कविता
वर्षासूक्त२
सरसर टपटप वर्षती धारा
गार गार अभिषेक न्यारा
त्यातच द्वाड घुमतो वारा
शिरशिरी भरी सर्व शरीरा
मनास घाबरवी अंधार सारा
देहास धडकवी नभीचा नगारा
सख्या जवळ घे या वल्लरीला
कळे तूच आधार या घडीला
विरुन गेले अर्धांगी तुझ्या मी
होऊ दे कितीही गडगडाट व्योमी
तुळस मंजिरी..
विठो तुझ्या राऊळा
फुले चैतन्याचा मळा
असा आनंद सोहळा..
विरो ऐहिकाच्या कळा..
फिटे मी तू पण सारे
वाहे आत्मानंदी वारे
खुली इश्वराची दारे
आनंदाला पार नाही..
दिठी अभंगात दंग
घडो सज्जनांचा संग
उभे आनंद तरंग
जन्म जन्माच्या प्रवाही..
माझा मीच निराकार
नामाचा या साहुकार
ब्रम्हचैतन्य साकार
विठो विठो विठो पायी..
डोळा दाटली पंढरी
देह नाम्याची पायरी
मन झाले वृंदावन
आत्मा तुळस मजिंरी...
तू काही येत नाही
रात्रीच्या अंधारात
जेव्हा मी तुझी वाट बघतो
चांदणंही झोपी जातं, पण तू काही येत नाही.
कधी कधी
चंद्र हळूच विचारतो
अजून किती वाट बघणार?
तोही क्षितिजापार निघून जातो, पण तू काही येत नाही.
बेभान हा वारा,
घोंगावत रुंजी घालतो
थोडासा थबकून कानोसा घेतो,
तोही आसरा शोधतो, पण तू काही येत नाही.
झाडाची पालवी
पडता पडता विचारपूस करते
पानगळ संपली,
वृक्षाला नवी पालवी फुटली, पण तू काही येत नाही
संपणारे श्वास माझे
संपता संपता हृदयात तुझा शोध घेतात
आता श्वासही संपत आले
आणि हृदयही शांततय, पण तू काही येत नाही
तू येत नाही,
पण तुझ्या आठवणी साथ सोडत नाहीत
आता स्मरणशक्तीही दगा देते
भरकटलेल्या मनाचा शोध सुरू आहे..........
'तुझ्या कुशीतून समुद्र बघायला फार आवडतं'
असं म्हणायची ती
'माझ्या डोळ्यांतला समुद्र झाकता येत नाही आताशा'
म्हणून रडायची ती..
मी समजवायचो तिला
त्याच बुरसटलेल्या कवीकल्पनांनी..
की, तू आणि मी म्हणजे समुद्र आणि किनारा
नेहमीच वेगळे आणि तरी
एकमेकांना एकमेकांचाच सहारा!
तू आणि मी म्हणजे जमीन आणि आकाश
क्षितिजापाशी एकत्र आल्याचा
नुसताच एक आभास..
ती लगेच हसायची
अन समजून घ्यायची
त्या बुरसटलेल्या कवीकल्पनांच्या मागचा
माझा नाईलाज..
आणि मनात घोंघावणाऱ्या वादळाचा
शीळ घातल्यासारखा आवाज...
हे असं नेहमीचंच..
तिने रडायचं
मी समजवायचं
तिने हसायचं
आणि मीही स्वत:ला फसवून
खूष व्हायचं
गुरुजनहो सलाम
नमन तुला हे श्रीगणेशा
गण नायक तू विघ्नहर्ता तू
नमन तुला हे सरस्वती
विद्या वेद शास्त्राची देवता तू
नमन तुला हे ब्रम्हदेवा
प्रथम सृष्टीचा कर्ता तू
नमन तुला हे श्रीविष्णुदेवा
शरणागतांची मनोकामना पुरवी तू
नमन तुला हे श्रीमहेशा
मस्तकी गंगा कंठी सर्प धारिसी तू
नमन ज्ञात अज्ञात ऋषी मूनींना
नमन तुम्हा समस्त संतांना
नमन करी मी माता पित्याना
संस्कार अन् शिकवण करी मजवरी
नमन माझे सर्व गुरुजनांना
मार्गदर्शन अन् ज्ञान तुम्ही दिले
भजावे अन् स्मरावे समस्त गुरुजनांना
आज ह्या गुरू पौर्णिमेला
"सूनबाई"
"सूनबाई"
वहिनी-वहिनी, नणंद दिरांचा लळा,
हिरव्या पैठणीवर सजल्या सुंदर मोत्यांच्या माळा,
पाय कोवळा घरात पडला,आणि "सूनबाई" शब्द मनी दडला,
लाजू,हसू,रुसू कि बसू !
गोंधळ काही थांबेना,
झरकन वळली मान,
जेव्हा "पोरी" आवाज कानी पडला,
"सासूबाई" शब्द ओठातून माझ्या फुटला.
कधी मिठाई चा गोडवा,तर कधी मिरचीचा ठसका,
कधी मायेचा ओलावा ,तर कधी परके पानाचा धसका.
आनंदाच्या सरीत कधी भिजून चिंब,
तर कधी रागाने अगडबंब.
आनंदाने घराण्याचा मान मात्र मी मिरवला,
अवखळपणा माझा तेव्हाच कोठेतरी हरवला.
मोगऱ्याचा सुगंद आणि चिंचेचा आंबट पणा, मी इथेच अनुभवला.
कोवळा पाय माझा नकळत घट्ट रोवला गेला.
जुनी गोष्ट...
चिमणे चिमणे दार उघड, म्हणत कावळा थांबत होता
बाळाला तीट लावत लावत.. चिमणीचा वेळ जात होता
शेणा-मेणाच्या त्यांच्या घरात पाऊस दंगा करत होता
बाळ मजेत आईच्या कुशीत, रंगीत स्वप्नात शिरत होता !
...पावसाची वाट पहात पहात, चिमणी खूपच थकली आहे
दाराबाहेरच्या कावळ्याने, मान बाजूला टाकली आहे
जुनी गोष्ट..नव्या पिढीतली आई बाळाला सांगत आहे
बाबाचा जीव सिमेंटच्या घरांत वरखाली टांगत आहे !
'तव जुना छंद हा घटनांनी नटण्याचा'..
'तव जुना छंद हा घटनांनी नटण्याचा'..
क्रांती साडेकर यांनी आज ( २२-०३-२०१३) 'मराठी कविता समूह' मध्ये लिहिलेल्या अप्रतिम रसग्रहणासह ही कविता येथे पुनःप्रकाशित करत आहे.. आभार क्रांती, अशा रचनांना न्याय देणे कवितेवर निस्सीम प्रेम करण्यातूनच साध्य होऊ शकते..
सरकली मनातून पुनः कुणाची छाया
सरकली मनातून पुनः कुणाची छाया
सळसळल्या आशा मीच रुजवलेल्या या
मी द्विधा तरीही भग्न मंदिराजवळी
तनुची तमशिल्पित दीपमाळ पाजळली
खसफसे गवत वार्यात उडे पाचोळा
फिरफिरून प्राण पापणीत होती गोळा
..तो दूर निनादे सूर कुण्या पथिकाचा,
-'तव जुना छंद हा घटनांनी नटण्याचा..
डावा--उजवा
डावा--उजवा
जन्माने हो आम्ही सहोदर
तो कर उजवा , मी डावा
का म्हणता तो मजहून उजवा
त्याच्यापुढती मी डावा ?
आज गती थबके उजव्याची
नशीब रुसे का तयावरी ?
स्थित्यंतर हे साहू न शकतो
करू न शके जरी बरोबरी!
करू नको तू चिंता उजव्या
असे तुझ्या मी साथीला,
तोल तुझा वाटे जरी ढळला
समर्थ मी सावरण्याला.
कार्य करुनी शिणलासी बंधो ,
घेई विसावा तू पळभरी
नकोस वाहू चिंता काही,
घेईन मी ती खांद्यावरी!
आजवरी जी कामे केली
दो बाजूनी धरून करी,
पहा कसा मी करीन एकला
साहस मनी तू फक्त धरी!
पावलावरी ठेवून पाउल
आजवरी तुज अनुसरलो,
आता भूमिका बदलून घेऊ
नेईन मी तुज बरोबरी!
Pages
