचा कडेलोट झाला

अशा काही ठिकाणी प्रकर्षानी जाणवतय की हा शब्दप्रयोग सूट होत नाहीये.

असो अवांतर - पहिल्या ओळीच्या शेवटी ! आणि दुसर्‍या ओळीच्या शेवटी !! हे नक्की कधी वापरतात ?

सतीशजी,
तुम्ही ज्या अर्थाने कडेलोट झाला ही रदीफ वापरली आहे,
त्या अर्थाशी मी बर्याच अंशी सहमत आहे.

परंतु, काही वेळा आशयाची पुनरुक्ती होत आहे की काय असे जाणवले.
(कदाचित त्या विशिष्ट रदीफेच्या प्रभावानेही असे जाणवत असेल.)
एखाद्याच शेरात ’कडेलोट झाला’ असे शब्द आले असते तर ते
खूप उठावदार झाले असते, कदाचित भाव खाऊन गेले असते
असे एक रसिक म्हणून मला वाटते.

असो ..... इतक्या वेळा ‘कडेलोट’ वाचताना माझी अवस्था अशी काहीशी झाली

कडे तोकडे नी कडे वाकडे, या कड्यांच्या सभोती कड्यांचे कडे हे
इथेही कडे, त्या तिथेही कडे…. हे कडे लंघण्याचा कडेलोट झाला

कड्यांच्या कडेने कसा मार्ग काढू ? कडे ना, जणू काकडे पेटलेले
कडाडून सारे कडे बोलती की, इथे या भिड्याचा कडेलोट झाला

धन्यवाद उल्हासजी,
प्रांजळ प्रतिसादाबद्दल धन्यवाद व आपण दिलेल्या अनुप्रासादात्मक व शब्दचमत्कृतीयुक्त ओळी छान आहेत!
पण एका गोष्टीचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो आणि ती म्हणजे गझलेतील प्रत्येक शेर ही स्वतंत्र, स्वयंपूर्ण कविता असते! दुसरी गोष‌्ट म्हणजे रदीफाचा शब्द प्रत्येक शेरातील सानी मिस-यात यावाच लागतो!
आता रदीफाचेच शब्द जर कडेलोट झाला असे असतील तर ते प्रत्येक शेरात येणे हे अपरिहार्य आहे!
आता हाच रदीफ का वापरला? आशयाला तो रदीफ योग्य नव्हे असे म्हटले तर बोलणेच संपले, की, हो!
अमुक एकच रदीफ घ्यायला हवा असा काही नियम नसतो! निवडलेला रदीफ सर्व शेरांत निभावता आला पाहिजे हे निश्चित, जे आमच्या वरील शेरात साधले आहे!

कोणताही एक शेर घ्या व नुसताच तो एक शेर कोणासही ऐकवा, उत्तर आपोआप मिळेल!

तेव्हा कडेलोट एखाद्याच शेरात व्हायला हवा होता हे म्हणणे आम्हास गझलेच्या व्याकरणाच्या दृष्टीने प्रशस्त वाटत नाही! रदीफाची फरपट वा शेपटासारखा अनाहूत वाटणारा रदीफ या गोष्टी फार वेगळ्या आहेत! वरील आमच्या गझलेतील कोणत्याही शेरात रदीफाची अशी दैना झालेली नाही!
कोणतीही रदीफशरणता कोठेही दिसत नाही!

टीप: गीताच्या अंगाने गझलेकडे पाहू नये! दोन्ही काव्यप्रकार फारच भिन्न आहेत!

कोणताही एक शेर घ्या व नुसताच तो एक शेर कोणासही ऐकवा, उत्तर आपोआप मिळेल!<<<

हे 'कोणासही' म्हणजे कोण अभिप्रेत असते आपल्याला? आता जाणकार रसिक, दर्दी गझलकार वगैरे न म्हणता व्यक्तीचे नांव द्यावेत अशी विनंती!

काही वेळा आशयाची पुनरुक्ती होत आहे की काय असे जाणवले.<<<<<<<<<<<

कोणकोणत्या शेरांत आपणास आशयाची पुनरावृत्ती आढळली?

तुम्हाला कडेलोट झाल्याची पुनरावृत्ती झाली असे म्हणायचे आहे काय?

आमच्या माहितीप्रमाणे प्रत्येक शेरातील गद्य अर्थ हा भिन्न आहे!

हे 'कोणासही' म्हणजे कोण अभिप्रेत असते आपल्याला?

सहृदयी कोणताही रसिक/ गझलकार/गीतकार/कवी, कुणीही!

आपण सहृदयी सदरात बसतो का हे ज्याचे त्याने पहावे!
कुणावरही कोणतेही लेबल डकविण्याइतके कर्दनकाळ अद्याप तरी महान नाहीत!
कर्दनकाळांना व्यक्तीपूजा मान्य नाही! ते कलाकृतीकडे पाहतात, कलाकाराकडे नाही!
कलाकार कोण हे गौण असते, कलाकृती महत्वाची असते, कारण कलाकाराच्या पश्चातही कलाकृती जिवंत राहू शकते जर तिच्यात दम/जान/चैतन्य/अलौकिकत्व असेल तर!

Pages