कविता

रातराणी

Submitted by रमा-रातराणी on 3 July, 2012 - 04:04

एक होती रातराणी,

सांगे गुलमोहर कहाणी,

आठवणीने तिच्याच आले

डोळ्या त्याच्या पाणी..

उठे जीवघेणी कळ

जेव्हा सुटे दरवळ,

कसे आठवते सार

जरी लोटला हा काळ..

एक धुंद होती रात

पान-फुलं होतं गात,

हरखला गुलमोहर

जणू टाकूनिया कात..

सारा उत्कट तो संग

त्याचा खुललेला रंग,

तिला वास्तवाचे भान

अन तो स्वप्नामध्ये दंग..

त्याची नुरली ना ओढ

पण मनी राही तेढ,

उभी एकाकी रातराणी

मंद हसतसे गुढ...

गुलमोहर: 

तिचेच गाणे स्वरात आहे

Submitted by निशिकांत on 3 July, 2012 - 02:13

गुदमर बनले जीवन सारे
घरात नाही मनात आहे
जिला विसरणे जमले नाही
तिचेच गाणे स्वरात आहे

बंद कपारी केल्या पण हे
आठव कोठुन मनात येती ?
बीज कोणते जरी पेरले
आठवणींची उगवे शेती
नसे सावली हिरवळ कोठे
उभा एकटा उन्हात आहे
जिला विसरणे जमले नाही
तिचेच गाणे स्वरात आहे

आरशातला मुखडा माझा
तू गेल्यावर हसला नाही
रानोमाळी खूप भटकलो
कुठेच श्रावण दिसला नाही
बारा महिने ग्रिष्मझळांची
तगमग माझ्या उरात आहे
जिला विसरणे जमले नाही
तिचेच गाणे स्वरात आहे

दिव्यासवे का अंधाराचे
नाते जुळले? मला कळेना
आयुष्याची वात अशी की
तेल घातले तरी जळेना
गवसत नाही मीच मला का?
प्रश्न सारखा मनात आहे

गुलमोहर: 

*गुरूपुजा*

Submitted by विभाग्रज on 2 July, 2012 - 21:48

_/\_!*गुरूपुजा*!_/\_

माझी गुरूपुजा,भजन किर्तण
माझी गुरूपुजा,भजन किर्तण

शब्द होती गंध
सुर होती सुमणे
लय,ताल,गीत होई.......
..................पुजासामुग्री*

चक्षू दोन समई
भावभक्ती तेलवात
तेवती निरंतर.........
...................गुरूचरणी*

धक-धक र्‍हुदयाची
टाळ-चिपळ्या वाजती
पंचेंद्रिय तल्लीन होती......
.................जणू वाद्यवृंद*

चंदनाचा पाट नको
कुबेराचाथाट नको
गुरू रंगे थेट.........
..............भजनी किर्तणी*

गुलमोहर: 

कशासाठी कुणी ही भांडू नका रे

Submitted by सुधाकर.. on 2 July, 2012 - 13:51

कशासाठी कुणी ही भांडू नका रे
उगाच हा खेळ असा मांडू नका रे.

सुंदर हे जग आहे, नासू नका रे
माणसात दैत्यासम भासू नका रे.

कुणास ही कुणी शिव्या मोजू नका रे
दगडाला देव म्हणुन भजू नका रे

मर्यादेच्या पलीकडे जाऊ नका रे
सत्वालाही डाग कधी लावु नका रे.

हसणारी कळी कधी तोडू नका रे
कुणाचे ही सुख कधी ओढू नका रे

दुजासाठी दुजे होत नडू नका रे
स्वतःसाठी स्वतःच रडू नका रे.

जोडलेल्या नात्यास तोडू नका रे
माणसात माणुसकी सोडू नका रे.

शब्दांवर माझ्या असे चिडू नका रे
सोडताना श्वास मला भिडू नका रे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

दान

Submitted by UlhasBhide on 2 July, 2012 - 06:11

दान

विसरलीस मला !
दुखर्‍या मनाला
एकच समाधान....
विसरण्यासाठी का होईना,
कधीतरी स्मरणात होतो.

तण उपटावं
तसं दूर केलंस
तुझी मर्जी....
समाधान इतकंच,
की कधीतरी रुजलो होतो.

अपेक्षेने पुढे केलेल्या ओंजळीत
दिलंस
अनपेक्षित दान.....
भरभरून वाहणारं,
रितेपण.

.... उल्हास भिडे(२-७-२०१२)

गुलमोहर: 

तू पण आणि मी पण...

Submitted by आर.ए.के. on 2 July, 2012 - 05:05

गर्दीतही एकटेपण, आप्तांतही परकेपण,
सापडलेल्या सुखातही, दु:खाचे ते हरवलेपण!
वर्तमानाच्या रस्त्यावरचे, स्वप्नांचे ते फसवे क्षण,
अन भविष्याच्या पटलावरही, भुतकाळाचे साचलेपण!
निरागसतेच्या वाटेवरचे नाजुक मनाचे हळवेपण,
अन सगळे काही समजून सुद्धा, भोळ्या मनाचे वेडेपण!
पडत राहतात प्रश्ने नुसती, सापडत नाहीत उत्तरं पण,
चल उलगडूया आयुष्याचे हे कोडे,
आज तू पण आणि मी पण!

गुलमोहर: 

कसे शक्य नाही नभाला झुकवणे ?

Submitted by रसप on 2 July, 2012 - 04:41

कसे शक्य नाही नभाला झुकवणे ?
जरासा तुझा हात उंचाव रे !
क्षितीजापुढेही तुझी वाट जाते
पुन्हा वेग घेऊन तू धाव रे !

तुझ्या मनगटी कृष्णगोविंद आहे
उचल तू कधी पूर्ण गोवर्धना
तुझ्या अंतरंगात आहे नृसिंह
कधी तू उफाळून कर गर्जना !

तुझ्या हस्तरेषा कुणी आखणे अन
कुणी प्राक्तनाला लिहावे तुझ्या ?
तुझा तूच आहेस कर्ता विधाता
कुणी धाडसाला पहावे तुझ्या ?

नको आज पाहूस मागे फिरूनी
कुणी साथ सोडून रेंगाळता..
तुझ्या इप्सिताचे तुझ्या संचिताशी
नको बंध जोडूस तू जाणता

तुझ्या हिंमतीची तुला जाण व्हावी
पुरे एव्हढे विश्व जिंकावया !
नको साथ-संगत, न सौभाग्य लाभो
तुला जीत खेचून आणावया !

गुलमोहर: 

सांज

Submitted by सुधाकर.. on 1 July, 2012 - 12:24

येता भरुन आभाळ
उठे शब्दांचे वादळ
घुंगूरले मन होय व्याकूळ व्याकूळ.

सारे कल्पनेचे भास
तरी लागते का आस ?
रंगवेडी सांज होते उदास उदास.

वारा खेळे अंगणात
बोले पाखरु तृणात
कोकीळेच गाणं हिरव्या पानात पानात.

काजळले निळे पाणी
थरारली पापणी
आठवते जुने काही पुन्हा फ़िरुन फ़िरुन.

जेंव्हा उतरली रात
हले चांदणे पाण्यात
देई मोर केका दूर बनात बनात.

घुमे घुबड रानात
भरे काहूर मनात
दडुनीया गेली सांज खोल पाण्यात पाण्यात.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कविता