भरकटलेल्या मनाचा शोध सुरू आहे..........

Submitted by रसप on 4 July, 2012 - 00:25

‎'तुझ्या कुशीतून समुद्र बघायला फार आवडतं'
असं म्हणायची ती
'माझ्या डोळ्यांतला समुद्र झाकता येत नाही आताशा'
म्हणून रडायची ती..

मी समजवायचो तिला
त्याच बुरसटलेल्या कवीकल्पनांनी..
की, तू आणि मी म्हणजे समुद्र आणि किनारा
नेहमीच वेगळे आणि तरी
एकमेकांना एकमेकांचाच सहारा!
तू आणि मी म्हणजे जमीन आणि आकाश
क्षितिजापाशी एकत्र आल्याचा
नुसताच एक आभास..
ती लगेच हसायची
अन समजून घ्यायची
त्या बुरसटलेल्या कवीकल्पनांच्या मागचा
माझा नाईलाज..
आणि मनात घोंघावणाऱ्या वादळाचा
शीळ घातल्यासारखा आवाज...

हे असं नेहमीचंच..
तिने रडायचं
मी समजवायचं
तिने हसायचं
आणि मीही स्वत:ला फसवून
खूष व्हायचं
की अजून एक वादळ शमवलं....

पण, कालच्या पावसात क्षितिज काळेकुट्ट झाले
किनारा ओलांडून पाणी घरापर्यंत आले

आज कहाणी जराशी बदलली आहे
कूस तिची आहे
नजर माझी आहे..
नाते तेच आहे...
किनारा बदलला आहे..
आभाळ तेच आहे..
क्षितीज हरवलं आहे..

भरकटलेल्या मनाचा शोध सुरू आहे..........

....रसप....
३ जुलै २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/07/blog-post_04.html

गुलमोहर: 

मस्तच रणजित

मुक्तछंदातली एक आइडियल कविता आहे ही

कवितेचा आशय विषय खूप प्रगल्भ आहे , कव्यशैली अत्यंत मोहक आहे

अभिनन्दन